Thursday, July 30, 2020

काही आठवणी .. दिग्गज गायकांबरोबरच्या, प्यारेलालजींकडून ऐकलेल्या !!


महंमद रफी यांची एक खास आठवण. स्पेशल चहा लागायचा त्यांना. दूध आटवून अर्धं करायचं, मग त्यात सुक्यामेव्याची पूड घालायची आणि मग त्याचा चहा करायचा.  रफींना एकदा परदेशी जायचं होतं पण त्याआधी काम तर पूर्ण करायचंय मग काय एका दिवसात त्यांनी चक्क पाच गाणी रेकॉर्ड केली होती,  त्यातलं एक गाणं होतं लोफर या चित्रपटातलं – 'आज मौसम बडा बेईमान है '!

'पिया का घर' चित्रपटातलं 'ये जीवन है',  हे किशोरकुमार यांनी गायलेलं गाणं आपल्याला किती आवडतं पण या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना दोन टेक्स झाले तरी पण गाणं काही भावत नव्हतं. बरं काही चुकतंय असंही नव्हतं. किशोरकुमार उत्तम गात होते, पण तरीही काहीतरी मिसिंग होतं. तेव्हा किशोरकुमार यांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते दोन्ही हातांच्या ओंजळीत हनुवटी धरून बसले आणि थोड्या वेळाने तसंच अगदी मृदू आवाजात ते गाणं गायला लागले. त्याच वेळी लक्ष्मी प्यारे दोघेही त्यांना म्हणाले की अगदी असंच तलम हवंय. मग ते संपूर्ण गाणं किशोरकुमारांनी तसाच चेहरा हातांच्या ओंजळीत धरून म्हटलं ! 

सत्यम शिवम सुंदरमच्या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग सुरू होतं. प्रचंड मोठा वाद्यवृंद होता. पाच कंडक्टर्स होते. पण रिदम सेक्शन कंडक्ट करायला कुणी नव्हतं तर लता मंगेशकरांनी तो कंडक्ट केला आणि कंडक्ट करता करता इतकं अप्रतिम गायलं सुद्धा ! 

प्यारेलालजी नेहमी सांगतात, आमचं संगीत हे टीमवर्क आहे किंबहुना हे सगळं कामच टीमवर्कचं असतं. गाण्याचे बोल उत्तम असायला लागतात, त्याचं संगीत, त्याचं चित्रीकरण, दिग्दर्शकाची दृष्टी, अभिनेत्यांचं काम, वादकांचा सहभाग हे सगळं गाणं लोकप्रिय व्हायला कारणीभूत असतात आणि म्हणूनच त्यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासाचं श्रेय ते या TEAMWORK ला देतात !!! 

No comments:

Post a Comment