#४९# पंचम जादू
सचिनदा आणि मीरादेव बर्मन यांचा हा सुपुत्र….आईच्या कुशीत संगीताची ओळख झालेली. संगीत त्याच्या रक्तात भिनलं होते. ब्रजेश विश्वास यांच्याकडे तबला तर उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोदचे शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी 'ए मेरी टोपी पलट के आ' ही धून त्यांनी बनवली जी सचिनदांनी 'फंटुश' चित्रपटात वापरली… 'सोलहवा साल' या चित्रपटातील “है अपना दिल तो आवारा” आणि दोस्ती मधील ”जानेवालो जरा" या गीतातील माऊथ ऑर्गन त्यांनी वाजविला आहे…खरं तर 'प्यारेलाल' आणि 'राहुलदेव बर्मन' अशी एक टीम झाली असती पण सचिनदाना ते मान्य नव्हते…आपल्या मुलाने स्वतंत्र संगीत द्यावे अशी त्यांची इच्छा होती…!!!
पाश्चिमात्य वाद्यमेळ आणि भारतीय संगीत यांचे फ्युजन करून नवनिर्मिती करण्याचे पंचमदांचे स्वप्न होते…१९७०च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटात क्रांती घडविली.अनवट चाली,अनोखा वाद्यवृंद, नाविन्याचा ध्यास यांच्या मिश्रणाने पंचमच्या रचना सजल्या आणि लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य वाद्यवृंद यात आपले सृजन मिसळून त्याने अलौकिक संगीत निर्मिले आणि त्या ठेक्याने, संगीताने रसिकांना भुरळ घातली.
'अमर प्रेम' हा त्यांच्या संगीताने अमर झालेला चित्रपट. “रैना बीत जाये” अवीट गोडी लाभलेले गाणे .. “कुछ तो लोग कहेंगे” ही रचनाही अविस्मरणीय अशीच …!! याच्या मागोमाग खुशबू आणि इजाजत हे त्यांच्या टॉप लिस्ट मधल्या सिनेमांमध्ये वरची बाजी मारणारे चित्रपट..
नेहमीच गाण्यात काहीतरी वेगळे करून दाखविण्याची उर्मी पंचम याना स्वस्थ बसू देत नसे. चित्रपटात एकच गाणे कथेच्या मागणीनुसार नायक,नायिका दोघांच्या तोंडी असते ,पण “कुदरत” या चित्रपटात त्यांनी “किशोर कुमार” ला दिलेले “हमे तुमसे प्यार कितना’ हे गाणे साध्या ढंगात आहे , तर पूर्ण शास्त्रीय ढंगाने हेच गाणे “बेगम परवीन सुलताना” यांच्या कडूनही त्यांनी गाऊन घेतले आहे , जे आजही चिरतरुण आहे …!
एखाद्या गाण्याच्या बाबतीत तो किती वेगळा विचार करायचा ह्याचे किस्से अनेक आहेत- खुशबू ह्या गुलझारांच्या फिल्मच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु होतं. गाणं होतं 'ओ माझी रे अपना किनारा'... अचानक पंचमने रेकॉर्डिंग थांबवलं आणि सोडा water च्या बाटल्या मागवल्या. स्टुडिओत खसखस पिकली की बाबूमोशायचा मूड आज वेगळ्याच गोष्टींचा आहे. पंचमने त्या बाटल्या आल्यावर रिकाम्या केल्या आणि त्या कमी जास्त पाण्याने भरल्या. सगळ्यांची उत्कंठता शिगेला पोचली आणि एकाच वेळी त्याने दोन्ही बाटल्यांत हवा फूंकून पाण्याच्या लाटेचा भास निर्माण केला, 'ओ माझी रे अपना किनारा' हे गाणं ऐकताना जो लाटांचा आवाज येतो तो आवाज असा निर्माण झाला आहे ... आता परत एकदा नक्की ऐका ते गाणं !
No comments:
Post a Comment