Thursday, July 9, 2020

#९# देवआनंद आणि गुरुदत्त 

"मैं जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फिक्रको धुएमें उडाता चला गया"... हे गीत ज्याच्या जीवनशैलीला अगदी चपखल बसते, असा चिरतरुण चेहरा म्हणजे देवानंद !
देवआनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी शकरगढ, गुरुदासपूर, पंजाब येथे झाला जे आता पाकिस्तानात आहे.त्यांचे वडील पिशोरीलाल आनंद, डिस्ट्रीक्ट जज्ज होते. देवआनंद यांनी लाहोर गव्हर्नमेंट कॉलेज मधून इंग्रजी साहित्य घेऊन पदवीशिक्षण पूर्ण केलं. चित्रपटाच्या वेडापायी अवघे तीस रुपये खिशात असतांना मुंबई गाठली.
सुरुवातीला ते सुप्रसिध्द कथालेखक, दिग्दर्शक के ए अब्बास यांच्या सोबत काही दिवस राहिले. नंतर संधी येताच त्यांनी पुणे गाठले. प्रभात फिल्म कंपनी मध्ये हिरोच्या भूमिकेसाठी स्क्रीनटेस्टस चालल्या होत्या तिथे देवआनंद पास झाले. परंतु प्रभात च्या बाबुराव पै यांनी त्यांच्या दाताला दोन्ही बाजूच्या गॅप असल्यामुळे दाताला कॅप बसवायला सांगितली. पण त्या कॅपमुळे देवआनंद यांना बोलायला खूप त्रास व्हायला लागला म्हणून ती त्यांनी काढून टाकली.  कालांतराने दातांची ती गॅप त्यांच्या चेहेऱ्याच्या गोडव्यात भरंच घालते, हे पडद्यावर सर्वांना समजलं ते वेगळं. 
त्याच सुमारास गुरुदत्त पण सिनेमाच्या वेडापायी नशीब आजमावयाला मुंबईत आले होते. एकदा धोब्याकडून नजर चुकीने दोघांच्या शर्टसची अदला बदली झाली व या निमित्ताने झालेल्या भेटीचे मैत्रीत रुपांतर झाले. दोघांनी एकमेकांना वचन दिले कि ज्याला पहिली संधी मिळेल तो दुसऱ्याला संधी देईल.
जेव्हा देवआनंद यांनी मोठ्या भावाबरोबर नवकेतन चित्रपट संस्था स्थापन केली, बाजी या चित्रपटासाठी त्यांनी आपला शब्द पाळला आणि दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त ना संधी दिली!  'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बनाले 'हे गाजलेलं गाणं याच चित्रपटातलं. पुढच्याच वर्षी १९५२ मधे गुरुदत्तंनी दिग्दर्शित केलेला नवकेतन चा दुसरा चित्रपट आला 'जाल' .. ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिलकी दासता.. हे सुमधुर गाणं याच चित्रपटात होतं ..  

पुढे या दोन्ही महान कलाकारांनी चित्रपट सृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं, वेगळी ओळख निर्माण केली हे आपण जाणतोच पण त्याची सुरवात त्यांच्यातील या खास मैत्रीतून झाली होती हे विशेष !!



No comments:

Post a Comment