Wednesday, July 8, 2020

मॉम ... You too 

एकादशीला रताळ्याचा गोड किस करायचा राहिलाच. म्हणून आज ठरवलं, नाश्त्याला तोच करावा. तसंही आज  वर्क फ्रॉम होम असल्याने माझी सकाळ थोडी निवांत होती. पण नवऱ्याला ऑफिसला जायचं  होतं त्यामुळे त्याचा नाश्ता, जेवणाचा डबा अशी नाही म्हटलं तरी थोडी धावपळ हि होतीच. तो म्हणाला सुद्धा, "अगं इतक्या घाईत कुठे करतेस रताळ्याचा किस".. मी म्हटलं,"अरे आज घरूनच काम आहे मला,त्यामुळे तशी घाई नाहीये आणि  तुला आवडतो ना, मस्त गरम गरम खाऊन जा".. माझ्या चेहऱ्यावरचं ते लाडिक हसू पाहून त्याला समजलं, माझा निश्चय किती ठाम आहे ते !

त्याच्याशी बोलत बोलत एकीकडे मी रताळ्याचा किस करायला घेतला. रवाळ कणीदार तुपावर लवंग टाकून रताळ्याचा किस छान परतला.तुपात भिजून मस्त शिजल्यावर साखर घालून एक वाफ आणली, वेलची सुकामेवा टाकून त्याला अजून थोडं नटवलं. छान बदामी रंगात तो अजूनच खुलून दिसत होता. आहाsss ,तो खरपूस मस्त सुवास घरभर दरवळत होता. डिश भरली, त्याला खायला दिलं. दुसरीकडे डबा भरता भरता घड्याळाकडे नजर गेली. "अरे मी सोडते तुला कोपऱ्यापर्यंत, नाहीतर बस चुकेल तुझी".. असं म्हणत त्याचा जेवणाचा डबा बॅग मध्ये ठेवत मी गाडीची किल्ली घेऊन उतरले सुद्धा.

एकाच फेरीत काम होतील म्हणून परत येतांना भाजी, फळं , ब्रेड अंडी घेऊन आले. घरी पोचले तोवर कांतेय उठला होता. आई कधी येते याची गादीवर लोळून वाट पाहात होता. मग काय सामान ठेवलं,'आयुष मंत्रालयाने'  घालून दिलेले सोपस्कार केले आणि स्वयंपाकघरात गेले. कांतेय अजिबातच गोड खात नाही म्हणून नाश्त्याकरता मस्त सॅण्डवीचेस बनवले व रताळ्याचा किस दुपारचे जेवण झाल्यावर स्वीटडिश म्हणून आपण खाऊ,असं मनांत ठरवलं.

बाहेरची ढगाळ हवा, खिडकीतून येणारं गार वारं मनावरची मरगळ अजूनच दाट करत होतं. वाऱ्याने ऐकू येणारी पानांची सळसळ, पक्षांचे आवाज, मधूनच ऐकू येणारी ती पक्षाची शीळ, खिडकीतून दिसणारी हिरवीगार झाडं आणि साऱ्या आसमंतात भरून राहिलेली एक शांतता .. हे सारं अनुभवत चहा ठेवला. मग लक्षात आलं आज आपला ओटा अगदी नखशिखांत नटलाय.एका गॅसवर भाजीची कढई तशीच झाकून ठेवलीये.दुसऱ्या गॅसवर एका पॅन मध्ये रताळ्याचा किस आहे. बाजूलाच सकाळी तापवलेल्या दुधाचं पातेलं आहे. पोळ्यांसाठी भिजवलेल्या कणकेचं भांड व त्यावर उपडा ठेवलेला पोळपाट आणि ओट्यावर पोळ्या करतांना पोळपाटाच्या आकारात गोल सांडलेली कणिक.. सिंक मध्ये सकाळ पासूनची साठलेली भांडी तर बाजूला धुतलेल्या भांड्यांचा एक ढीग नेहमीच्या टोकरीत निवांत पहुडला होता. बाजूच्या टेबल वर सकाळच्या पहिल्या चहा चे कप अजूनसुद्धा तसेच होते.

हे सर्व निरीक्षण करत करत मी चहा बनवला. हे सर्व काही आपल्यालाच आवरायचं हे कळत होतं पण तरीही काहीहि चिडचिड नव्हती. मी एकदम कूल होते. थोडक्यात काय तर "आधी चहा घेऊ मग बघू" असाच पवित्रा होता. मग काय ट्रे मध्ये चहा नाश्ता असं सर्व सजवून कांतेयला मी आवाज दिला 'टेरेस मध्ये चहा पिऊ रे, ये इकडे' .. मग काय टेरेस मध्ये निवांत चहा पीत गप्पा मारल्या. online आज काय क्लास अटेंड करायचं आहेत यावर चर्चा झाली. पेपर वाचला. छान तासभर गेला असेल या उनाडक्या करण्यात. एवढयात क्लास ची वेळ झाली म्हणून कांतेय उठला तसं मी त्याला ट्रे देत "हे किचन मध्ये ठेव मी धुते नंतर ," असं सांगितलं. तो ट्रे घेऊन वळला आणि मी मोबाईल हातांत घेतला. किचन मध्ये ट्रे ठेवून तो तडक बाहेर आला आणि म्हणाला, " माय  गॉड "........  " काय रे काय झालं "? मी विचारलं .. तर म्हणतो, " मॉम तू केलास इतका पसारा किचन मध्ये ? I don't believe. मला वाटायचं मी आणि बाबाच पसारा करतो पण तू सुद्धा करतेस पसारा, you too ?" मी हे ऐकून मनापासून पोटभर हसले ... मी म्हटलं "अरे हो , रोज आवरलेले असतं आज नाही आवरलं. ऑफिसला जातांना करून जाते सगळं म्हणून तुला दिसत नाही इतका पसारा. आज नाही आवरलं इतकंच"... "सिरियसली , कारण मी कधीच नाही पाहिलं तुला असा पसारा करून ठेवलेलं ".... आपल्या आई मध्ये सुद्धा आपल्या एवढीच क्षमता आहे हे पाहून सुखद धक्का बसला होता त्याला. आईने केलेल्या पसाऱ्याचे फोटो काढून बाबाला स्टोरी सुद्धा गेली असेल. लॉकडाऊन मध्ये लागलेल्या अनेक शोधांपैकी हा शोध कांतेय करता मात्र फारच भारी होता !






No comments:

Post a Comment