#४१# डॉक्टर जब्बार पटेल
डॉक्टरकीसाठी स्टेथास्कोप हाती धरलेल्या डॉ. जब्बार पटेल यांना त्यापेक्षा कॅमेरा अधिक खुणावत होता. त्यामुळे पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले तरी करीयर मात्र त्यांनी चित्रपट क्षेत्रातच केले. महाविद्यालयीन जिवनात त्यांनी लेखन, दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले.अनेक एकांकिका, नाटकं बसवली.नाट्य स्पर्धा गाजवल्या. शिक्षण डॉक्टरकीचं परंतु पिंड हा मुळातच कलावंतांचा. त्याच वेळी विजय तेंडुलकर त्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी लिहिलेली काही नाटकं त्यांनी वाचली, काही बसवली, तर काहींमध्ये प्रत्यक्ष काम केलं. ‘अशी पाखरे येती’ हे अतिशय तरल नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी केलं आणि ते नाटक खूप गाजलं. त्यानंतर ‘घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. ‘घाशीराम’नं खऱ्या अर्थाने त्या दोघांना जवळ आणलं.
मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालं आणि डॉक्टर जब्बार पटेल पत्नीसोबत प्रॅक्टीससाठी पुण्याजवळील दौंड या गावी गेले. ते बालरोगतज्ज्ञ आणि पत्नी स्त्री-रोग तज्ज्ञ. प्रॅक्टिसमध्ये जम बसत होता. तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ‘घाशीराम’ नाटकाच्या तालमीसाठी ते पुण्यात जवळपास साडेतीन महिने रोज जात होते..
असं सगळं सुरू असताना एके दिवशी रामदास फुटाणे त्यांच्याकडे आले व त्यांनी समोर ‘सामना’ची पटकथा ठेवली आणि म्हणाले, ‘‘आपल्याला ही फिल्म करायचीय.’’ जब्बार म्हणाले, ‘‘अरे मी फिल्म करू शकतो, हे तुला कसं काय वाटलं? मला अजून फिल्मची भाषा व तंत्रही कळत नाही.’’ रामदासजी म्हणाले, ‘‘त्याबाबत तेंडुलकरांशी चर्चा झालीय. त्यांनी तुमचं ‘घाशीराम’ पाहिलंय आणि आवडलंय त्यांना.’’ आपल्यासारख्या अतिशय नवख्या माणसासमोर असा प्रस्ताव आलेला पाहून त्यांना दडपण आलं.
ससूनमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करताना दारिद्र्य जवळून पाहिलं होतं; त्यात दौंडच्या अनुभवानं भर टाकली. चळवळी-आंदोलनं दुरून पण गांभीर्याने पाहिली होती. तरीही, या अनुभवाच्या शिदोरीवर चित्रपट करता येईल, असं त्यांना वाटत नव्हतं; पण चित्रपट करण्याचा मोह मात्र होता !
हि आठवण सांगताना आजही डॉक्टर म्हणतात, "तेंडुलकर नावाच्या माणसाचा मोठेपण इथे दिसतो. ‘सामना’सारखी अत्यंत गंभीर विषयावरची पटकथा त्यांनी चित्रपटातील माझ्यासारख्या नवख्या माणसाच्या हाती विश्वासाने दिली. सामनाच्या यशाचं खरं श्रेय तेंडुलकरांचं आहे. माझा रंगमंचावरून ‘सामना’ पर्यंतचा हा प्रवास तेंडुलकरांच्या सोबतीनेच झाला"...
No comments:
Post a Comment