Thursday, July 30, 2020

#२६# रफी़ साहेब..

१९६५ मध्ये 'दोस्ती' चित्रपट आला चाहूँगा मैं तुझे सांज सवेरे, राही मनवा दुखकी चिंता क्यूं सताती है, कोई जब राह न पाए मेरे संग आए ...अशी एक से एक रफीजींची अप्रतिम गाणी होती या चित्रपटांत ! 'चाहूंगा मैं तुझे'.या गाण्यासाठी त्यांना ३ रे फिल्म फेअर मिळाले.

याच सुमारास "कल्याणजी आनंदजी" पण जम बसवत होते. त्यांनी सुध्दा रफीजींना एक से एक बेहेतरीन गाणी दिली आहेत. जब जब फूल खिले, तील "परदेसियोंसेना अखियां मिलाना" आणि "एक था गुल और एक थी बुलबुल" ही गाणी तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होती. 

१९६६ सालच्या सूरज, चित्रपटातलं 'बहारो फूल बरसा ओ', हे पण असेच सुंदर गाणे, ज्याला ४ थे फिल्मफेअर मिळाले.

१९६८ सालच्या ब्रह्मचारी, मध्ये पण रफीजींची चक्के में चक्का चक्के में गाडी, मैं गाऊ तुम सो जाओ, दिलके झरोकेमें तुझको बिठाकर, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबानपर अशी बेहतरीन गाणी होती! "दिल के झरोकेमे" साठी त्यांना पाचवे फिल्म फेअर मिळाले.

१९६९ साली आराधना हा चित्रपट आला. सचिनदांचे संगीत ! गुनगुना रहे है भंवरे खिल रही है कली कली आणि बागोमें बहार है, ही  गाणी रफीजींनी लताजीं बरोबर म्हटली. सचिनदा त्यावेळी आजारी होते त्यामुळे इतर गाण्यांची जबाबदारी आर डी बर्मन यांच्यावर होती. त्याच वेळेला रफीजींना "हज"ला जाण्याची संधी आली त्यामुळे , कोरा कागज था ये मन मेरा आणि मेरे सपनोंकी रानी ही गाणी पंचमनी किशोर कुमार कडून गाऊन घेतली. ही दोनही गाणी हीट झाली आणि पुन्हा समीकरणं बदलली. 

राजेश खन्नाला किशोरदांचा आवाज चपखल बसला आणि मग पहिली पसंती किशोरदांना मिळू लागली. 

१९७७ साली आलेल्या हम किसीसे कम नहीं, मधील क्या हुआ तेरा वादा, या गाण्यासाठी त्यांना शेवटचे म्हणजे ६ वे फिल्मफेअर मिळाले.

असं सांगतात १९६० च्या सुमारास त्यांचा रॉयल्टी वरुन लताजींशी वाद झाला होता. लताजींचे म्हणणे होते संगीतकारांप्रमाणेच रॉयल्टीचा काही हिस्सा गायकांना ही हवा तर रफीजींना वाटत होते कि एकदा गाण्याचे मानधन घेतल्यावर त्याची पुन्हा रॉयल्टी घेणे योग्य नाही. वाद झाले आणि लताजींनी रफीजींच्या बरोबर गायचे बंद केले. पुढे नर्गिसजींनी समझौता करुन त्यांच्यात समेट घडवला त्यानंतर सहा सात वर्षांनी 'ज्वेल थिफ' या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकत्र गाणे म्हटलं, ते होते, 'दिल पुकारे आरे आरे आरे अभी ना जा मेरे साथी'!



३० जुलै १९८० हाच तो दिवस! जे ओमप्रकाश यांच्या 'आस पास' ह्या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डींग होते. संध्याकाळ झाली. सगळे म्हणाले उरलेले उद्या करु. शेवटच्या चारच ओळी राहिल्या होत्या. रफीजींना काय वाटले कुणास ठाऊक? खाली उतरलेले रफीजी पुन्हा वर आले. रेकार्डिंग पूर्ण करुया म्हणाले. त्यानंतर रफीजी घरी गेले. रात्री झोपले ते परत न उठण्यासाठी. एक प्रेमळ सह्रदय व्यक्ती, एक यशस्वी गायक, एक बुलंद आवाजाचा बादशहा गेला, आपला आवाज मागे ठेवून ...

No comments:

Post a Comment