Thursday, July 30, 2020

#२७# लक्ष्मीकांत - प्यारेलाल

'तिन्हीसांजा सखे मिळाल्या', या भा. रा. तांब्यांच्या कवितेला चाल लावली तेव्हा हृदयनाथ मंगेशकरांचं वय होतं केवळ १७ वर्षं तर या गाण्याची अरेंजमेंट ज्यांनी केली होती त्या प्यारेलाल शर्मांचं वय होतं केवळ १४ वर्षं ! हे गाणं आपण अनेकदा ऐकलंय. पण या माहितीच्या पार्श्वभूमीवर आता परत एकदा हे गाणं ऐका.. केवळ थक्क व्हायला होतं !

हे प्यारेलाल शर्मा म्हणजेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतले प्यारेलाल. प्यारेलाल ११ वर्षांचे होते तेव्हा त्यांची हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्याशी मैत्री झाली. त्याच काळात कॉलेजजवळ क्रिकेट खेळताना त्यांची लक्ष्मीकांत ह्यांच्याशी देखील मैत्री झाली आणि त्यांनी सर्वानी मिळून “सुरेल बाल कला केंद्र” ह्या नावाने एक वाद्यवृंद स्थापन केला व लहान वयातच अनेक कार्यक्रम केले.

या जोडीचा पहिला चित्रपट पारसमणी. पण त्याच्या कितीतरी आधीपासून हे दोघे कल्याणजी-आनंदजी, शंकर-जयकिशन, एस. डी. बर्मन अशा संगीतकारांचे सहायक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांचे नाव सहाय्यक संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल असे झळकत असे. त्यावेळी लक्ष्मीकांत त्यांना आपण हे नाव कायम ठेवून एकत्र काम करू असं म्हणत आणि पुढे नेमकं  घडलं सुद्धा तसंच.

हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांची सर्वाधिक यशस्वी जोडी म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे नाव घेतले जाते. पारसमणी पासून त्यांनी सुरुवात केली तेव्हा प्यारेलाल केवळ २३ वर्षांचे होते आणि लक्ष्मीकांत हे २६ चे होते. या चित्रपटांतील  गाणी प्रचंड गाजली आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी संगीतकारांची जोडी म्हणून चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाली.

त्यांनी जवळजवळ ६०० हुन अधिक चित्रपटांना संगीत दिलं, त्यांना ७ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ' हम ' हा त्यांचा अखेरचा गाजलेला चित्रपट.  ४० हून अधिक वर्षं या जोडीनं बरोबर काम केलं. लक्ष्मीकांत गेल्यावरही प्यारेलालजींनी त्यांचं नाव आपल्याबरोबर लावणं बंद केलेलं नाही. योगायोग म्हणजे दोघांचा रक्तगट सुद्धा एकच होता, बी पॉझिटीव्ह. 

या दोघांच्या नावावर एक विक्रम सुद्धा आहे, एकावेळी ४३ चित्रपटांचं काम होतं या जोडीकडे.. विश्वास नाही ना बसत !

No comments:

Post a Comment