#6#किशोरकुमार ( आभास)
किशोरकुमार यांनी गायलेल्या पहिल्या गाण्याच्या ओळी होत्या, " मरने की दुवाँए क्यों माँगू , जीने की तमन्ना कौन करे ".. जिद्दी (१९४८) सिनेमा मधलं हे गीत पडद्यावर साकारलं होतं देवानंद यांनी. पुढे बिमल रॉय यांच्या नौकरी (१९५४) चित्रपटात काम करत असतांना किशोरदांनी हट्ट धरला कि त्यातील एक गीत गायची संधी त्यांना मिळावी. पण संगीतकार सलील चौधरी यांना ते पटेना. ते बिमलदांना म्हणाले, " ये क्या गायेगा, ये बाकायदा सिंगर थोडी है और इसने गानेकी तालीम भी नहीं ली हे".. तरी पण "एक बार गाने का मौका तो दिजीए फिर देखिये ".. असं म्हणून किशोरदांनी त्यांच मन वळवलं. ते गीत होतं, "छोटासा घर होगा बादलों की छाँव में, आशा दिवानी मन में बासुँरी बजाये"... मग ते थांबलेच नाहीत. "नखरेवाली आss आss देखने मै देख लो है कैसी भोली भाली ", "इना मीना डिका , डाय डामे निका " अशा अनेक सुंदर गाण्यांचा सिलसिला मग सुरु झाला.
एस डी बर्मन यांच्याबरोबर त्यांनी काम सुरु केलं तेव्हा त्यांनी किशोरदांना एक गोष्ट सांगितली होती, " सैगल साब बहोत बडे सिंगर थे, ये हम सब मानते है। उनकी अपनी आवाज थी तुम भी अपनी आवाज को ढूँढ लो, अपनी अंदाज में गाओ, उनकी नकल मत करो।"... मग काय त्यांनी आपला अंदाज शोधलाच आणि मग 'चलती का नाम गाड़ी', पासून ती जादू आपण अनुभवली !
हाफ तिकीट या चित्रपटांत त्यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला होता. "आके सीधी लगी दिल पे जैसे कटरिया, ओ सावरियाँ ", हे गाण male आणि female या दोन्ही आवाजात त्यांनीच म्हटलं आहे.
पुढे एक काळ असा आला कि त्यांचे चित्रपट म्हणावे तितके चालेनात. काही चित्रपटांत तर त्यांना पडद्यावर रफी साहेबांचा आवाज दिला गेला. त्यातील एक चित्रपट होता शरारत (१९५९) गाणं "अजब है दासताँ तेरी ए जिंदगी, कभी हँसा दिया कभी रुला दिया कभी " तर दुसरा रागिणी (१९५८) गाणं," मन मोरा बावरा निस दिन गाये गीत मिलन के"...
किशोरकुमार त्यांच्यावर चित्रित होणाऱ्या गाण्यांशिवाय फक्त आणि फक्त देवानंदला त्यांचा आवाज द्यायचे. मुनीमजी, टॅक्सि ड्राइवर, हाऊस नंबर ४४, फंटूश, नौ दो ग्यारह , पेयिंग गेस्ट , गाईड, ज्वेल थीफ , प्रेम पुजारी, तेरे मेरे सपने हे या जोडीचे काही गाजलेले चित्रपट. असं म्हटलं जायचं कि, "उनके दिल में जो एक नमी थी , गम था , खालीपन था , जो गेहेराई थी वह इन गितों से सामने आई "....
१९६९ मध्ये आलेल्या 'आराधना' चित्रपटात एस डी बर्मन यांनी पहिल्यांदा त्यांचा आवाज दुसऱ्या कलाकारासाठी म्हणजे राजेश खन्ना यांच्यासाठी वापरला आणि त्या सिनेमाने मग इतिहास घडवला. 'रूप तेरा मस्ताना 'गाण्यासाठी किशोरदांना पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. त्यांनी तब्बल ९२ चित्रपटांत एकूण २४५ गाणी राजेश खन्नासाठी गायली जे एक गायक-कलाकार जोडीचं चिरतरुण रेकॉर्ड आहे. त्याआधी देवानंद साठी त्यांनी ११९ गाणी म्हटली होती. किशोरदांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी १३१ तर जितेंद्र करता त्यांनी २०२ गाणी गायली आहेत... हे आकडे वाचूनच थक्क व्हायला झालं ना !!!
No comments:
Post a Comment