Thursday, July 30, 2020

#२८# मदनमोहन

मदनमोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल कोहली हे इराक सरकारच्या कुर्दिस्तान पेशमर्ग फोर्समध्ये अकाऊंटंट जनरल या पदावर काम करीत होते. तेथेच इरबील शहरात मदनमोहन यांचा जन्म झाला. इराक स्वतंत्र झाल्यावर ते हिंदुस्थानात परत आले. मदनमोहन यांचे बालपण इराक, चकवाल-पंजाब, लाहोर व मुंबईमध्ये गेले. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. आजोबा डॉक्टर, आई कवयित्री व संगीत प्रेमी असल्याने घरात सुसंस्कृतपणा व संगीताची आवड होती. त्याचा परिणाम मदनमोहन यांचे संगीतप्रेम वाढण्यावर झाला. 

१९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. 

मुंबईत आल्यावर मदनमोहन शाळेतील कार्यक्रमात भाग घेत व गाणी म्हणत. तेथील ऑल इंडिया रेडिओवरील लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी मुलांना आकाशवाणीवर बोलावण्यात येई, त्यातही मदन मोहन यांचा सहभाग असे. सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सुरय्या, राज कपूर यांचा परिचय मदनमोहन यांच्याशी आकाशवाणीवर झाला. मदनमोहन यांनी आपल्या वडिलांच्या आग्रहामुळे डेहराडून येथे मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेऊन खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले होते व सेकंड लेफ्टनंट म्हणून ते सैन्यात भरती सुद्धा झाले. पण रमले नाहीत. काही काळातच त्यांनी वडिलांना न सांगता संगीत साधनेसाठी सैन्यातील नोकरी सोडली आणि लखनौ येथे ऑल इंडिया रेडिओवर प्रोग्राम असिस्टंट म्हणून रुजू झाले. 

तेथे त्यांचा परिचय उस्ताद उस्ताद फैय्याजखान, उस्ताद अली अकबर खान, बेगम अख्तर, तलत महमूद या दिग्गज गायकांशी झाला व त्यांच्या संगीत विषयक ज्ञानात भर पडून त्यांना शास्त्रीय संगीताबाबत प्रेम वाटू लागले. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील रेडिओ स्टेशनवर कामाला होते. लखनौ, दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रात काम करून ते मुंबईत परतले. आपल्या वडिलांच्या सहाय्याने आपण मुंबईतील हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश करू, हा त्यांचा अंदाज चुकला. 

सैन्यातील मानाची नोकरी सोडून बेभरवशाच्या चित्रपट व्यवसायात येण्याचे स्वप्न मदनमोहन पाहात होते. या क्षेत्रांत येण्याबद्दल त्यांच्या वडिलांचा त्यांना विरोध होता. हा विरोध इतका जास्त होता की ते ऐकत नाहीत म्हणताच त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या घराचे दरवाजे बंद केले.



तिथूनच मग सुरु झाला मदनमोहन यांचा स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष .... 

No comments:

Post a Comment