Tuesday, August 11, 2020

#मान्सून डायरी #

पाच वाजले की ऑफिसमधून लगबगीनं निघायचं,ऑफिसच्या बसमधे बसलं की हुश्श करायचं. त्या क्षणी ऑफिस तिथेच मागे सोडून मग पुढचा अर्धा तास मनसोक्त गाणी ऐकायची हे रोजचं ठरलेलं.. सध्या जोडीला बरसणारा मुसळधार पाऊस आहेच, मग काय एकदम माहोल.....कानांत आवडीचा दागिना अडकवून मोबाईल वर लता किशोरचं रिमझिम गिरे सावन back to back ऐकत पावसाचा आनंद घेत, पावसातं मुक्त विहार करत बागडत घरी जायचं ! संध्याकाळची हि सुरेल सुरवात दिवसभराचा सगळा शीण घालवते !

सध्या आमचं कॉलेज कॅम्पस म्हणजे आमच्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी तर कधी कोडाईकॅनाल अगदी  माउंट अबू सुद्धा आहे. गार बोचरी हवा, अविरत कोसळणाऱ्या सरी, खाली उतरलेल्या पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये पावसांत चिंब भिजून डोलणारी हिरवीगार झाडं, वेगवेगळ्या रंगांची फुलझाडं, दिवसभर बागडून सुद्धा न थकलेल्या विविध पक्षांचे आवाज, तो किलबिलाट, मधूनच डोकावणारे तर कधी पावसांत पिसारा फुलवून नाचणारे मोर सारंच अदभूत ! सध्याच्या वातावरणातील मरगळ झटकून रोज नवी उभारी देणारं हे वातावरण !!! 

काल सुद्धा अशाच धुवांधार पावसांत आमची बस निघाली.. 

काही वेळांतच आमचं कॅम्पस सोडून आणि आम्ही हायवेला लागलो. रस्त्यावर बऱ्यापैकी कमी गर्दी व त्यातही  एकमेकांना मागे टाकण्याची गाड्यांची स्पर्धा .. चांदणी चौक ओलांडून बस आता वारजेच्या दिशेने जात होती. इथे ट्रॅफिक थोडं जास्त होतं त्यामुळे बसचा स्पीड जरा कमी होता. इतक्यात नक्की काय झालं हे  समजायच्या आत आमच्या बसच्या पुढे असलेल्या दुसऱ्या बसने एका रिक्षाला जोरदार कट दिला आणि ती रिक्षा जागेवरचं १८० कोनात फिरतांना आमच्या बसवर येऊन अक्षरशः धडकली. नशीब बसचा स्पीड कमी होता. ती रिक्षा आमच्या बसला धडकून परत बाजूला होतांना मला खिडकीतून दिसली आणि "ओह्ह गॉड "असे शब्द माझ्या तोंडातून फुटता फुटता त्या रिक्षांत ड्रायव्हर आणि पेसेंजर कोणीच नाहीये हे मला दिसलं आणि "अरे कोणीच नाहीये रिक्षांत".. हे शब्द सुद्धा एकदम उत्फुर्तपणे बाहेर पडले. 

"असं कसं होईल कि कोणीच नाही रिक्षांत, काही काय ?".... " अरे रिक्षाला पहिला कट बसला ना तेंव्हाच बाहेर पडले कि काय सगळे, बापरे "...  " अग सगळे कसे पडतील बाहेर, कोणी तर राहील रिक्षांत ".. "पण समजा  बाहेर पडले असते तर दिसले असते ना, रस्त्यावर तर कोणीच नाही पडलेलं ".. अशी अनेक वाक्य माझ्या कानांवर आदळत होती. प्रत्येक जण बसमधून बाहेर पाहात अंदाज बांधत होता. काय झालं असेल या विचाराने मी पण जरा घाबरले होते. पुढची बस थांबली, आमचीही बस थांबली आणि आजुबाजूची सर्व रहदारी सुद्धा थांबली. नक्की काय झालं असावं हे तर्क वितर्क करत निम्मी बस खाली उतरली. आमच्या बाजूलाच थांबलेली गाडी ऑफिस मधल्या माझ्या मित्राची होती. आपलीच ऑफिसची गाडी पाहून तो सुद्धा काळजीपोटी थांबला.  त्याचा चेहरा एकदम प्रश्नार्थक, "काय झालं " ? असं त्याने विचारताच, "अरे ती रिक्षा धडकली आपल्या  बसला पण रिक्षांत कोणीच नव्हतं " असं मी म्हटलं तर तो, " काय " असं सर्वांना ऐकू जाईल इतक्या मोठ्यांदा जवळपास ओरडलाच .. "अरे हो ".. इतकंच उत्तर मी दिलं कसंबसं.  " काही तरी झालं हे कळलं , त्यामुळॆ मी स्पीड कमी केला. गाडीसमोर कोणी येत नाहीये ना हे बघत बघत कशी बशी गाडी थांबवली" असं तो सांगत होता....साधारण हाच भाव आजूबाजूला थांबलेल्या प्रत्येक गाडीचालकाचा होता. गाडी बंद करून, उतरून,  मागे जाऊन, नक्की काय झालं हे पाहायला सगळेच जण बसच्या मागे जात होते. 

सुदैवाने रिक्षाचं जास्त नुकसान झालं नव्हतं. एवढ्या गोंधळात ती दोन चार वेळा जागेवरच गोल गोल फिरली असावी आणि डिव्हायडर वर थोडी कलंडली होती. सर्वानी ती रिक्षा सरळ केली तरी रिक्षा कोण चालवत होतं हे कोडं काही उलगडत नव्हतं. कोणीतरी डिव्हायडरच्या पलीकडच्या रस्त्यावर पण पाहिलं कोणी तिकडे तर नाही पडलं.. तर तिथेही कोणी नव्हतं. इतक्यात कोणीतरी बोललं सुद्धा, "अरे हि काय रोहित शेट्टी ची फिल्म चालू आहे का ?".. "अहो, प्रसंग काय , बोलताय काय " असं एकाने त्याला टोकलं सुद्धा. बघता बघता काही क्षणांत आजूबाजूच्या सर्व गाड्या थांबल्या. रिकामी रिक्षा अशी रस्त्यावर कशी काय आली या विचाराने सर्व जण चक्रावले होते.  "अरे कोणाची हाय रं हि रिक्षा ?" अशी आरोळी तेवढ्यात बाजूच्या टेम्पोवाल्याने ठोकली. "अरं माझी हाय , माझी "... असं उत्तर ऐकू येताच, त्या आलेल्या आवाजाच्या दिशेने सारेजण एकदम वळून पाहायला लागले तर पांढरा शर्ट , पांढरा पायजमा आणि टोपी घातलेला एक माणूस लगबगीने येतांना दिसला. त्याच्या एका हातांत मक्याचं अर्धवट खाल्लेलं कणीस होतं. रस्त्याच्या बाजूलाच निखाऱ्यावर कणसं भाजून विकणाऱ्याची एक गाडी लागलेली होती. हा पठ्ठा बहुदा तिथेच पावसांत कणीस खात बसलेला होता हे हेरायला क्षणाचाही विलंब लागला नाही...  

कणीस खाण्यात तो इतका मश्गुल असावा कि थोडी पुढे उभी केलेली रिक्षा रस्त्यावर आली, बसला धडकली याची त्याला तिळमात्र कल्पना नव्हती. काहीतरी गोंधळ झाला तेव्हा त्याने पाहिलं तर समजलं रिक्षाची भानगड आहे काहीतरी म्हणून मग त्याने स्वतःची रिक्षा पाहिली जी जागेवर नव्हती आणि म्हणून त्याला उलगडा झाला कि ती त्याचीच रिक्षा आहे.. या अर्थाचं त्याचं स्पष्टीकरण ऐकून आता त्याला रागवावं कि बदडावं असं झालं लोकांना... "हा काय रस्ता आहे का बे बाजूला रिक्षा लावून कणीस खायचा"... " सांभाळता येत नाही रिक्षा तर चालवतो कशाला".."अरे रिक्षात कोणी असतं तर काय झालं असतं, विचार कर जरा,".. "कणीस खायला खडकवासल्याला जायचं ना इथे का कडमडला"..  असं प्रत्येकाने खरपूस तोंडसुख घेतलं .. कोणीतरी, "हि कणसं विकायची जागा आहे का रे " म्हणून त्या कणसं विकणाऱ्याला पण झापलं ... 

तो रिक्षावाला मात्र एक कणीस काय भावाला पडलं असा विचार करत, ते अर्धवट खाल्लेलं कणीस खावं कि आता फेकावं असा विचार करत त्याच्या रिक्षामध्ये आरूढ झाला ... 

हुश्श .. कोणाला काही झालं नाही हे समाधान सर्वांत जास्त होतं. पाच मिनिटांपूर्वी एका वेगळ्याच टेन्शन मध्ये आलेली इतकी सारी माणसं आता चेहऱ्यावर एक हसू आणि मनांत मात्र पावसांत कणीस खाणाऱ्या रिक्षावाल्याचे चित्रं घेऊन आपापल्या गाड्यांमधून पुढच्या प्रवासाला निघाली.. 


No comments:

Post a Comment