#४२# डॉक्टर जब्बार पटेल (२)
'सामना’ची कथा, पटकथा आणि संवाद सगळं तेंडुलकरांचं. एक तर सामना त्यांनी थेट पटकथेच्या रूपातच लिहिला होता. सामनाचा दिग्दर्शक म्हणून आलेला अनुभव सांगताना डॉ. जब्बार पटेल सांगतात,"खरं तर सामनाचं सर्व क्रेडिट तेंडुलकरांना; कारण सामना हे मी निवडलेलं कथानक नाही, खरं तर त्यांनीच मला निवडलं. त्याचबरोबर सामनातील प्रमुख कलाकार तेंडुलकरांनीच निवडलेले. तसंच, मी कथानकाला कुठेही वळण दिलेलं नाही; तेंडुलकरांचा त्यामागचा सोशिओ-पोलिटिकल विचार जास्तीत जास्त खोलवर पोहोचवण्याचं काम मला काटेकोरपणे करायचं होतं, इतकंच"..
आता सर्व काही समोर होतं. पटकथा, कलाकार मग लक्ष दयायचं होतं तांत्रिक गोष्टींकडे. पण सिनेमाच्या तांत्रिक बाबी बारकाव्याने त्यांना त्या वेळी फारशा माहीत नव्हत्या. अशा वेळी समर नखाते हा त्यांचा मित्र त्यांच्या डोळ्यासमोर आला. त्याला त्यांनी सांगितलं की, ‘समर, मला लेन्स फारशा कळत नाहीत आणि शॉट डिव्हिजनचा कॉन्फिडन्स नाही. गड्या, तू मला मदत केली पाहिजेस.’’ ते तयार झाले व ती जबाबदारी त्यांनी प्रेमाने पार पाडली आणि म्हणूनच समर हाच माझा यातला पहिला गुरू असं डॉक्टर जब्बार पटेल आजसुद्धा अभिमानानं सांगतात.
मग गोष्ट येते या चित्रपटातील संगीत आणि गाण्याची.
चित्रपटात एका जागी मास्तरांच्या भटकंतीच्या पार्श्वभूमीवर एक गाणं हवं होत. मनासारखं काही जमत नव्हतं. अशातच एके दिवशी दौंडला जाताना रेल्वेस्टेशनवर जब्बार पटेलांना दिवाळी अंक आलेले दिसले. त्यांनी एक अंक घेतला. त्यात आरती प्रभूंची ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ ही कविता त्यांना दिसता क्षणीच आवडली. मग दोन, तीन वेळा ती कविता त्यांनी वाचली आणि चक्क गाडी सोडून दिली... पत्नीला कळवलं,"दोन तासांनी पुढची गाडी आहे, मग येतो." भास्कर चंदावरकरांना फोन केला,'जरा भेटू यांत'.त्यांना पण कविता आवडली. मग लगेच आरती प्रभूंना फोन केला... त्यांना सगळी कथा सांगितली. ते म्हणाले, ‘‘अरे वा! मला चालेल ना, तेंडुलकरांना विचारा आणि करा.’’ असं करून मग ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे सामनाचं शीर्षकगीत झालं...
चित्रपटाच्या मुहूर्ताची तयारी झाली. मुहूर्ताच्या आदल्या दिवशी जब्बार पटेल भालजी पेंढारकर यांच्या (कोल्हापूर) स्टुडिओत गेले. त्यांची ती पहिली भेट. ते म्हणाले, ‘‘तुम्ही घाशीराम केलंय, तुमचं लोक खूप कौतुक करतायत. कोल्हापूरला एक दोनदा येऊन गेलंय तुमचं नाटक, पण पाहायचा योग आलेला नाही, असो. तुमच्या कामाबद्दल मात्र कौतुक ऐकलंय.मी येईन मुहूर्ताला." भालजींचे आभार मानून ते निघणार इतक्यात भालजी पेंढारकर म्हणाले, ‘‘अरे, लताला पण बोलवाना तुमच्या उद्घाटनाला...’’लता (असं) म्हटल्यावर एक क्षण डॉक्टर थांबले , त्यांना कळेना नक्की काय म्हणतायेत ते. इतक्यात त्यांनी लताला आवाज दिला आणि म्हणाले ‘‘अरे, लता आलीय... दोन-तीन दिवस मुक्काम आहे. तिला निमंत्रण दे , ती येईल!’’ आणि साक्षात लता मंगेशकर बाहेर आल्या ! जब्बार पटेलांचा आपल्या डोळयांवर विश्वास बसेना.
त्यांनी नमस्कार करून परिचय सांगितला त्यावर दीदी म्हणाल्या, ‘‘तुमच्याबद्दल ऐकलंय. बाळ(हृदयनाथ)सांगत असतो... मग त्यांनी दीदींना आमंत्रण दिलं.त्या म्हणाल्या, ‘‘मी येऊन काय करू?’’ तर भालजी बाबा म्हणाले, ‘‘अगं, तू कॅमेरा स्टार्ट कर.’’ दीदी तयार झाल्या. डॉक्टर अचंबित झाले. आपल्या पहिल्या सिनेमाच्या वेळी केवढे योगायोग घडत आहेत, असं त्यांना वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे बाबा व लतादीदी आले, मुहूर्त झाला.
मुहूर्ताच्या दिवशी चित्रीकरण झाल्यावर व्हरांड्यात दीदी चहा पीत बसल्या होत्या. तेव्हा जब्बार पटेल यांनी हिम्मत केली आणि ते तिथे गेले. दीदींना नमस्कार केला. दीदी म्हणाल्या, "मुहूर्त छान झाला.’’ त्यावर ते म्हणाले ‘‘पण एक टेन्शन आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘काय?’’ जब्बार साहेब म्हणाले, "आम्ही जगदीश खेबुडकरांकडून दोन गाणी लिहून घेतलीत. त्यातल्या एका गाण्यासाठी माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही. फार महत्त्वाचं गाणं आहे ते ’’.. त्या जब्बार पटेलांकडे बघायलाच लागल्या, एक नवखा माणूस गाणं मागतोय.
थोडं थांबून त्या म्हणाल्या, ‘‘बघू, काय गाणं लिहिलंय जगदीश खेबुडकरांनी...?’’ आणि चक्क जब्बार पटेलांनी ते गाणं त्यांना गाऊन दाखवलं. ते गाणं होतं, "सख्या रे, सख्या रेऽ, सख्या रेऽऽ घायाळ मी हरिणी" चाल दिली होती भास्कर चंदावरकर यांनी. गाणं झालं आणि दीदींनी एक दीर्घ पॉज घेतला व म्हणाल्या, ‘‘जब्बार, मला आवडलंय हे गाणं... तारीख कोणती देता येईल हे बघावं लागेल.’’ त्या एकदम तयार झाल्या आणि जब्बार पटेल लताजींच्या या होकाराने प्रचंड आनंदित झाले.
पुण्यात आल्यावर या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता, ना भास्कर चंदावरकर यांचा ना रामदास फुटाणे यांचा. शिवाय त्यागाण्याच्या मानधनाचं एक वेगळं टेन्शन कारण इकडून तिकडून पैसे गोळा करत सिनेमा बनत होता.
दीदींनी तारीख दिली. रेकॉर्डिंग ची तयारी झाली. इतक्यात दीदींचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘आज जरा आवाज बरा नाही... पुन्हा तारीख देते. त्याप्रमाणे करू या...’’ हा फोन ऐकून भास्कर चंदावरकर म्हणाले, ‘‘मी म्हणालो होतो ना की, हे काही खरं नाही?’’ जब्बार पटेलांनी त्यांना समजावलं त्या नक्की गाणं गातील आपल्या चित्रपटासाठी. पुढे त्यांची परत तारीख मिळाली आणि पहिल्याच टेक मध्ये गाणं ओके झालं. तोवर मानधनाबद्दल काहीच बोलणं झालं नव्हतं. जब्बार पटेलांनी त्यांना विचारलं, ‘‘दीदी, आम्हाला मानधन किती घेणार ते सांगा..’’ त्या म्हणाल्या, ‘‘हा तुमचा पहिलाच सिनेमा आहे. एक गुलाबाचं फूल घेईन मी,’’ सगळे जण आश्चर्यचकित झालो. हि आठवण सांगताना जब्बार पटेल म्हणाले होते, "यानिमित्ताने दीदींच्या मनाचा मोठेपणा सांगितला पाहिजे तो असा की, त्यांनी आजतागायत म्हणजे माझ्या ‘उंबरठा’ सिनेमापर्यंत एक पैसाही मानधन माझ्याकडून घेतलेलं नाही "...
( क्रमशः)
No comments:
Post a Comment