Thursday, July 30, 2020

#५०# गीत रामायण .. गदिमा आणि बाबूजी

'गीत रामायण’ हा एक चमत्कार आहे, संगीत आणि शब्दांचं सुंदर प्रारब्ध आहे ! चांगल्या अर्थानं असं म्हणावं लागेल की बाबुजी आणि गदिमांना झपाटलं होतं. ते झपाटणं कलात्मकेच्या अत्युच्च पातळीवर गेलं नसतं, तर ‘गीत रामायण’ झालंच नसतं. पन्नासहून अधिक गाणी, प्रसंगानुरूप, अर्थानुरूप करणं हे सोपं काम नाहीच. त्यात विषय आहे, तो काळ आहे, त्या काळाला अनुरूप असे शब्द निवडण्याचं कसब आहे आणि संपूर्ण कथेला प्रवाहीपण देताना सुश्राव्य चाली देणं ही परीक्षाही आहे. बरं हे व्यक्त करायला केवळ ध्वनी हे एकच माध्यम आहे. हे अवघड होतं. म्हणूनच ते दैवी आहे. यांत कौतुक आहे आकाशवाणी सारख्या माध्यमाचं सुद्धा, त्या काळी हे धाडस केलं आणि हा चमत्कार श्रोत्यांपर्यंत पोहोचवला.

साधारण 1953 साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी 28000 श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण 56 गीतांत शब्दबध्द केली आहे.गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

गदिमा आणि बाबूजींच्या गाण्याविषयीच्या आठवणींमध्ये आज ‘सेतू बांधा रे सागरी’ या गीतरामायणातील एका गाण्याची खास आठवण…

आकाशवाणीवर जेव्हा गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा रेडिओच्या इतिहासात न भूतो न भविष्यती, असा पत्रांचा पाऊस पडला. यावेळची ‘सेतू बांधा रे सागरी’ या गाण्याची विशेष आठवण आहे. या गाण्यासाठी जास्त वादकांची गरज होती आणि आकाशवाणीचा स्टुडिओ फार लहान होता. त्यामुळे या गाण्याचं रेकॉर्डिंग करत असताना वादकांना स्टुडिओचं दार उघडं ठेवून बाहेरच्या पॅसेजमध्ये बसवलं होतं. बाबूजींनी तालवाद्यांत ढील वगैरे सारखी परंपरागत वाद्य हवी होती, पण ती उपलब्ध नव्हती. तेव्हा त्यांनी साईड ड्रम, बेस ड्रम या पाश्चिमात्य वाद्यांचा वापर केला, पण त्यातून निर्माण होणार संगीत हे पारंपरिक (भारतीय ) वाटेल याकडे लक्ष दिल्याने म्युझिकचा उत्तम बॅलन्स साधला गेला आणि जन्मलं एक अप्रतिम संगीत !!!!

No comments:

Post a Comment