#23# मोहम्मद रफी़
अमृतसर जवळ कोटला सुलतानपूर या छोट्याशा प्रांतात रोज एक फकीर फार सुंदर आवाजात एकताऱ्यावर पंजाबी भजनं म्हणत गावामध्ये फिरत असे. त्याच्या मागे मागे एक सात आठ वर्षाचा मुलगा रोज जात असे. जी जी गाणी तो फकीर म्हणे तसं अगदी हुबेहूब तो मुलगा आपल्या गोड आवाजात ते गाणं पुन्हा म्हणे. गावातल्या लोकांनाही त्याचे गाणे आवडू लागले. त्या फकिराने सुद्धा एक दिवस त्या मुलाला आशिर्वाद दिला, 'एक दिन बडा गायक बनोगे'.. हा छोटा मुलगा म्हणजेच बुलंद आवाजाचा बादशहा मोहमद रफी !!
काही दिवसांनी हे कुटुंब लाहोरला गेले. त्यावेळी साधारण तेरा चौदा वर्षांचं वय असेल रफीजींच! त्यांनी बडे गुलाम अली खाँ, वाहीद खाँ, पंडीत जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजाम यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेतली.
एकदा रफीजींच्या भावाचे मित्र अब्दुल हमीद त्यांना ऑल इंडिया रेडियो येथे के एल सैगल यांच्या कार्यक्रमाला घेऊन गेले. दुर्दैवाने तिथली वीज गेल्यामुळे सैगल यांचा कार्यक्रम वेळेत सुरू झाला नाही.
प्रेक्षक केव्हाचे येऊन बसलेले. थोड्या वेळाने प्रेक्षागृहात चुळबुळ सुरु झाली म्हणुन हमीद यांनी वीज येई पर्यंत रफीजींना गाऊ द्यावे अशी व्यवस्थापकांना विनंती केली. प्रेक्षकांनी गोंधळ घालू नये म्हणून त्यांनी पण ती मान्य केली. आणि रफीजींना आपली गायन प्रतिभा पहिल्यांदा दाखविण्याची संधी मिळाली. तेव्हा प्रेक्षकांमधे संगीतकार श्यामसुंदर पण होते. त्यांना रफीजींचे गाणे खूपच भावले. त्यांनी रफीजींचा वकूब जाणला आणि त्यांना मुंबईला बोलावले. नंतर रफी साहेब मुंबईला पोहोचले आणि सुरू झाली एक अनोखी सफर !!!
No comments:
Post a Comment