Thursday, July 30, 2020

#२५# रफी़ साहेब आणि लक्ष्मीप्यारेजी

१९५० ते १९७० हा काळ रफीजींनी 
अक्षरशः गाजवला. प्रत्येक नायकाला वाटे आपलं गाणं रफीजींनीच गावं.

१९६० मधे आलेल्या 'चौदहवी का चाँद' मधे "चौदहवी का चाँद हो या आफताब हो" या सुंदर गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. संगीत रवी यांच होतं. हे गाणं ऐकताना रफीजींचे मधाळ स्वर कानात साठवायचे की वहिदाजींचे निरागस सौंदर्य न्याहाळायचं हा प्रश्न आपल्याला कायमच पडतो.

त्यानंतर जंगली, काजल , दो बदन, कश्मीर की कली, प्रोफेसर, आरजू, ससुराल, अशा अनेक चित्रपटातील त्यांची गाणी प्रचंड गाजू लागली. रफीजींना ससुराल या चित्रपटातल्या 'तेरी प्यारी प्यारी सूरत को किसिकी नजर ना लगे चश्मेबद्दूर', या गाण्यासाठी दुसरे फिल्मफेअर  मिळाले. 

१९६३ मधे लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांची सुरुवातच 'पारसमणी' या चित्रपटाच्या 'वो जब याद आहे बहोत याद आए',  या लतादीदी व रफीजींच्या अप्रतिम गाण्याने झाली. रफीजी अतिशय सह्रदयी होते. ते ऐकून होते की ही जोडी अतिशय खडतर परिस्थितीतून संघर्ष करुन इथवर आली आहे. लक्ष्मीजी व प्यारेंलाल यांनी जेव्हा रेकॉर्डिंग नंतर रफीजींच्या हातावर १०००/- रुपये मानधन ठेवले तेव्हा रफीजींनी खिशातून अजून २ रुपये काढले आणि दोघांच्या हातात ५०१/५०१ रुपये पुढच्या वाटचाली साठी आशिर्वाद म्हणून दिले !! 

हि आठवण खुद्द प्यारेलालजीं कडून ऐकतांना त्यांचे पाणावलेले डोळे दिसले आणि वाटलं किती लाखमोलाची माणसं होती आणि आहेत ही  !!!

( मागच्या वर्षी Symbiosis मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला प्यारेलालजी आले होते, तेव्हा त्यांनी ही आठवण सांगितली होती)



No comments:

Post a Comment