#३९# पद्मभूषण खय्याम (३)
साठच्या दशकात खय्याम आणि साहिर लुधियानवी यांची मैत्री छान बहरली, मित्र म्हणून ते एकमेकांच्या खूप जवळ होते. १९५८ मध्ये जेव्हा रमेश सेहेगल राजकपूर बरोबर 'फिर सुबह होगी' हा चित्रपट करत होते तेव्हा त्यांनी साहिर यांना गीतकार म्हणून घेतलं. साहिर यांनी खय्याम यांचं नाव संगीतकार म्हणून सुचवलं पण रमेश सेहेगल यांना माहित होतं कि राजकपूर शंकर जयकिशन शिवाय दुसऱ्या कोणत्याही संगीतकारासाठी तयार होणार नाहीत. झालंही तसंच पण काही करून राज कपूरला एकदा खय्यामला भेटण्यासाठी तयार केलं गेलं.
खय्याम आले तेव्हा राजकपूर यांनी एक तानपुरा खय्याम यांना दिला आणि सांगितलं हा तानपुरा लता दीदींनी दिला आहे आणि अजून कधीच वापरला नाहीये. तो वापरून काही धून ऐकवा. खय्याम साहेबांनी तिथेच त्या बैठकीत तानपुरा घेतला आणि काही धून तयार करून ऐकवल्या. राजकपूरला त्या आवडल्या आणि ते काम खय्याम यांना मिळालं. तो सिनेमा ती गाणी खूप गाजली.
खय्याम यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, मुकेश, शमशाद बेगम, रफी साहेब असा बेहतरीन गायकांबरोबर काम केलं. ते आशाताई आणि लतादीदींबद्दल म्हणायचे, "मैं इन दो बहनों के लिए कहूंगा कि एक संगीत की पटरानी हैं तो दूसरी महारानी"..
खय्याम म्हटलं कि आठवतात हि गाणी .. 'फिर छिडी रात बात फुलोंकी', 'शाम ए गम कि कसम', 'ए दिले नादान' , 'दिल चीज क्या है आप मेरी', 'आँखो में हमने आपके सपने सजाये है',' कभी कभी मेरे दिल में खयाल आता है '...
मागच्या वर्षी खय्याम साहेब गेले. जातांना त्यांनी आपली सगळी इस्टेट अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या एका ट्रस्टला दिली आणि संगीताची हि अनमोल देणगी , ठेवा ते आपल्याला देऊन गेले ...
No comments:
Post a Comment