Thursday, July 30, 2020

#३०# गीतकार शैलेंद्र

शैलेंद्रजींचे खरे नाव शंकर केसरीलाल. त्यांचा जन्म ३०.०८.१९२३ रोजी रावळपिंडी येथे झाला. तसे मूळचे हे कुटुंब बिहारचे. नंतर मथुरा येथे वास्तव्य होते.घरची परिस्थिती बेताची होती. शाळेत असल्या पासून त्यांना कविता करण्याची आवड होती. जेमतेम शिक्षण झालं, रेल्वेची परीक्षा दिली, नोकरी मिळाली व पहिली पोस्टींग झाली झाशी येथे. नंतर मुंबईला बदली झाली व रेल्वेच्या माटुंगा यार्डात वेल्डर म्हणून काम सुरू झालं. तरीही त्या रुक्ष जागी सुद्धा त्यांना कविता सुचायची हे विशेष !

नोकरी चालू असतांना त्यांचे कवीमन स्वस्थ बसले नव्हते.'इप्टाच्या 'सर्व मुशायऱ्यांंना ते हजर रहायचे. एकदा एका मुशायऱ्यात राजकपूर यांनी शेलेंद्रजींची 'जलता है पंजाब' ही कविता ऐकली. त्यावेळेस त्यांनी शैलेंद्रजींना भेटून 'आग' चित्रपटासाठी गीत लेखन करणार का, असं विचारलं. शैलेंद्रजींनी सांगितलं मी एक साधा सुधा वेल्डर, सिनेमासाठी कशी गाणी लिहीणारं, मला गीतलेखन जमणार नाही. राजजी म्हणाले ठीक आहे पण जेव्हा केव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा माझ्याकडे नक्की ये.

काही दिवसांनंतर शैलेंद्रजींना बायकोला बाळंतपणासाठी झाशीला पाठवायचे होते. पैशाची निकड होती. तेव्हा ते राजजींच्या ऑफिस मधे गेले. राजजींनी 500 रुपये दिले. शैलेंद्रजी तीन महिन्यांनी पैसे परत करायला गेले असता राजजींनी ते घेतले नाहीत पण त्यांच्या 'बरसात' चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासंबंधी विचारले. तेव्हा 'बरसात' ची फक्त दोन गाणी लिहायची होती. बाकीची हसरतजींनी लिहिली होती. शैलेंद्रजीनी होकार दिला आणि गाणी लिहिली, 'बरसातमें हमसे मिले तुम सजन', आणि "पतली कमर है तिरछी नजर है'... दोन्ही गाणी हिट झाली आणि त्यांची गीतकार शैलेंद्र अशी नवीन ओळख निर्माण झाली !



No comments:

Post a Comment