Thursday, July 30, 2020

#२०# मुघल-ए-आझम आणि Perfectionist के. असिफ 

'माझी अनारकली कोटींमध्ये एक आहे जी सर्वांवर भारी पडेल'... के. असिफ यांनी हे स्वप्न पाहिलं होतं.

चित्रपटात लढाईवरुन विजयी होऊन परतणार्‍या सलीमला एक संगमरवरी पुतळा भेट देण्याचं अकबर ठरवतो. पण शिल्पकाराकडून मुदतीत पुतळा पूर्ण न झाल्यानं तो शिल्पकार एका अनुपम लावण्यवतीला पुतळा म्हणून उभं करतो. ती लावण्यवती म्हणजेच 'अनारकली'.

हा प्रसंग वास्तववादी दिसण्यासाठी मधुबालाच्या चेहऱ्यावर संगमरवरी लेप देण्यात आला होता. तिला पापण्याही हलवता येत नव्हत्या. मुंबईची दमट हवा आणि आर्कलाईटचा प्रखर झोत, शिवाय पुतळ्यावर म्हणजेच मधुबालावर पारदर्शक कापडाचं आवरण होते. मधुबाला हुबेहुब संगमरवराची मूर्ती भासावी म्हणून मधुबालाला रबर शीट यार्डपासून बनवलेला ड्रेस घालण्यात आला. पण त्याला अजिबात हवा आत जाण्याची सोय नसल्याने प्रचंड उष्णतेने ती गुदमरू लागली. तेव्हा तो ड्रेस उतरवून त्याला मागच्या बाजूने, हवा खेळती राहण्यासाठी लहान लहान भोकं पाडण्यात आली. हा ड्रेस घालून आणि त्यावर पारदर्शक कापडाचं आवरण घालून चित्रीकरण करण्यात आलं. सिनेमात हा पुतळा पाहून मुर्तीकाराची तारीफ करणार्‍या अकबराला सलाम करायला मधुबाला पुढे येते तेव्हा अक्षरश: संगमरवराचा पुतळाच सजीव होतोय असं वाटतं व एक रम्य कवी कल्पना प्रत्यक्षात उतरते. 

गाण्याच्या चित्रिकरणात मधुबालाच्या हातापायात खरे लोखंडी साखळदंड अडकवून अनेक रिटेकसह चित्रिकरण करण्यात आलं होतं. यामुळे तिच्या नितळ आणि मुलायम कांतीवर काळेनिळे डाग पडले. आपल्या मुलीच्या शरीरावरचे ते डाग पाहून तिचे वडील अताउल्ला खूप चिडले. कलादिग्दर्शक कचकड्याचे रंगवलेले साखळदंड लोखंडी साखळदंड असल्याचा आभास सहज निर्माण करु शकतील असा पर्यायही त्यांनी सुचवला पण वास्तववादाचं वेड रक्तात भिनलेले आसिफ भाई आपल्या कार्यपध्दतीवर ठाम राहिले आणि खास गोष्ट म्हणजे खुद्द मधुबालानेही के. आसिफना याबाबत पाठिंबा दिला.

अनारकलीला ज्या भिंतीत मारण्याची शिक्षा अकबर देतो, त्या शॉटसाठी असिफभाईंनी शापूरजींकडे ( निर्माते) ५० हजार रुपये मागितले. स्वत: मोठे बिल्डर असल्याने १९५५-५६ च्या काळात अशा भिंतीला ५ हजार खर्च येतो याची खात्री असल्याने शापूरजींनी यावर स्पष्टीकरण मागितलं. तेव्हा असिफभाई म्हणाले की या भिंतीसाठी जबलपूर येथील संगमरवराचा दगड असेल आणि त्याचा कारागीरही तिकडचाच असेल, तेव्हाच हे दृश्य वास्तवदर्शी वाटेल. असिफचे हे स्पष्टिकरण ऐकून शापूरजींनी त्याला ५० हजार रुपये दिले.



के.असिफ यांच्या वेडाचं अजून एक उदाहरण म्हणजे फक्त एका गाण्याच्या शूटिंग करता उभा केलेला 'शिशमहाल' चा सेट आणि त्या सेट वरील 'प्यार किया तो डरना क्या' या गाण्याचं शूट ... याबद्दल उद्या ..

No comments:

Post a Comment