Thursday, July 30, 2020

#१९# मुगल-ए-आझम आणि बडे गुलाम अली खाँ साहेब

अनारकली सलिमला भेटायला जाते तेव्हा महालातले दिवे उजळायला लागलेले असतात आणि बादशहाच्या दरबारातून येतं असतो तानसेनचा स्वर. एकीकडे दिलीप कुमार आणि मधुबालाचा तो सुप्रसिद्ध रोमॅन्टिक सीन (चेहर्‍यावरुन पिस फिरवताना ) आणि दुसरीकडे शेजारच्या महालातून ऐकू येणारं तानसेनचं गाणं.
या सीन करता तानसेनच्या आवाजाच्या तोडीची आलापी हवी म्हणून के. असीफ यांनी नौशादला सांगताच असा आवाज असलेलं संगीतरत्न म्हणजे बडे गुलाम अली खाँ साहेब असं नौशादजींनी सुचवलं. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड मान्य नसलेले के. असीफ बडे गुलाम अली खाँ साहेबांकडे पोहोचले. 'चित्रपटासाठी मी गात नाही', असं सांगत खाँ साहेबांनी हा प्रस्ताव नाकारला. असीफसाहेबांनी पण चिकाटी न सोडता आग्रह चालू ठेवला तेंव्हा त्यांना टाळण्यासाठी आपल्या तीन तासांच्या महफिलीची मानधनाची रक्कम म्हणजे पंचवीस हजार एका गाण्याचे घेईन असे खाँ साहेबांनी के. असिफला सांगितलं. अहो त्या काळात लताजी रफीसाहेब यांसारखी मंडळी एका गाण्याचे ४००० रूपये मानधन घेत, त्या काळात एका गाण्याला पंचवीस हजार ? असीफ साहेबांनी खिशातून दहा हजारांचं बंडल काढून खाँसाहेबापुढे ठेवत म्हटलं, “बस्स एवढेच? खाँसाहेब आपण बेशकीमती आहात आणि आपल्या आवाजासाठी पैसा किती हा मुद्दाच गौण आहे. हि पेशगी आहे, बाकी रक्कम उद्या रेकॉर्डिंगच्या वेळी मिळेल".. 
असीफजींच्या वेडाने आणि दानतीने अवाक् झालेले खाँ साहेब दुसर्‍या दिवशी त्यांच्या तबलानवाझ निजामुद्दीन खाँ ना घेऊन स्टुडिओत पोहोचले आणि नौशादजींनी सोहनी रागात बांधलेली 'प्रेम जोगन बन जा' हि ठुमरी गाऊन ध्वनीमुद्रित केली. पण ती ऐकल्यावर असीफजी अस्वस्थ झाले. सलीम-अनारकलीच्या त्या प्रणय प्रसंगाला साजेशी मुलायम आलापीवाली नजाकतभरी ठुमरी हवी  आहे, अशी नाही. कल्पना करा , काय प्रसंग घडला असेल .. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या मेरुमणी असलेल्या खाँ साहेबांना एक डायरेक्टर सांगतो की ठुमरी कशी हवी ? भडकलेल्या खाँ साहेबांनी चिडून के. असीफला सांगितलं मला तो प्रसंग पडद्यावर दाखवा, ‘फिर हम तय करेंगे’ ..  झालं, तो प्रसंग खाँ साहेबांसमोर प्रोजेक्ट केला गेला . त्यातला मधुबालाचा अभिनय बघून खाँसाहेब हरखून गेले व म्हणाले, “अमा निजामुद्दीन मियाँ क्या खूबसूरती है, जैसे आसमानसे परी उतर आयी हो। असीफ सही केह गया, इसके लिए आलापी वाकई मलमलसी मुलायम होनी चाहिये।  नौशादभाई चलो फिरसे गातें हैं हम” आणि खाँ साहेबांनी परत नव्याने तब्येतीत गायलेली ही ठुमरी पुन्हा ध्वनीमुद्रित करण्यात आली. तो सीन अजरामर करण्यामागे बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या गाण्याची पण जादू आहे !!!

No comments:

Post a Comment