Thursday, July 30, 2020

#३८#पद्मभूषण खय्याम (२)

'रझिया सुलतान' १९८३ साली रिलीज झाला पण गाण्याचं रेकॉर्डिंग १९७६ सालीच झालेलं होतं. या रेकॉर्डिंग नंतर 'ए दिले नादान' ची किर्ती वणव्यासारखी बॉलिवूडमध्ये पसरली.अमिताभ तेंव्हा यश चोप्रांसोबत 'कभी कभी' साठी काम करत होते. यश चोप्रांनी खय्यामला निश्चित केलं आणि कभी कभीच्या गाण्यांनी इतिहास घडवला. याच गाण्यांसाठी त्यांना त्या वर्षीचा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर मग त्रिशूल, नुरी या सिनेमांसाठी सुद्धा खय्यामने संगीत दिलं. यशजींच्या पुढच्या सिनेमाला 'कथा आवडली नाही' म्हणून खय्यामने नकार दिला आणि हा "सिलसिला" इथेच थांबला. 

खय्यामने लताजींपेक्षा आशा ताईंसोबत अधिक काम केलं याबद्दल त्यांना एका मुलाखतीत विचारलं तेव्हा ते म्हणाले, "क्या करे, उन दिनो लताजी कि डेट्स मिलना बहोत मुश्किल था." खय्याम सांगतात, १९८१ साली मुझफ्फर अलींच्या 'उमराव जान' साठी काम करतांना त्यांना खूप टेन्शन आलं होतं कारण 'पाकिजा' सारखी हिट फिल्म आणि त्यातील गुलाम मोहम्मद यांचं संगीत ऐकल्यानंतर ते स्वाभाविक होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली. आपल्या गाण्यांसाठी आशाताईं शिवाय दुसरं कोणतच नाव त्यांच्या समोर नव्हतं. खय्यामजींनी  आशाताईंना पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं, "हमे आशा नही, उमराव जान चाहिये". आशाताईंचा तेंव्हा कठीण काळ होता पण "उमराव जान" ने त्यांना सावरलं. पडद्यावर साक्षात रेखा आणि आशाताईंच्या आवाजातील बहारदार गाणी यामुळे सिनेमा सुपरहिट ठरला. सर्वश्रेष्ठ संगीतकार हा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार त्यांना याच चित्रपटाने दिला. ख़य्याम म्हणायचे, "रेखा ने मेरे संगीत में जान डाल दी,  उनके अभिनय को देखकर लगता है कि रेखा पिछले जन्म में उमराव जान ही थी"...  त्यानंतर बाजार, दर्द, थोडी सी बेवफाई या सिनेमांना सुद्धा खय्यामजींनी आपला खास असा जादुई टच दिला. त्याच एक उदाहरण म्हणजे, 'ठेहरीये होश में आ लू तो चले जाइयेगा, हूँ हूँ'... रफी साहेब यांच्या ओळींनंतर सुमन कल्याणपूर म्हणतात ते 'हूँ हूँ' खास खय्याम टच, प्रेमात पाडतं आपल्याला ...
  
एक खास गोष्ट म्हणजे शगुन चित्रपटातील 'तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो', उमराव जान मधील 'काहे को ब्याही बिदेस', बाजार मधील 'चले आओ सईंया रंगीले मैं वारी' आणि 'देख लो आज हमको जी भर के' ही गाणी कोणी म्हटली आहेत माहिती आहे का ? त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी.. 


No comments:

Post a Comment