Thursday, July 9, 2020

#१०# वहिदा रेहमान

'कुछ लोग ऐसे है जो हमारे दिलों पर गेहेरा निशान, गेहेरी छाप छोड़ के चल दिए जैसे मीनाकुमारी, नर्गिस , मधुबाला और इन में एक नाम और भी है वहिदाजी'.... किती छान ओळख आहे ना हि वहिदाजींची !

एकदा काही कामानिमित्त गुरुदत्त बंगलोरला गेले होते तेव्हा मनुभाई पटेल या फिल्म डिस्ट्रिब्युटर शी बोलतांना त्यांनी ते एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत असं सांगितलं. तेव्हा मनुभाईंनी वहिदाजींचं नाव सुचवलं. नुकत्याच रिलीज झालेल्या एका तेलगू चित्रपटातील त्यांच्या नृत्याचे तेव्हा खूप कौतुक होत होते. गुरुदत्तजींनी वहिदा रेहमान यांना मुंबईला भेटायला यायचा निरोप द्यायला सांगितलं.

हा निरोप वहिदाजींना दिला असता त्या मनुभाईंना म्हणाल्या 'कौन है ये गुरुदत्त, मै तो जानती भी नहीं ?' तेव्हा मनुभाईंनी गुरुदत्त हे खूप मोठे डायरेक्टर आहेत आणि त्यांना भेटलं तर हिंदी मध्ये काम मिळू शकेल असं सांगितलं. पुढच्या महिन्यात वहिदाजी आई सोबत मुंबईला पोहोचल्या.

ठरलेल्या वेळी त्या भेटायला गेल्या तेव्हा तिथे गुरुदत्त आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राज खोसला बसले होते. ओळख झाली, थोडी चर्चा झाली मग खोसला साहेब म्हणाले," वहिदाजी आपका नाम बदलना पडेगा 'वहिदा रेहमान' ये कोई हिरोईन का नाम लगता नहीं".. यावर वहिदाजी म्हणाल्या " अभी तक मैने दो तमिळ और दो तेलगू फिल्मोमें काम किया है और वो भी इसी नाम से, मैं अपना नाम नहीं बदलूँगी।" तेव्हा खोसला साहेबांनी त्यांना समजावयाचा प्रयत्न केला. नर्गिस मधुबाला ,कामिनी कौशल अशी काही उदाहरणं दिली तरीही वहिदाजी तयार झाल्या नाहीत. तेव्हा त्यांच वय होतं केवळ अठरा. त्यांच हे संपूर्ण संभाषण गुरुदत्त पाहात होते, ऐकत होते. त्यांच्या या वयातील ठामपणा पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट सही करायला वहिदाजींना यायला सांगितलं. परीक्षा वहिदाजींची आहे कि गुरुदत्त यांची हा प्रश्न संपूर्ण युनिटला पडावा असा एक बेहतरीन किस्सा दुसऱ्या दिवशी घडला.

कॉन्ट्रॅक्ट सही करायला आल्यावर वहिदाजींनी ते पाहिलं आणि अजून एक clause घालायला सांगितलं. हे ऐकून राज खोसला आश्चर्यचकित झाले. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला कि नवीन कलाकार फक्त कॉन्ट्रॅक्ट सही करतात, कोणताही clause हवा असं सांगू शकत नाहीत. त्यावर वहिदाजी म्हणाल्या त्यांना तो clause हवाच आहे. मग काय गुरुदत्त यांनी विचारलं कोणता clause हवा आहे. त्यावर वहिदाजी म्हणाल्या,"इस फ़िल्म में जो costume मुझे दिये जायेंगे वो मुझे पसंद नहीं आए तो मै नहीं पेहेनूंगी ".. आता मात्र गुरुदत्तजींना पण समजेना काय करावं. त्यांत भर म्हणजे वहिदाजींनी गुरुदत्त यांचा एकही सिनेमा तोवर पाहिला नव्हता.

मग काय गुरुदत्त म्हणाले " आपने मेरी कोई फिल्म देखी नहीं है।  आप एक काम कीजिये मेरी फिल्म Mr and Mrs 55 जो अभी अभी रिलीज हुई है वो देखकर आइए तो आपको पता चलेगा मै कैसी फिल्मे बनाता हूँ।  पता नहीं आपके मन में क्या ख़ौफ़ है। " आणि चक्क दोन टिकिट काढून वहिदाजी आणि त्यांच्या आईला तो सिनेमा पाहायला पाठवण्यात आलं.

हे पाहून राज खोसला चिडले आणि गुरुदत्त ना म्हणाले, ' ये इस लडकी कि पेहेली और आखरी फिल्म होगी।  ये तेवर नहीं चलेगा।' (पण हा राग त्या क्षणापुरता होता कारण दोन वर्षांनी आपल्या सोलवा साल या चित्रपटात त्यांनी वहिदाजींनाच घेतलं )

चित्रपट पाहून आल्यावर वहिदाजीनी ते कॉन्ट्रैक्ट सही करायचं ठरवलं पण तो clause चा हट्ट काही सोडला नाही आणि तो घालूनच कॉन्ट्रॅक्ट सही केलं, तो चित्रपट केला. त्यांच्या त्या भूमिकेचं खुप कौतुक झालं,  हिरोइन पेक्षा जास्त appriciation त्यांना मिळालं. तो सिनेमा होता CID (१९५६) आणि त्यातील गाजलेलं गाणं होतं, " कही पे निगाहे कही पे निशाना"..



No comments:

Post a Comment