#३४# साहिर(२)
साहिरच्या शायरीमुळे तो हळूहळू प्रसिद्ध होत होता. १९४३ मध्ये तल्ख़ियाँ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि साहिरला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. ‘आजादी की राह पर' सिनेमात गाणी लिहिण्याचं काम मिळालं. साहिर त्याचा मित्र हमीद अख्तर बरोबर मुंबईला आला. मुंबईत साहिरचा परिचय मजरूह सुलतानपुरी, कैफी आज़मी, मजाज लखनवी अशा अनेक थोर शायर मंडळींशी झाला.
मंडळी १९५२ ला एक सिनेमा आला ‘नौजवान’. याची गीतं चालीवर लिहिण्याचं काम मजाज लखनवीकडे देण्यात आलं. पण हे काम न जमल्याने त्याने ते साहिरला दिलं. ‘ठंडी हवाएँ, लहराके आएँ, रुत है जवाँ, तुमको यहाँ कैसे बुलाएँ?’ हे गाणं खुप गाजलं आणि नौजवान ने साहिरसाठी पायघड्या घातल्या.पाठोपाठ ‘सजा’, ‘जाल’, ‘बाजी’, ‘सी.आय्.डी’. अशी अनेक शिखरं साहिरने पादाक्रांत केली.अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्तच्या ‘बाजी’ या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले…’ या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. अभिनेते देव आनंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.
प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे हे त्यांच वैशिष्ट्य ज्यामुळे त्यांच्या गाण्याचा कॅनव्हास खूप मोठा व्हायचा.
गुरुदत्तचा ‘प्यासा’ हा चित्रपट म्हणजे साहिर - एस.डी. बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळस होता. साहिरचं ‘तल्ख़ियाँ’ वाचून प्रभावित झालेल्या गुरुदत्तला प्यासा हिच एका कवीच्या जीवनाची शोकांतिका सुचली आणि या सिनेमात त्याने याच काव्यसंग्रहातली अनेक कविता वापरल्या. मात्र, ‘प्यासा’ चे यश हे फक्त त्यातील गीतरचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते आणि ते बर्मनदांच्या जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण प्यासा तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या.१९५७ ला ‘प्यासा’ मिनर्व्हाला प्रदर्शित झाला. पडद्यावर गुरूदत्त जेव्हा ‘यहाँ पीर भी आ चुके है, जवान भी आया’ गाऊ लागे तेव्हा थिएटरमधे तमाम प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवंत.
प्यासा चित्रपटावर काम करत असताना गुरुदत्त व कॅमेरामन व्हि.के.मूर्ती वेश्यावस्तीत काही दिवस जावून फिरून आलेले. दिलीप कुमारने नायकाच्या रोलला नाही म्हणतांना गुरुदत्तलाच 'इतनी डिटेल्ड स्टडीके बाद मुझसेभी ज्यादा तूही ये किरदार बखुबी निभाएगा, व्हाय डोण्ट यू डू इट ?' असं म्हणत त्यालाच बोहल्यावर उभा केला. मुहूर्ताच्या शॉटला साहिरने एन्ट्री घेत गुरुदत्तला ओळी ऐकवल्या, "ये गलियाँ, ये बदनाम बाज़ार, ये गुमनाम राही, ये सिक्कोंकी झनकार, ये किस्मत के सौदे, ये सौदोंपे तकरार.. जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है? ये फूलों के गज़रे, ये पीकों के छींटे, ये बेबाक नजरें ये गुस्ताख़ फिकरे, ये ढलके बदन और ये बीमार चेहरे , जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है?ज्या सिच्युएशनसाठी, शॉटस् व शूटिंग योजना ठरवण्यासाठी ५-६ दिवस रेडलाईट एरियात गुरुदत्त व मूर्ती वणवण भटकले होते त्याचं मर्म कुठेहि न जाता साहिरने ते आठ ओळीत उभं केलं होतं . मला सांगा, साहिर का नाही हो म्हणणार की प्यासा साहिरमुळे चालला ?
साहिर बेफिकिरीत जगला. करिअरच्या अगदी सुरुवातीला लता मंगेशकरशी भांडला. परिणामी हाती असलेल्या ११ पैकी ९ चित्रपट हातातून गेले. पण त्याने कुणाची तमा—फिकीर बाळगली नाहि, त्याच बेफिकिरीचं त्याने गाणं केलं.....
No comments:
Post a Comment