#३२# शैलेंद्र (३)
एक दिवस फणीश्वरनाथ रेणू यांची 'मारे गए गुलफाम' ही कादंबरी शैलेंद्रजींनी वाचली. त्यांना ती कथा खूप आवडली व त्यावर चित्रपट निर्माण करण्याचे त्यांनी ठरवलं. सगळ्या जवळच्या मित्रांनी शक्य त्या मदतीची हमी दिली.पुढे या ना त्या कारणाने चित्रपट लांबत गेला. वर्षभरात बनणारा चित्रपट पाच वर्ष लांबला. बजेट तिपटी चौपटीने वाढले. त्यांचे सगळेच ठोकताळे चुकले. शैलेंद्रजींना निराशेने ग्रासले. तब्येत ढासळली. कसाबसा चित्रपट पूर्ण झाला पण चित्रपटाच्या प्रिमीअरला सुद्धा ते जाऊ शकले नाहीत. उत्तम कथा, अभिनय, उत्तम दिग्दर्शन, एकापेक्षा एक सुंदर गाणी. पण तो चित्रपट फारसा चालत नाही हे पाहून त्यांना अत्यंत निराशेने ग्रासले. त्याच सुमारास देव आनंदने 'ज्वेलथिफ' ची गाणी लिहिण्या साठी विचारले होते. शैलेंद्रजींनी फक्त 'रुलाके गया सपना मेरा', हे गीत लिहिले. नंतर "अब मुझसे नहीं होगा" असा निरोप दिला.
शैलेंद्रजींनी 'जीना यहां मरना यहाँ', या गाण्याचा फक्त अंतरा लिहिलेला होता. हॉस्पीटल मध्ये जाताना शैलेंद्रजी राजजींना म्हणाले, 'गाणे आल्यावर पूर्ण करतो'... पण ते परत आलेच नाहीत ... (त्यांच्या पश्चात पुढे त्यांचा मोठा मुलगा शैली शैलेंद्रने अंतरे पूर्ण केले)
१४ डिसेंबर १९६६ रोजी अवघ्या ४३व्या वर्षी त्यांनी या दुनियेचा निरोप घेतला. हा तोच दिवस, ज्याच्या बरोबर कामाला सुरवात केली, ज्याच्यासाठी उत्तमोत्तम गाणी लिहिली, जो त्यांना लाडाने पुष्किन म्हणायचा त्या राज कपूर चा वाढदिवस...
शैलेंद्रजींचे निधन झाले आणि या चित्रपटाला "राष्ट्रपती सुवर्ण पदक" मिळाले. पुढे हा चित्रपट तूफान चालला, गाजला...
No comments:
Post a Comment