Thursday, July 9, 2020



#5# विनोदी भूमिका करणारे केश्तो मुखर्जी 

बंगाली निर्माते ऋत्विक घटक यांनी बंगाली चित्रपटात त्यांना पहिले काम दिले तर नंतर १९५७ साली हिंदीत ऋषिकेष मुखर्जींनी 'मुसाफिर' चित्रपटांत रस्त्यावर नाच-गाणे करणाऱ्या तरुणाचे काम त्यांना दिले. "टेढी टेढी हमसे फिरे सारी दुनिया" हे या चित्रपटातील गाणं पाहिलं तर लक्षांत येईल की या गाण्यात पडद्यावर पेटी वाजवणारे आहेत गीतकार शैलेंद्र !
केश्टोंना कामाची गरज होती. एकदा ते बिमलरॉय यांच्याकडे काम मागायला गेले असता त्यांनी आत्ता काम नाही नंतर ये असे सांगितले. तरिही केश्टोंना तिथेच घुटमळताना पाहून बिमलदा त्रासिक स्वरात म्हणाले,"मला कुत्र्याचा आवाज काढणारा माणूस पाहिजे. तू काढतोस?" केश्टोंनी हुबहू कुत्र्याचा आवाज काढला. बिमलदा खुश झाले आणि त्यांना काम मिळालं. तो सिनेमा होता परख ..आपण तो सिनेमा पाहिला नाही पण त्यातील एक गाणं अनेकदा ऐकलंय, "ओsss सजना बरखा बहार आई '... 
१९७० च्या सुमारास दिग्दर्शक असित सेन यांनी त्यांच्या 'मां और ममता' मध्ये दारुड्याची भूमिका करणार का ? असे केश्टोंना विचारल्यावर त्यांनी क्षणात हो म्हटले. चरितार्थासाठी त्यांना कामाची गरज होतीच! त्यातला दारुडा अगदी अस्सल वटविल्यावर त्यांच्याकडे त्याच त्या प्रकारच्या भूमिका येत राहिल्या. निर्माते दिग्दर्शकांना जणू त्यांच्या आधिच्या निखळ विनोदी भूमिकांचा विसर पडला. आयुष्यभर दारुच्या थेंबालाही स्पर्श न केलेल्या केश्तो मुखर्जी यांनी पडद्यावर मात्र दारूड्याची व्यक्तिरेखा कायम मन लावून रंगवली.
पुढे ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार, आणि मेहमूद यांनी त्यांच्या कलागुणांचा योग्य उपयोग करुन घेतला. त्यांच्या हर एक चित्रपटात केश्टो असत. मेहमूद निर्मित 'पडोसन' मध्ये किशोरदांच्या संगीत मंडलीं मधला कलकतिया जो 'मेरे सामनेवाली खिडकीमें' या गाण्यात खराट्यावर कंगवा फिरवून संगीत देतो, सिप्पिंच्या 'शोले'मधला चोरुन बोलणे ऐकून चुगल्या करणारा न्हावी हरीराम, ह्रषिदांच्या 'खूबसूरत' मधील खानसामा अशरफीलाल, बाँबे टू गोवा मध्ये प्रवासभर शेजारच्या प्रवाशाच्या खांद्यावर मान टाकून झोपणरा बंगाली पॅसेंजर, 'परिचय' मधील द्वाड मुलांचा प्रायव्हेट ट्यूटर ज्याला मुलं रात्री काळोखात कासवाच्या पाठीवर मेणबत्ती लावून भुताच्या भितिने पळवून लावतात तर 'चुपके चुपके' मधील अट्टल दारुडा ड्राईव्हर जेम्स डिकास्टा म्हणून आपल्याला हसवतात .. 
त्यांच्या या भूमिकांमधून ते कायम  आपल्या स्मरणांत राहतील !



No comments:

Post a Comment