#४७# साधना
वर्ष होतं १९५४, साधना १५ वर्षांची असतांना एका डान्स स्कूलमध्ये जात होती. तिथे एकदा सत्यनारायण नावाचे एक सहाय्यक नृत्य दिग्दर्शक आले. त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांच्या डान्स स्टेप्स बघितल्या आणि सांगितले की सुप्रसिद्ध अभिनेते - निर्माते राजकपूरना त्यांच्या आगामी चित्रपटांत काही गाण्यांवर समूह नृत्यांसाठी काही नृत्यकुशल मुलंमुली हवी आहेत. राजजींच्या सिनेमात संधी मिळणे ही तेंव्हा कारकिर्दीची सोनेरी संधी समजली जात होती. काही मुलींची अंतिम निवड झाली त्यात साधनाचा समावेश होता. सिनेमातल्या एका संपूर्ण गाण्यातील समूह नृत्यासाठी झालेल्या निवडीमुळे तिला आकाश ठेंगणे झाले.
सिनेमातील त्या गाण्याच्या फायनल टेकपूर्वी खुप दिवस रिहर्सल झाली, साधना तिथल्या वातावरणावर रुळली. तिला तो माहोल खूप आवडला. स्वप्नात पाहिलेले दिग्गज लोक समोर होते, रोलिंग कॅमेरासमोर नाचतानाचे थ्रील तिला खूपच भावले. थोड्याच दिवसांत त्या गाण्याचे चित्रीकरण संपले. साधना ज्या गाण्यात एक्स्ट्राच्या रोलमध्ये समुहात नाचली होती ते गाणे होते 'रमैया वस्तावैया, मैने दिल तुझको दिया .....'
साधनाला सिनेमा प्रदर्शित होण्याच्या दिवसाचे वेध लागले. अखेर तो दिवस जवळ आला.तो सिनेमा प्रदर्शित होतोय याचा साधनाला फार आनंद झाला. प्रीमियरशोच्या वेळेस एक्स्ट्रा कलाकार आणि समूहनृत्यातील कलाकार व सहायक तंत्रज्ञ या लोकांना बोलावले जात नसे, त्यामुळे साधनाने स्वतःच्या खर्चाने आपल्या सर्व मैत्रिणींना सिनेमा पाहण्यास नेले. आपण पडद्यावर कसे दिसतो याची तिलाही उत्सुकता होती. सिनेमा सुरु झाला, ते गाणंही सुरु झालं.....सर्व कडवी संपली...गाणंही संपलं...दर कडव्याला, ओळीला साधना तिच्या मैत्रीणीना सांगायची, 'इथे मी आहे बरं का ...'.तिच्या सर्व मैत्रिणी टक लावून पडद्याकडे पहायच्या पण गाणे संपले तरी पडद्यावर साधना काही दिसलीच नाही ! तेव्हा तिला light camera action च्या पुढे editing पण असतं हे समजलं !!
सिनेमा संपला.. मैत्रिणींचे प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या डबडबलेल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्यावर मात्र तिच्या मैत्रिणीनी तिची समजूत घातली. रडवेली झालेली साधना हिरमुसल्या चेहऱ्याने घरी गेली अन हमसून हमसून रडली. तिने घरी सर्व हकीकत सांगितली. सगळ्यांनी तिला सिनेमाचा नाद सोडून द्यायला सांगितले पण त्याच दिवशी तिने निश्चय केला की एक ना एक दिवस आपण राजकपूर सोबत सिनेमात काम करायचंच !
काळ पुढे निघून गेला. साधनाने बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आणि १९६४ मध्ये 'दुल्हादुल्हन' चित्रपटांत तिने हिरॉईन म्हणून काम केलं आणि ते ही चक्क राजकपूर सोबत !
बरोबर दहा वर्षांनी, राजकपूर सोबत काम करण्याचं तिचं ते गोड स्वप्न पूर्ण झालं !!!
No comments:
Post a Comment