#३३# साहिर ..
ऑल इन्डिया रेडिओला 'गीतकाराचे नांव तुम्ही सांगायलाच हवे' हा आग्रह करून तो मान्य करायला लावणारा, एस डी बर्मन बरोबर आयुष्यातील परमोच्च यशाचा काळ उपभोगणारा, अमृता प्रीतम वर जीवापाड प्रेम करणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील अजरामर गीते रचणारा, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर निस्सीम प्रेम असलेला, एक से बढकर एक गीते लिहिणारा,शायरी वर नितांत प्रेम करणारा, मद्यपान व धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन घेणारा...साहिर !
पंजाबमधील लुधियानात एका जहागीरदाराच्या घरी त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांनी बारा लग्न केली होती आणि हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, अब्दुल. त्याच्या वडिलांच्या अय्याशीला कंटाळून आईने तलाख घेतला. न्यायाधीशांनी जेंव्हा लहानग्या अब्दुलला विचारलं की तू कुणाबरोबर राहू इच्छितोस, तेव्हा अब्दुलने शांतपणे आईकडे बोट दाखवलं आणि तो आईसोबत मामाकडे राहू लागला.
लहानपणापासून कवी मनाच्या अब्दुलला शेरोशायरी मध्ये खूप रस वाटे. त्याकाळचे सुप्रसिद्ध शायर रहमत यांची सगळी शायरी त्याला मुखोद्गत होती. उर्दू भाषा व साहित्याची ओळख करून देणारे शाळेतील शिक्षक फैय्याज़ हे अब्दुलचे आद्य गुरू होते. एकदम फोटोजेनीक मेमरी असलेला अब्दुल, एकदा वाचलेलं सहज लक्षात ठेवी. मॅट्रिकच्या परिक्षेची तयारी करताना त्याने एक नज़्म वाचली जी त्याला खूप आवडली. त्यात एक ओळ होती,
इस चमन में होंगे पैदा बुलबुल-ए-शीरीज भी,सैकडों साहिर भी होगें..
यातला साहिर (म्हणजे जादुगार) हा शब्द त्याला इतका आवडला की त्याने आपलं नांव अब्दुल ऐवजी साहिर ठेवलं आणि पुढे आपल्या जन्मगावाचं नांव लावलं ‘लुधियानवी’, साहिर लुधियानवी आणि याच नावानं तो लिहू लागला...
No comments:
Post a Comment