Thursday, July 30, 2020



#17# मधुमती

'Masterpiece of Indian Cinema' असं ज्या सिनेमाचं वर्णन केलं जातं तो हा सिनेमा. आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा हा चित्रपट अभ्यासला जातो, या क्षेत्रांत काम करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवर्जून शिकवला जातॊ यावरूनच या चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता नक्कीच वाढते.  

एकीकडे पडद्यावर वैजयंतीमाला आणि दिलीपकुमार, शैलेंद्र यांनी लिहिलेली एक से बढकर एक गाणी, सलील चौधरींनी दिलेलं संगीत व मुकेश लताजी मन्ना डे रफीसाहेब आशा भोसले यांच्या आवाजातील गाणी आणि दुसरीकडे बिमल रॉय अशा लाजवाब कॉम्बिनेशनची हि एक अनोखी कलाकृती.    

१९५५ मध्ये दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्या बरोबर बिमलदांनी देवदास केला होता. २००५ मध्ये इंडिया टाइम्स मुवीज नी या चित्रपटाला बॉलीवूड मधल्या टॉप २५ चित्रपटांत स्थान दिलं. एक क्लासिक चित्रपट म्हणून आपण आजही या सिनेमाकडे  पाहत असलो तरी तेव्हा मात्र तो चित्रपट फारसा चालला नव्हता. त्यामुळे एका हिट चित्रपटाची बिमलदांना खूप गरज होती आणि त्याच वेळी रित्विक घटक यांनी 'मधुमती' ची गोष्ट त्यांना ऐकवली आणि मग घडला एक इतिहास !

या चित्रपटाने तब्बल ९ फिल्मफेअर पुरस्कार मिळवले होते जे एक रेकॉर्ड होतं आणि ते मोडायला पुढे ३७ वर्ष लागली, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला १० फिल्मफेअर पुरस्कार मिळाले तेव्हा. 

Bimal Roy's Madhumati  - untold stories from behind the scenes हे त्यांच्या मुलीने लिहिलेलं पुस्तक २०१४ साली रिलीज झालं तेव्हा 'मधुमती' घडत असतांना पडद्यामागील घडलेल्या अनेक छान गोष्टी समोर आल्या. जसं या चित्रपटांतील गोष्ट उत्तरेकडील पहाडी भागांतील आहे पण यातील ८०% शूटिंग महाराष्ट्रात झालं होतं. सिनेमाच्या सुरवातीचा शॉट पहाडी भागातला वाटतो पण शूटिंग झालंय खोपोली पुणे महामार्गावर. यातील एक गाणं विश्वास बसणार नाही पण रायगड जिल्यातील एका गावांत शूट केलं गेलं होतं.  नैनितालला शूट चालू असतांना बंद पडलेली साऊंड रेकॉर्डिंग सिस्टिम तिथल्या एका रेडिओ दुकानदाराने रात्रीच्या थंडीत रात्रभर काम करून ठीक केली होती. या पुस्तकावर काम करताना रिंकी रॉय यांना समजलं कि या चित्रपटाचं ६०% एडिटिंग दासबाबूंनी केलं होतं कारण हृषीकेश मुखर्जी दुसऱ्या चित्रपटांत व्यस्त होते तरीही चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये संपूर्ण क्रेडिट फक्त हृषीदांना दिलं गेलं. यावरून दासबाबूंना किती वाईट वाटलं असेल असा विचार करून त्या भेटायला गेल्या तेव्हा त्यांनी या बद्दल काहीच उल्लेख न करता हा चित्रपट पाहिलाच नाही असं सांगितलं. तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसला बिमलदांबद्दल असलेला आदर आणि फक्त आदर !! 

एक कॅमेरामॅन म्हणून बिमलदांनी आपलं करियर सुरु केलं होतं. चित्रांमधून बोलणारा, आपला कॅमेरा एखाद्या पेंट ब्रश सारखा वापरणारा डायरेक्टर हि त्यांच्या कॅमेऱ्याची जादू होती. फिल्म पत्रकार बुर्जोर खुर्शीद त्यांना 'सायलेंट थंडर' म्हणायचे. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं 'जन गण मन' हे आपलं राष्ट्रगीत होण्याअगोदर बिमलदांनी ते गीत हमराही (१९४५) या चित्रपटांत घेतलं होतं. ' Bimal Roy  - The man who spoke in picture', त्यांची मुलगी रिंकी रॉय यांनी लिहिलेलं हे पुस्तक ज्यावर १९८० पासून त्या काम करत होत्या जे २०१७ मध्ये प्रकाशित झालं ते सध्या वाचते आहे ..  !

बिमलदा किती ग्रेट होते हे परत एकदा मधुमती पाहून एन्जॉय करते आहे... तुम्ही पण नक्की पहा !!  






No comments:

Post a Comment