#२९# मदन मोहन (2)
मनांत एक स्वप्न घेऊन ते घर सोडून बाहेर पडले एका खडतर वाटेवर. कधी मित्राच्या घरी तर कधी रस्त्यावर सुद्धा राहिले. धडपड करत असताना सिनेमांत मिळालेला एखादा लहानसा रोल केला, कधी गाणं म्हटलं पण बस्तान काही बसलं नाही. त्याच वेळी बर्मनदा यांनी त्यांना समजावलं, 'तुला नक्की काय काम करायचंय ते ठरव'.. तेव्हा मदनमोहन यांनी त्यांच्याकडे सहायक म्हणून काम सुरु केलं.
अनेक संकटे व मानहानीला तोंड दिल्यावर देवेंद्र गोयल या नवीन निर्मात्याने त्यांना आपला पहिला चित्रपट ‘आँखे’ (१९५०) साठी संगीत देण्याचे स्वतंत्र काम दिले. आपल्या पहिल्या चित्रपटाचे काम पाहण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांना थिएटरमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. चित्रपटातील संगीत पाहून रायबहादूर यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते मदनमोहन यांना म्हणाले, ‘तू योग्य मार्गावर आहेस बाळा, माझं चुकलं'..आणि पिता-पुत्रांतील वाद संपला. दोघे एकत्र आले, पण थोड्याच काळात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व मदनमोहन पुन्हा एकदा एकाकी पडले.
पुढे लता मंगेशकर यांच्यासारखी बहीण, राजेंद्र कृष्ण व राजा मेहंदी अलीखॉं यांच्या सारखे मित्र, देवेंद्र गोयल, चेतन आनंद, राज खोसला यांच्या सारखे मार्गदर्शक मिळाले व शामसुंदर, एस.बी. बर्मन, नौशाद यांच्यासारखे प्रशंसक संगीतकार त्यांनी मिळवले. संगीतकार खय्याम त्यांना 'संगीत के बेताज बादशहा' म्हणायचे तर लतादीदी 'गझलोंका शेहेजादा'. बेगम अख्तर यांच्या गझल गायनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. बेगम अख्तर हा त्यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात. मौसम चित्रपटाच्या वेळी गुलजार साहेबांनी त्यांच्या याच खुबीमुळे त्यांना ते काम दिलं कारण चित्रपटातील गाणी त्याच ढंगातली होती.'दिल ढुंढता है फिर वही' या गाण्यासाठी त्यांनी तब्बल १० चाली बनवल्या होत्या. 'रुके रुके से कदम रुक् के बार बार चले'... हे त्याच चित्रपटातील गीत आजसुद्धा तेवढंच लोकप्रिय आहे !
चेतन आनंद निर्मित 'हकीकत' या चित्रपटांत चित्रपट संपताना एका युद्धाच्या पार्श्वभुमीवर एक गीत होतं ज्याबद्दल थोडी साशंकता होती कि चित्रपट संपताना गाणं आहे तर प्रेक्षक ते किती बघतील, पसंत करतील. पण त्या गाण्याने प्रेक्षकांना बांधून ठेवलं, रडायला लावलं. ते गीत होतं. " कर चले हम फिदा जा ओ तन साथीयो अब तुम्हारे हवाले वतन साथीयो"...
मदनमोहन म्हटलं कि एका गाण्याची आठवण नक्की येते ते म्हणजे, " लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो "... या लाजवाब गाण्यामागे एक गोष्ट आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी लताजी आजारी पडल्या व त्यामुळे ते गाणं रेकॉर्ड होऊ शकलं नाही पण सर्व युनिट शूटिंग करता तर गेलं होत. मग काय मदन मोहन यांनी स्वतःच्या आवाजात ते रेकॉर्ड केलं आणि पाठवलं. शूटिंग करताना युनिट मधली माणसं confuse होती आवाज एका गायकाचा आणि त्या आवाजावर शूटिंग होतं आहे साधनाजींचं !
मदनमोहन यांची १९५० पासून सुरू झालेली सांगितीक कारकीर्द १९७५ पर्यंत सुरु होती. एक खास गोष्ट म्हणजे २००६ मध्ये आलेल्या 'वीर जारा' या चित्रपटासाठी मदन मोहन यांचा मुलगा संजीव कोहली यांनी मदन मोहन यांनी तयार केलेल्या ३० चाली यश चोप्रा यांना दिल्या ज्यातील आठ चाली त्यांनी या चित्रपटांत वापरल्या ज्यावर जावेद अख्तर यांनी गाणी लिहिली !!
जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यांना पुरस्कार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील “दस्तक” चित्रपटातील “बैयाँ ना धरो ओ बलमा " या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा' (अनपढ) आणि ‘लग जा गले के फिर ये'(वह कौन थी?) या दोन गाण्यांना फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. आपल्या संगीतावर फिल्मफेअर ऍवार्डची मोहोर उमटवता आली नाही ही खंत मात्र उभ्या आयुष्यभर त्यांना होती....
No comments:
Post a Comment