Thursday, July 30, 2020

#४५# मेहबूबा मेहबूबा... 

'शोले' चित्रपटाची आठवण काढताच अनेक गोष्टी डोळयासमोर फ्लॅश होतात त्यातील एक म्हणजे मेहबुबा मेहबुबा हे गाणं.. या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे. 

हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं. आशाताईंनी या गाण्यासाठी होकारही दिला पण आरडींची एक अट होती, कि 'हे गाणं पन्नाशीत पोहोचलेल्या जिप्सी स्त्रीचा आवाज जसा उतरलेला असतो तशा काहीशा भसाडया आवाजात प्लेबॅक करून हवं' ही अट आरडींनी घातली होती. आशाजींना यावर निर्णय घ्यायला वेळ लागला कारण अशा स्वरात गाणं म्हटल्याने वोकल कॉर्डसना ताण पडू शकतो शिवाय त्यामुळे आवाज बसला तर प्लेबॅक सिंगींगच्या वेळापत्रकातील इतर गाण्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांनी विचारपूर्वक नकार दिला. आशाजींनी नकार दिल्यावर आरडी अगदी चकित झाले होते कारण आशाजी आणि हेलन असं कॉम्बिनेशन गृहीत धरून त्या हिशोबाने ते गाणं त्यांनी लिहून घेतलं होतं. आरडींनी आशाजींची मनधरणी करून पाहिली पण काही फरक पडला नाही.

दोन तीन दिवस तसेच गेले. चौथ्या दिवशी त्यांचं आनंद बक्षींशी बोलणं झालं. 'मेहबूबा मेहबूबा' बक्षींनी लिहिलं होतं. आता आशाजींनी नकार दिल्यावर त्यात काही सुधारणा करून गाण्याचा मतितार्थ आणि ट्यून तीच ठेवून त्यांनी बक्षींकडे हेच गाणं मेल प्लेबॅकसाठी लिहून मागितलं. एकाच बैठकीत आनंद बक्षींनी गाणं लिहून दिलं आणि विचारलं की, " हेलनजी नही है क्या अब गाने मै ?" आरडींनी सगळी कथा ऐकवली त्या सरशी आनंद बक्षींनी विचारलं की, "आता कोण गाणार आहे हे गाणं ? " आरडी काही क्षण गप्प राहिले आणि उत्तरले "मीच गाणार आहे !" चकित होण्याची वेळ आता आनंद बक्षींची होती. गाणं हातात पडल्यावर ही गोष्ट आरडींनी जीपी सिप्पींच्या कानावर घातली. त्यांनी एकदा आरडींकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि घशाला हात लावत विचारलं, "ये काम करेगा क्या ?" आरडींनी उत्तर दिले "गाना तो मै ही गाऊंगा लेकीन आवाज मेरी नही होगी !" चकित होण्याची वेळ आता सिप्पींची होती. आरडींनी त्यांना समजावून सांगितले की मी चाळीशी पार केलेल्या एका भसाडया आवाजाच्या जिप्सी पुरुषाच्या स्वरात हे गाणं गाणार आहे, तो आवाज माझा आहे असं कोणालाच वाटणार नाही... " सिप्पींनी सांगितलं की, "तू जे काही करशील ते विचारपूर्वकच करशील याची मला खात्री आहे."

आणि हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं , लोकप्रिय झालं !!!!

No comments:

Post a Comment