#४४# नादिरा
हिंदी चित्रपटातील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ही मूळची बगदादची. फरहात इझिकेल नादिरा हिचा जन्म १९३२ साली बगदादमध्ये झाला. फरहात ही फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली गेली. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिराने एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. ज्यू कुटुंबात जन्मलेली ही मुलगी दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होती. तिच्याच आग्रहामुळे नादिरा मुंबईत वयाच्या १९व्या वर्षी दाखल झाली आणि मेहबूब खानांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात तिला साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका दिली. ‘आन’मधील तिच्या भूमिकेनंतर तिच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे तिला सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. श्री ४२० मधील तिच्या ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भुमिकेतून ती विशेष लक्षांत राहिली.. २००० साली प्रदर्शित झालेला ‘जोश’ हा नादिराचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी ती एकटी होती. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाईझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती.हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळाच्या मानाने चांगला पैसा कमावलेली नादिरा ही स्वत:कडे रोल्सराइस असलेली त्या काळातील पहिली अभिनेत्री !!
No comments:
Post a Comment