#21# मुघल- ए - आझम .. प्यार किया तो डरना क्या
आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे डोळे दिपून जावेत या स्वप्नासाठी के. असिफनी एका शीशमहलचा सेट उभारायचं ठरवलं. यासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमध्ये शेकडो कारागीर दोन वर्ष अहोरात्र राबवले. कलादिग्दर्शक एम.के. सईद यांनी मुंबईतल्या नावाजलेल्या आर्किटेक्ट व इंटिरिअर डिझायनरची मदत घेतली. इटालिअन टाईल्सचं फ्लोअरींग, इराणी गालीचे, संस्थानिकांकडून आणलेले हंड्या-झुंबर, काळानुरूप नक्षीदार खिडक्या व भिंतींच्या कमानी, संगमरवरी भासणार्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती. काचेचं नक्षीकाम करणारे तज्ज्ञ आगा सिराझीला शीशमहल सजवण्याचं काम देण्यात आलं. विशिष्ट रंगाच्या काचा आणि आरसे बेल्जियमवरुन मागवण्यात आले. अशा तर्हेने ३५ लाख रुपये खर्च करून उभा राहिला तो शीशमहलचा सेट, ३५ फूट उंच, ८० फूट रुंद आणि १५० फूट लांब. ..
या सेटवर अनारकलीचं सप्तरंगांतलं नृत्य चित्रीत करायचं ठरलं होतं. कृष्णधवल छायाचित्रणातले कसबी सिनेमॅटोग्राफर आर.डी. माथूर यांनी ट्रायलसाठी मोठमोठे दिवे प्रकाशित केले. पण असंख्य आरशांमुळे परावर्तीत झालेल्या प्रकाशामुळे एक्सपोझ झालेली फिल्म जळून पांढरीफटक पडली. तमाम कसबी तंत्रज्ञांनी इतक्या प्रखर प्रकाशात कॅमेर्याच्या लेन्सेस काम करूच शकणार नाहीत, असं छातीठोकपणे सांगितलं.
तेव्हा प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले शापूरजी तडक त्याकाळच्या ज्येष्ठ दिग्दर्शक सोहराब मोदींकडे गेले. मोदींनी प्रत्यक्ष सेट पाहिल्यावर प्रेक्षकांचे डोळे दिपवण्याच्या नादात असीफ स्वत:सकट सगळ्यांसाठी खड्डा खणतोय असा निर्वाळा दिला. यामुळे शापूरजींनी झालं तेवढं बास झालं आता इथून पुढे सोहराब मोदी दिग्दर्शनाचं काम पाहतील, असे असिफला सुनावले. त्यावर त्यांचा बांध तुटला आणि ते म्हणाले, ‘तुमचे पैसेच खर्च झालेत, पण माझ्यासकट शेकडो लोकांनी या चित्रपटासाठी रक्ताचं पाणी केलंय. या सेटवर अकबर, जोधाबाई, सलीमसमोर अनारकली नाचणार आहे. माझ्या स्वप्नपूर्तीच्या या परमोच्चक्षणी मी कुणाचीही लुडबुड खपवून घेणार नाही..’ असीफचा हा आवेश पाहता शापूरजींनी थोडं नमतं घेतलं. पण या दृश्यानंतरच काम मोदी पाहतील असे त्यांनी स्पष्ट केले. हे सगळं ऐकत इतका वेळ उभी असलेली मधुबाला आपल्या शांत पण दृढनिश्चयी स्वरात म्हणाली की, माझा करार असिफसोबत झाला आहे. त्यामुळे असिफने दिग्दर्शन केले नाही तर मी या चित्रपटातच काम करणार नाही.
पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या चित्रपटातून मधुबाला बाहेर पडली तर आपण कुठे जाऊन पोहचू हे ओळखता येण्याइतपत चाणाक्ष व व्यावसायीक असलेले शापूरजी पालनजी हे सोहराब मोदींसोबत एकही शब्द न बोलता सेटवरून निघून गेले. पाणावलेल्या डोळ्यांनी मधुबालाकडं पाहात असीफने जणू तो हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नसल्याचं तिला सांगितल असावं.
शीशमहलच्या शेकडो आरशांवरून प्रकाश किरण परावर्तीत होऊन फिल्म कोरीच राहू लागली. शेवटी आर.डी. माथूरनं डायरेक्ट लाईट ऐवजी सर्व दिव्यांवर उलटे रिफ्लेक्टर्स बसवले व इनडायरेक्ट लाईटमधे शूटिंग करून पाहिलं. ज्यामुळे आरशांत हजारो प्रतिमा स्पष्ट दिसल्या आणि ही कल्पना यशस्वी झाली . आजकाल जे स्टिल व लाईव्ह फोटोग्राफीचं तंत्र वापरतात, त्याचा उगम इथूनच झाला.
'प्यार किया तो डरना क्या', अशा भव्य गाण्याचं स्वप्न बघणारा दिग्दर्शक के. असीफ, या एका गाण्यासाठी त्याने बनवलेला शीशमहल , असीफसाठी चित्रपट सोडण्याची तयारी दाखवणारी मधुबाला, अत्यंत कल्पकतेने शीशमहालातदेखील शूटिंग करणं शक्य करून दाखवलेला आर.डी. माथूरसारखा कॅमेरामन आणि या सगळ्याच दडपण मनावर असणारे शकील बदायुनी .. त्यांनी आपली सारी प्रतिभा पणाला लावून या शीशमहलमधील गाण्याचे पंचवीस एक मुखडे तयार केले. पण नौशादच्या पसंतीस ते उतरेनात. बरंच विचारमंथन झालं आणि मध्यरात्रीच्या सुमारास नौशादला ओळी सुचल्या. गीत सुरु होण्यापूर्वीची दोन ओळीतील आर्त तत्वज्ञान ज्या धाडसाने दरबारांत अनारकली अकबर बादशहाला ऐकवते, त्याच तोलामोलाचे बोल शकीलजींनी लिहिले, नौशादजींनी संगीताचं कोंदण चढवलं आणि लताजींनी ते अमर केलं (या गाण्यातील आवाज घुमण्यामागे echo रेकॉर्डिंग तेव्हा प्रगत नसल्याने स्टुडिओ च्या बाथरूम मध्ये रेकॉर्ड केलं गेलं होतं) ‘इन्सान किसीसे दुनियामें इकबार मुहोब्बत करता है इस दर्दको लेकर जीता है , इस दर्द को लेकर मरता है…जब प्यार किया तो डरना क्या ... ’
No comments:
Post a Comment