Thursday, July 30, 2020

स्वयंपाकघर म्हणजे आईचं राज्य.. रुचकर, स्वादिष्ट,चमचमीत, पारंपारिक पदार्थ करण्यात तिचा हात कोणीच धरू शकत नाही मग ती आई माझी असो वा तुमची. ' आई ' या नावातच ती जादू आहे. आपण लहान होतो तेव्हा भूक लागली कि 'काहीतरी खायला दे' हि भुणभुण केली कि आई वाटीत काहीतरी खाऊ द्यायची आणि ती वाटी हातांत घेऊन चेहऱ्यावरचं हसू सांभाळत आपण धूम ठोकायचो. आतां वाटी देणारे आणि घेणारे हात बदलले, विशेषण बदलली, 'काहीतरी' ची जागा 'Yummy' ने घेतली.. मग काय त्यातून डिमांड करणारे 'टिन' असले, अहो म्हणजे टीनएजर हो , मग काय बघायलाच नको. साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन आणि महाराष्ट्रीयन या परिघाच्या बाहेर जावंच लागतं. इटालियन, मेक्सिकन, चायनीज अशी सफारी अधूनमधून करावी लागते.

लॉकडाउन, वर्क फ्रॉम होम, झूम Classes अशा वातावरणांत वेगळ्याच ग्रहावर राहायला आल्यासारखं वावरत असतांना मुलांकरता मात्र वाईट वाटतं. कॉलेज, क्लास, मित्र मैत्रिणी, खेळ ,भटकणं ,दंगा मस्ती हे सगळं मिस करतायेत ते, तेच तर जग आहे त्यांच, अहो अभ्यास खूप नंतर येतो आणि हे सगळं एकदा मिळालं ना कि  अभ्यासाकरता आपसूकच टॉनिक मिळतं. पण सध्या मात्र ती शहाण्यासारखी एक जबाबदार भूमिका घरी राहून पार पाडत आहेत तेव्हा वाटतं आपणही आपल्या आईसारखी त्यांच्या मनांत एक 'यम्मी' जागा तयार करावी ..
मग काय 'मौका भी है और दस्तूर भी'.. करूयात मॅक्सिकन tacos ..

स्टफिंग करता दोन वाटी राजमा सात ते आठ तास भिजत ठेवून नंतर कुकरमध्ये छान मऊसर शिजवून घ्यावा. शिजवताना त्यात आवडीनुसार मीठ घालावं. शिजवून झाल्यावर त्याला स्मॅश करून घ्यावं. आमचूर पावडर, जिरा पावडर, मिरपूड, चाट मसाला घालून छान मिक्स करावं. मीठ आपण शिजवताना घातलं होत म्हणून आता लागणार नाही.

मॅक्सिकन साल्सा करता दोन मध्यम आकाराचे टोमॅटो व कांदा चिरून घ्यावेत. दोन मिरच्या बारीक चिरून, थोडी कोथिंबीर, एक चमचा तेल,अर्ध लिंबू , चवीप्रमाणे मीठ व जिरा पावडर असं सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यांत टाकुन थोडं ब्लेंड करून घ्यावं, एकदम बारीक नको.

एक ते दीड वाटी दही मलमल च्या कापडात अर्धा तास बांधून ठेवावं, त्यातील पाणी पूर्णपणे निघून गेलं कि बाउल मध्ये काढून घ्यावं.

आता tortilla wraps करता एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मक्याचं पीठ, त्यात थोडं मीठ टाकुन गरम पाण्यात भिजवून घ्यायचं. दहा मिनिटांनी पोळीपेक्षा किंचित जाड पोळी लाटून घ्यावी. गोल वाटीने त्याचे पुरीच्या आकाराचे एकसारखे गोल कापून घ्यावे. ते तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत.

इतकी तयारी होत आली कि इतका वेळ स्वयंपाकघरांत आई काय करते आहे हे पाहायला online क्लास संपवून आपला 'टिन friend' आला कि त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या आवडीची डिश बनते आहे हे पाहून पसरलेला आनंद आपलाच उत्साह अजून वाढवतो. मग काय त्याला मदतीला घेऊन आता सर्विंगची तयारी सुरु करायची.

प्लेट मधे प्रथम tortilla wraps घेऊन मधोमध hung curd लावून त्यावर राजमा वापरून बनवलेलं stuffing घालून त्यावर थोडा मेक्सिकन साल्सा घालावा. त्यावर थोडी मिरपूड, कोथिंबीर घालून वरून आवडीप्रमाणे चीज किसून टाकावं. सगळे wraps असे छान सजून तयार झाले कि फोल्ड करून प्लेट मध्ये सजवून एक फोटो क्लिक करत दुसऱ्या हाताने टेस्ट घेत, " आहाssss ..." म्हणत या डिश सारखीच मुलाबरोबर रंगणारी यम्मी friendship एन्जॉय करावी ....


No comments:

Post a Comment