#४६# लग जा गले..एक आठवण, राजा मेहंदी अली खान
गीतकार राजा मेहंदी अली खान, फक्त ३८ वर्षे जगलेल्या या माणसानं खंडीभर गाणी लिहिली नाहीत पण जी लिहिली ती अजरामर होतील अशीच लिहिली... अगर मुझ से मुहब्बत हैं, आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे, मेरा सुंदर सपना बीत गया, तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, तेरे बीन सावन कैसे बिता, आप युंही अगर हमसे मिलते रहे, नयना बरसे रिमझिम, आप के पहलू में आकर रो दिये, तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से...
'वो कौन थी' हा चित्रपट १९६४ मध्ये रिलीज झाला आणि दोन वर्षांतच १९६६ मध्ये या चित्रपटाचे गीतकार राजा मेहंदी अली खान यांचं निधन झालं. 'वो कौन थी' साठी लिहिलेलं 'लग जा गले..' हे अप्रतिम गाणं दिग्दर्शक राज खोसला यांनी आधी रिजेक्ट केलं होतं. हे गाणं नाकारल्याचं राजाजींना विलक्षण दुःख झालं जे त्यांनी संगीतकार मदन मोहन यांना बोलून दाखवलं. इतकं चांगलं अर्थपूर्ण गाणं नाकारल्यामुळे मदनजींनाही वाईट वाटलं व त्यांनी चित्रपटाचा नायक असलेल्या मनोजकुमार व राज खोसला यांना ते गाणं परत एकदा ऐकण्याचा आग्रह केला.
दुसऱ्यांदा ते गाणं ऐकताच राज खोसला यांना ते गाणं अतिशय आवडलं व ते गाणं आपण आधी रिजेक्ट केल्याचं खुप वाईटही वाटलं. शेवटी ते गाणं चित्रपटांत घ्यायचं ठरलं. सिनेमा सुपरहिट झाला आणि ते गाणंही..
या चित्रपटातली सगळीच गाणी हिट झाली तरीही आपल्या ओठांवर येणारं गीत म्हणजे " लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो ''.. कारण काही गाणी मनावर कोरली जातात आणि हे त्यापैकीच एक ! या गाण्याचे शब्द, अर्थ खोलवर स्पर्शून जातो. हातून काहीतरी निसटतंय हि जाणीव एक आर्त आपल्यापर्यंत पोहचवते आणि जेव्हा या गाण्याच्या मागची पार्श्वभूमी समजते तेव्हा मात्र हे गाणं ऐकून डोळे पाणावतात ..
हे गाणं म्हणजे गीतकार राजा मेहंदी अली खान आणि त्यांच्या बायकोमधला संवाद आहे. ताहिरा हे राजा मेहंदी अली खान यांच्या पत्नीचं नाव. हे दोघंही उच्चशिक्षित घरातले होते. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये न जाता ते भारतातच राहिले. त्यांना मुलबाळ नव्हतं त्यामुळे ताहिरा दुःखी असायच्या. राजासाहेब त्याचा उल्लेख कधी करत नसत. आपल्या बायकोवर त्यांच अतोनात प्रेम होतं. ताहिरांनी अपत्यप्राप्तीसाठी उपचार आणि चाचण्या सुरु केल्या, पण त्या दरम्यान एका परिचित डॉक्टरांनी त्यांना सावध केलं की त्यांना कर्करोग असू शकतो. या बातमीनं ताहिरा डगमगल्या नाहीत पण राजा मेहंदी अली खान मात्र पुरते कोसळले. ताहिराला तसं त्यांनी कधी दाखवलं नाही पण आतून ते खूप खचत गेले आणि त्यांच्या गीतांमधून तो दर्द झळकत राहिला. त्यांचा स्वभाव हळवा होता. पत्नीचा विरह ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही आणि ते आजारी पडले, त्यांनी हाय खाल्ली. पुढे काही वर्षात त्यांचे देहावसान झाले. आश्चर्याची गोष्ट अशी की ताहिरांना कोणताच आजार नव्हता व त्या बऱ्याच वर्ष जगल्या.
राजा मेहंदी अली खान यांच्या नितळ भावना व्यक्त करणारं 'लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो.. ' हे गीत त्यांनी आपल्या पत्नीचं आजारपण कळल्यानंतर लिहिलेलं गीत आहे ! राजाजी आणि ताहिरा यांच्याप्रेमाची गोष्ट उलगडणारं हे गीत आता परत एकदा नक्की ऐका !!
No comments:
Post a Comment