#३७# पद्मभूषण खय्याम
१९५३ साली अन्वर हुसेन (नर्गीसचा भाऊ) संगीतकार खय्यामला घेऊन दिग्दर्शक झिया सरहद्दीकडे आला. सिनेमा होता 'फुटपाथ' आणि पडदयावर होते ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार आणि ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी. पहिल्याच रेकॉर्डिंगला कुठलंही रिदम Instrument न वापरता खय्यामने फक्त पियानो, गिटार आणि सोलो वोक्सचा अप्रतिम वापर करत तलतच्या आवाजात 'शाम-ए-गम कि कसम, आज गमगीं है हम', हि पहिली गझल रेकॉर्ड केली. सिनेमा पडला. दिलीपकुमार निगेटिव्ह रोल मध्ये असल्याने लोकांना कदाचित आवडलं नसावं पण तलतच्या नावावर "शाम-ए-गम कि कसम" या अप्रतिम मास्टरपीसची नोंद झाली.
मोहमंद जहूर खय्याम हाश्मी असं लांबलचक नाव असलेले खय्याम म्हणजे एकदम उसुलवाला बंदा! आपल्या ६० वर्षाच्या कारकिर्दीत या माणसाने मोजून ५५ सिनेमांना संगीत दिलं म्हणजे हिशोब लावला तर वर्षाला जेमतेम एक सिनेमा.' मेरा संगीत मेरी इबादत है', म्हणणाऱ्या खय्यामनी फक्त अशा सिनेमांना संगीत दिलं ज्यांत गीतांचा दर्जा खुप वरचा होता. अर्थातच, या निर्णयाचे व्यावहारिक हाल त्यांनी आयुष्यभर सोसले.
'शगुन' सिनेमांतील गाणी ऐकून फिदा झालेला कमाल अमरोही खय्यामकडे 'रझिया सुलतान' च स्क्रिप्ट घेऊन आला. रझिया सुलतान म्हणजे बाराव्या शतकातील ऐतिहासिक ड्रामा होता. खय्यामने सहा महिने कथेचा नीट अभ्यास केल्यावर लतादीदींना रेकॉर्डिंग साठी बोलावलं आणि सांगितलं, "लताजी, रझिया एक सम्राज्ञी आहे पण तिचा एका गुलामावर जीव जडलाय.रझियाची अवस्था मोठी विचित्र आहे. राणीपणाचा आब राखायचा आहे आणि त्याचवेळी विरहाने मन आर्त झाले आहे. ती कशिश गाण्यात उतरली पाहिजे". लतादीदींनी त्यांच म्हणणं शांतपणे ऐकलं आणि एकाच टेक मध्ये "ए दिले नादान" हे सुपरक्लास गाणं दिलं. "मी हे गाणं गाऊन बाहेर आले पण नंतर दिवसभर ते गाणं माझ्या मनांत निनादत होतं. जणू काही मी ते गाणं माझ्या सोबतच घेऊन घरी आले होते", असं एका मुलाखतीत या गाण्याविषयी लतादीदींनी सांगितलं होतं.
या गाण्याचं वैशिष्टय म्हणजे या गाण्यात घेतलेले पॉजेस. "जिंदगी जैसी खोयी खोयी है हैरान हैरान है ... (पॉज) ... ये जमी चुप है (पॉज) ... आसमा चूप है! हे पॉज वाळवंटात एकट्या भटकणाऱ्या रझियाची घालमेल गडद करतात. "पॉज कि आयडिया तो अमरोही साब की थी", हे खय्याम साहेब प्रांजळपणे सांगतात हा त्यांचा मोठेपणा !!!
No comments:
Post a Comment