इजाजत
एक चिरतरुण काव्य, कितीही वेळा बघितला तरी तितकाच आवडतो, जवळचा वाटतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नविन देवून जातो. सिनेमा पाहतांना 'पावसाच्या बरसणाऱ्या सरींच्या सोबत गुलजारजींची कविता त्यांच्याच आवाजात आपण ऐकतोय' असं वाटतं राहतं. या सिनेमाच्या प्रेमात पडल्यापासून असा एकही पावसाळा गेला नाही कि मी 'इजाजत' पाहिला नाही, इतकी जादू या सिनेमाने केली आहे मनावर. इजाजत म्हणजे महेंद्र, माया आणि सुधा यांची एक अलवार प्रेमकहाणी. यांत नक्की कोण बरोबर किंवा कोण चूक याचा विचार न करता फक्त नजरेत आणि कानांत साठवून ठेवावी अशी हि निखळ प्रेमकविता
!!
एकीकडे रेखा ,नसिरुद्दीन शहा, अनुराधा पटेल हे तीन जबरदस्त कलाकार तर दुसरीकडे गुलजार ,पंचम आणि आशाताई यांनी अजरामर करून ठेवलेली एक से बढकर एक जबरदस्त गाणी ! कधी गीतकार म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून तर कधी संवाद लेखक म्हणून प्रत्येक भूमिकेत आपण प्रेमात पडतो गुलजारजींच्या. यातला प्रत्येक संवाद म्हणजे एक खास कविता आहे, मनाला भिडणारी, प्रत्येकाला आपली वाटणारी.. 'मेरी मानिये जिंदगी को लगाम मत डालिये, आपके मुड़ने से ये नहीं मुड़ेगी' किंवा 'देखिये जो सच है सही है वही कीजिये' तसंच 'आदते तो छुट जाती है पर अधिकार नहीं छुटते'.. काय अप्रतिम लिहिलंय ना !!
रेल्वे स्टेशन वर वेटिंग रूम मध्ये सुरु होणारा हा सिनेमा. योगायोगाने भेटणाऱ्या महेंद्र आणि सुधाची हि गोष्ट इथूनच भूतकाळात नेते आपल्याला. दोघांच्याही मनांत खूप काही आहे सांगायला. ती अबोल तगमग त्या संपूर्ण वातावरणांत भरून उरलीए. आयुष्यात दोघे बरेच पुढे निघून गेलेत, लग्न होऊन वेगळे झालेत, पण तरीही एकमेकांच्या आठवणींमध्ये अजूनही सोबत आहेत.
वेटिंग रूम मधल्या महेंद्र आणि सुधाच्या संभाषणातून आपण त्यांच्या गोष्टीकडे वळतो. "आप यहाँ कैसे ?" या तिच्या प्रश्नाला "दार्जिलिंग कैम्पेन के लिए गया था वापस जा रहा हूँ, घर " असं उत्तर देतो. यावर ती विचारते , "घर.. वहीं, वही रहते है आप" यावर,"हाँ वही, वही शेहेर है, वही गली है,वही घर, सबकुछss ... सबकुछ वही तो नहीं है, लेकिन है वही उसी जग़ह"... असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यालाही अस्वस्थ करतो.
फ्लॅशबॅक मध्ये महेंद्र आणि सुधाच्या या गोष्टीमधल्या मायाची ओळख होते. आरशावर तिने महेंद्र करता लिहिलेल्या निरोपातून ती प्रथम भेटते आपल्याला." बिना बताये तुम जाते हो, जाकर बताऊ कैसे लगता है ?" आणि नंतर तिने लिहिलेल्या चिट्ठीतून "चलते चलते मेरा साया कभी कभी यूँ करता है, जमीं से उठकर यूँ हात पकड़कर केहेता है, अब की बार मै आगे आगे चलता हूँ और तू मेरा पीछा करके देख जरा क्या होता है"... तेव्हा माया नक्की काय आहे हे कुतूहल वाढतं. तिची मैत्रीण जेव्हा, "ढूँढने से नहीं मिलेगी, वो चीज ही कुछ ऐसी है'.. असं तिच्याबद्दल म्हणते तेव्हा समजतं माया नक्की काय आहे. ती बेधडक आहे , बिनधास्त आहे पण तरीही हळवी आहे, महेंनवर जिवापाड प्रेम करणारी आहे !
सुधा आणि महेंद्रच लग्न झाल्यावर सुधाला घरामध्ये सतत जाणवणारं मायाच अस्थित्व अतिशय अस्वस्थ करतं. महेंद्र तिची समजुत घालतो. "बुरा मत मानो सुधा मै जानता हूँ माया बहोत ज्यादा बसी हुई थी इस घर मै, अब हर जगह से तो निकाल दिया है उसे, अब किसी कोने कुदरे मे बच गई हो, तो वहाँ से भी हट जाएगी," त्यावेळी तिचा बांध फुटतो, "सबकुछ ही बटा हुआ लग रहा है इस घर मैं। जिस चीज को भी छूने जाती हूँ लगता है किसी और की चीज छू रही हूँ, पूरापूरा अपना कुछ भी नहीं लगता यहाँ।" ..पण नंतर हिच सुधा कपाटामध्ये दागिन्यांच्या डब्यांतले आपले दागिने काढून तेथे मायाची पत्रं ठेवते. "मैने अपने जेवर निकालकर आपके रख दिये ".. तेव्हा मात्र डोळ्यांत टचकन पाणी आल्याशिवाय राहात नाही.
महेंद्र प्रामाणिक आहे. लग्नाच्या आधी सुधाला मायाबद्दल सर्व काही सांगितलंय त्यानी पण त्याला थोडा वेळ हवा आहे, जे पसरलय ते सावरायला. तो जितका प्रयत्न करून माया पासून दूर जावू बघतोय तितकंच ते त्याच्यासाठी अवघड होत जातंय. तो सुधाची समजुत काढतो , "मै माया से प्यार करता था ये सच है और असे भूलने को कोशिश कर रहा हूँ ये सही है ", आणि तिला जाणीव पण करून देतो, 'मुझसे जादा वो तुम्हे याद रेहेती है' ...
महेंन वर निर्व्याज प्रेम करणारी माया. "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है.. सावन के कुछ भिगे भिगे दिन रक्खे है और मेरे एक खत मै लिपटी रात पडी है'.. अस लिहून तिच्या किती आठवणी मागे राहिल्या आहेत हे महेंनला सांगताना '११६ चाँद कि राते और एक तुम्हारे कांधे का तील , गिली मेहेंदी कि खुशबू, झूठ मूठ के शिकवे कूछ, झूठ मूठ के वादे सब', तू का पाठवले नाहीस हि गोड तक्रार सुद्धा करते. महेंन आणि मायाच हे नातं या गाण्यामधून अलगत उलगडतं. एकमेकांपासून दूर जाणं सुद्धा इतक्या रोमँटिक शब्दांत सांगता येतं हि जादुई कमाल हे गाणं करतं !
नात्यांचा हा हळुवार उलगडणारा पदर बघतांना आपण हरवून जातो. दुसरीकडे महेंद्र आणि सुधा यांच लग्नानंतर नव्यानं बहरणारं नातं "कतरा कतरा मिलती है कतरा कतरा जिने दो , जिंदगी है, बेहेने दो, प्यासी हूँ मै प्यासी रेहेने दो '... या गाण्यातून आपल्या पर्यंत पोहोचतं. सुधाचं महेंद्र करता व्याकुळ होणं "खाली हात शाम आई है खाली हात जाएगी, आज भी न आया कोई खाली लौट जाएगी".. संध्याकाळची कातरता आणि तिच्या मनाची तगमग यांची विलक्षण गुंफण आहे या गाण्यांत.
हा संपूर्ण सिनेमा म्हणजे गोष्ट आहे वेटिंग रूम मधल्या त्या रात्रीची, जी रात्र आठवणीत भिजून जाते आणि भिजवूनही. सकाळची चाहूल लागलीए, पाऊस थांबलाय, पाघोळ्यांवरून थेंब थेंब पडणाऱ्या पाण्याचा आवाज सगळं मळभ दूर झालंय याची ग्वाही देतोय. आपण मनातलं सगळं काही सांगितलं, आपणच बोलत राहिलो याची महेंद्रला जाणीव होते. "सारी रात मै ही केहता रहा तुमने कुछ नहीं कहा', या महेंद्रच्या वाक्यावर "मेरे पास तो केहेने को था ही क्या", हे रितेपण सुधा बोलून दाखवते. मायाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न सुधाला सांगताना महेंद्र कबूल करतो, "शायद मुझे तुम्हे सब कुछ बताना चाहिए था मगर मुझे समझ मे नहीं आ रहा था, डर गया था मै ,समझने की कोशिश कर ही रहा था तो वो भाग गई, तुम भी जा चुकी थी, उस दिन पेहेली बार दिल का दौरा पड़ा, तुम्हारा जाना बुरा लगा"...
समज गैरसमज यांच मळभ आता कुठे दूर होतंय. हातातून ते क्षण तर निसटून गेलेत पण नियतीने जे समोर आणलंय त्या क्षणांशी तरी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आता हे दोघे करतायेत.सुधा त्याला सांगते, तिच्या मनातलं जे तिने त्याच्या आयुष्यातून निघून जातांना जाणलं होतं आणि पत्रातूनही जे व्यक्त केलं होतं. "सच तो ये है की आपकी ईमानदारी ने मोह लिया था, पेहेली बार जब हात छुड़ाने आये थे और दूसरी बार जब हात माँगने। माया इस दुनिया से बहोत अलग है, मै बहोत ही साधारण औरत हूँ, जिद्दी हूँ, जल भी जाती हूँ, पिघल भी जाती हूँ। दादू को मैने समझा दिया है। आप माया से शादी कर लीजिये। मै अपनी मरजी से जा रही हूँ।".. आपण या दोघांच्या मध्ये आलो हि सल तिला त्रास देते आणि म्हणूनच ती तो निर्णय घेते, निघून जाते.
"माया कैसी है ?" या तिच्या प्रश्नाने महेंद्र कोलमडून जातो, एका अपघातात माया जाते हे सांगताना भावुक होतो. त्याला सुधाची माफी मागायची आहे. ' जो हुआ उसे कुछ बदला तो नहीं जा सकता, पछता सकता है माफी मांग सकता है'.. इतकं बोलून सुधाला पुढे काही तो विचारणार इतक्यात अनपेक्षित पणे येणारा तिचा नवरा पाहून महेंद्र परत एकदा नियती समोर हार मानतो. जाताना सुधा म्हणते, "मै चलूँ , पिछली बार बिना पूछे चली गई थी इस बार इजाजत दे दो, पिछले साल मैंने शादी कर ली".. इथे इजाजत या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने स्पष्ट होतो.
"जीती रहो सुखी रहो खुश रहो.. बहोत अच्छे पति मिले है तुम्हे , बहोत प्यार करते है, वो सब जो मै नहीं कर सका भगवान करे तुम्हे भरपूर मिले, हो सके तो एक बार मन से माफ़ कर दो "... सुधा त्याचा निरोप घेऊन निघणार इतक्यात तिचा नवरा येतो " अरे, पिछे क्या रेह गया भाई', आणि समजून जातॊ सुधा नक्की काय मागे सोडून त्याच्या सोबत निघालीए ..
सुधा तिच्या नवऱ्याबरोबर जाते आणि महेंद्र सुद्धा त्या वेटिंग रूम च्या बाहेर येतो.आजवर जीची वाट तो आतुरतेने पाहात होता ते वाट बघणंच आता संपून जातं. याच वळणावर महेंद्र सुधा आणि माया यांची हि हळूवार गोष्ट आपल्या मनांत खोल रुतून बसते..
-कविता सहस्रबुद्धे