Monday, October 31, 2022

 

गुलाबी रंग .. प्रेमाचं, कोमल जाणिवांचं, स्नेहाचं, शांततेचं, तारुण्याचं,आनंदाचं, स्त्रीत्वाचं आणि स्वप्नांचं प्रतिक !

पावसाळा संपतो आणि थंडीची चाहूल लागते. धुक्याची शुभ्र चादर पसरता वाटतं पहाटे पहाटे थंडीचा गुलाबी शेला लपेटून घ्यावा..

'ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
हाय श्वासांतही ऐकू ये मारवा'..

आयुष्याच्या एका वळणावर गुलाबी रंगांचं खास आकर्षण असतं.. वाटतं या रंगात रंगून जाण्यासारखं सुख नाही. वास्तवाचं भान हरपून आयुष्याची स्वप्न रंगवण्यात हरवलेलं गुलाबी मन!

मला आठवतंय साधारण चौदा ते अठरा या वयामध्ये प्रत्येकाच्या आवडत्या गाण्यांच्या यादी मध्ये 'ए मेरे हमसफर, अकेले है तो क्या गम है, पेहेला नशा पेहेला खुमार, दिल है के मानता नहीं, हमने घर छोडा है, मेरे रंग में रंगने वाली परी हो या तुम, केहे दो के तुम हो मेरी वरना' आणि आशिकी मधली एक से एक गाणी होती. टेपरेकॉर्डर वर गाणी ऐकून ऐकून ती कॅसेट खराब व्हायची पण गाणी ऐकायची हौस काही फिटायची नाही. आजही ती गाणी ऐकतांना तेवढीच फ्रेश वाटतात, रोमँटिक वाटतात, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात आणि गंमत म्हणजे हि गाणी परत एकदा आपल्याला तिथेच मागे घेऊन जातात. ज्या गाण्यांमध्ये कधी आपण स्वतःलाच पाहिलं होतं, कधी त्या आवाजात रमताना त्या शब्दांमध्ये मनातील पुसटसे भाव शोधले होते तर कधी प्रेमात न पडताही प्रेमात पडल्याची अनुभूती याच गाण्यांनी तर दिली होती.. या हर एक गाण्याशी जोडलेली प्रत्येकाची एक खास गोष्ट होती.   

'ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इन्तज़ार,
सुन सदाएँ दे रही है, मंज़िल प्यार की'....

गाण्याची पहिलीच ओळ ओठांवर रेंगाळणारी. हे गाणं पाहतांना, ऐकतांना या गाण्याने प्रत्येकाला एक स्वप्न दाखवलं आणि प्रेमात पडणं खरंच किती गोड असतं असं वाटू लागलं.. 

'उसने बात की, कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हज़ारों रंग के, रेहे जाऊँ जैसे में हार के, और चूमे वो मुझे प्यार से.. पेहेला नशा, पेहेला खुमार'... जो जिता वही सिकंदर मधलं एक कमाल गाणं ! हे ऐकतांना, 'अनजाना अनदेखा आने लगा खयालों में ', असं काहीसं व्हायचं. स्क्रीन वर स्वतःला imagine करून, स्वेटर उडवून स्लो मोशन मध्ये गाणं म्हणणारा आमिर बघून सर्वाचा विसर पडायचा..  त्या गुलाबी रंगात मनसोक्त रंगून जावं असं वाटायचं. 

'हम तो मोहब्बत, करते हैं तुमसे, 
हमको है बस इतनी खबर,
तन्हाँ हमारा, मुश्क़िल था जीना, 
तुम जो न मिलते अगर.. 
बेताब साँसें, बेचैन आँखें,
केहेने लगीं, बस यहीं, 
दिल है कि मानता नहीं.. 
या गाण्यात लपलेली गुलाबी जादू आजूबाजूचं जग विसरायला लावायची. 

'अकेले हैं, तो क्या ग़म है, चाहें तो हमारे बस में क्या नहीं, बस इक ज़रा, साथ हो तेरा,तेरे तो हैं हम,कब से सनम, अकेले हैं'... और क्या चाहिये !

गुलाबी रंगामुळे आज परत एकदा या गाण्यांची आठवण झाली, वाटलं खरंच किती वेडे होतो आपण.आज काही क्षणांसाठी का होईना पण त्या आठवणी परत एकदा स्पर्शून गेल्या. या गाण्यांनी आपलं बोट धरून एक वेगळंच जग दाखवलं आपल्याला, काही वेळाकरता का होईना जगाचा विसरही पडला. आजही काळाच्या वेगात धावता धावता अधून मधून तो वेडेपणा आठवला कि हसायला येतं. आयुष्यातील इतक्या हळुवार टप्प्यावर ज्या गुलाबी गाण्यांनी साथ दिली ती गाणी आजही आपल्या सर्वांसाठी खास आहेत आणि कायमच राहतील. 

©कविता सहस्रबुद्धे

मोरपंखी रंग .. मोराच्या पिसाऱ्यात असणाऱ्या सगळ्या रंगांचं प्रतिक ! त्या विधात्याने मोराच्या पिसाऱ्यावर मुक्त हस्ताने रंगांची उधळण केली व त्यातूनच निळा आणि हिरव्या रंंगाच्या विविध छटा निर्माण झाल्या. हिरव्या रंगाची संपन्नता व निळ्या रंगाची स्थैर्यता मोरपिशी रंगात आढळते, हा रंग राधा कृष्णाचे अस्थित्व म्हणून ओळखला जातो. निळ्या रंगातला विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास, सचोटी तर हिरव्या रंगातली सृजनता, आरोग्यसंपन्नता, नावीन्य या रंगात सामावले असल्याने हा एक परिपूर्ण रंग आहे !


हा रंग अनेक कवींना भुरळ घालतो. मनाच्या अवस्था शब्द चित्रित करतांना हा रंग त्या अचूक टिपतो.
मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे
अंतरावर पसरलेले, टिपूरसे.. सुखाचे चांदणे !

कधी कधी आठवणींना आपण मोरपिशी आठवण म्हणतो..  मोरपिसाचा स्पर्श अनुभवला तरंच आठवणींना मोरपिसी आठवण म्हणण्यातला भाव समजू शकतो. मोरपंखी रंगाच्या साडीचं सौंदर्य प्रत्येक स्त्रीला खुणावत असतं.

माझ्यासाठी हा राधा कृष्णाच्या प्रेमाचा रंग आहे, हे प्रेम ज्याला समजलं त्याला या रंगांनं वेड लावलं ..

©कविता सहस्रबुद्धे

 

प्रभातीच्या केशराची
कुणि उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला
असा केशरी उल्हास!

इंदिरा बाईंच्या या शब्दांमधून एक सुरेख चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, केशरी रंगाचं!
सकारात्मक ऊर्जा देणारा व मनाला उत्साही ठेवणारा, ऊर्जा आणि आनंदाची भावना प्रेरित करणारा हा रंग.
 
मंद सुगंधी प्राजक्ताच्या इवल्या फुलांमधून डोकावणारा, देवळाच्या कळसावर फडकणारा अगदी देवळातल्या हनुमानाचा रंग सुद्धा हाच! श्रद्धेला, विश्वासाला जोडणारा हा रंग. हा रंग अग्नीचा, साधू संतांच्या पेहेरावाचा. 

सुर्योदय व सुर्यास्ताला क्षितिजावर पसरणारा हा रंग, तो पाहून कवीला 'शाम रंगीन हुई है तेरे आंँचल की तरह' सारखी गाणी सुचतात. 

हा रंग बलिदानाचा, वैराग्याचा.

'तलवारों पे सर वार दिए
अंगारों में जिस्म जलाया है
तब जाके कहीं हमने सर पे
ये केसरी रंग सजाया है…
ए मेरी ज़मीं अफसोस नहीं
जो तेरे लिए सौ दर्द सहे
मेहफूज रहे तेरी आन सदा
चाहे जान मेरी ये रहे ना रहे'..

प्रत्येकासाठी या रंगाचा अर्थ वेगळा, महत्व वेगळं पण तिरंग्यातील हा रंग पाहुन मनी उमटणारे भाव मात्र अगदी एक सारखे !

© कविता सहस्रबुद्धे

 

मराठीतला राखाडी रंग तर इंग्रजीतला ग्रे.. त्याचा उच्चार करतांनाच त्यातला deepness जाणवतो. थोडा नकारात्मक, थोडा उदासीचा, अनिश्चिततेचा तरी संतुलित, वास्तवाचा, परिवर्तनाची ताकत दर्शवणारा रंग !

आजीनं अंगाऱ्याचं बोट कपाळावर लावलं की त्या अंगाऱ्यात, स्वयंपाक घरातील चूल विझली की चुलीतील राखेत, मळभ दाटून आलं की आकाशात आणि मनावर पसरणारा हा रंग, तसा तटस्थ, निःपक्षपाती, परिपक्व, गडद व भावनांकडे झुकणारा ! 

माळरानात निष्पर्ण झालेली झाडे उदास वाटतात, ती याच रंगाची असतात. वयानुरूप येणारी विरक्ती किंवा कमी होत जाणारी आसक्ती दर्शवणारा हा रंग..

Gray refers to cleverness, intelligence, brains, and intellect.. मानवी मेंदूचा रंग आहे हा.

फॅशन,सजावट व ब्रँड ओळख यासाठी हा एक महत्वाचा रंग आहे. पेपर सॉल्ट लुक मधलं देखणेपण म्हणजे याच रंगाची तर जादू आहे.

एकटेपणा व विरह सामावून घेणारा, काही शब्दांमधून डोकावणारा हा रंग..
खाली हाथ शाम आयी है 
खाली हाथ जायेगी 
आज भी न आया कोई
खाली लौट जायेगी,
खाली हाथ शाम आयी है ..

©कविता सहस्रबुद्धे

हिरवा रंग 


मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने 
सपने सुरीले सपने ...

गुलजार साहेबांनी आपल्या स्वप्नांना सात रंगांमध्ये रेखाटलं, प्रत्येक स्वप्न वेगळं ! 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' म्हणणारा प्रत्येक रंग वेगळा म्हणून त्याच्याभोवती रेंगाळणाऱ्या आठवणी सुद्धा वेगळ्या.

लहानपणी मराठीच्या पुस्तकात 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे' या ओळींत तर गवतफुला कवितेतील 'हिरवी नाजुक रेशिम पाती' मधला हिरवा रंग नंतर शांता बाईंच्या कवितेत चक्क हिरवा ऋतू झाला, 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा पाचूचा मनी रुजवा'.

शंकर वैद्यांच्या एका कवितेत तर त्यांनी शांततेला हिरवा रंग दिला.
घराचे पाठीमागले दार उघडले
तेवढाच काय तो कडीचा आवाज
बाकी शांतता... हिरवी शांतता...
गार शांतता...

'निंबोणीच्या झाडामागे' हे अंगाई गीत ऐकतांना कल्पनेत पाहिलेलं निंबोणीचं झाड पण  हिरवं दिसायचं, ती छटा आईच्या स्पर्शाइतकी मुलायम वाटायची.

लहान असताना बोडणासाठी बोलावलं की हिरव्या रंगाचं परकर पोलक घालून आई सोबत जाणं, सुट्टीत झाडाच्या कच्च्या कैऱ्या पाडणं, श्रावणात आई बरोबर पत्री गोळा करणं, श्रावणी सोमवारी बेल, पूजेला विड्याची पानं तुळस आणणं, दारी आंब्याचा डहाळा लावणं.. हे करता करता हा रंग रोजच्या आयुष्याचा भाग बनला. 

'मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग' गुणगुणताना या रंगानं स्वप्न दाखवलं तर याच रंगाच्या चुड्यानं मेंदीने नटलेल्या हातांमध्ये वरमाला पाहिली. डोहाळ जेवणात याच रंगाच्या साडीत मातृत्वाची चाहूल अनुभवली. याच रंगाच्या पैठणी साडीत तिचं सौंदर्य तसूभर जास्त खुललं.. हा रंग सौभाग्याचं, चैतन्याचं, भरभराटीचं प्रतिक आहे म्हणूनच या रंगाला कायम विशेष महत्व दिलं.

समृद्धतेचं प्रतिक असणाऱ्या या रंगाला आपल्या तिरंग्यात मानाचं स्थान आहे. 

पृथ्वीवर निळ्या रंगासोबत अधिराज्य करणारा हा रंग. या रंगाची किमया कोणीतरी मुक्तहस्ते उधळण करावी तशी सर्वत्र पसरलेली दिसते. म्हणूनच वैशाख वणव्यानंतर या रंगाची चहूकडे पसरणारी जादू पाहण्यासाठी आपलं मन सुद्धा व्याकुळ होतं.

हरी हरी वसुंधरा पे
नीला नीला ये गगन
के जिस पे बादलों की
पालकी उड़ा रहा पवन 
ये कौन चित्रकार है,
ये कौन चित्रकार...

© कविता सहस्रबुद्धे

 पिवळा रंग


विविध रंगांमध्ये मिसळून गेलेले आपलं आयुष्य.. प्रत्येक रंग एक वेगळं नातं घेऊन समोर येतो हे हळूहळू उमगत जातं. पिवळा रंग आत्मविश्‍वास वाढवणारा, मनाला आनंदी आणि उत्साही ठेवणारा सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो.

सणावारी दारावर शोभून दिसणारं झेंडूच तोरण याच रंगाचं, गावाकडे परसदारातलं श्रीमंती मिरवणारं सोनचाफ्याच्या झाडाचं फुल सुद्धा याच रंगाचं तर प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा मधेच डोकावणारी सुर्यफुलं आणि डोंगरावरची रानफुलं सुद्धा याच रंगाची ! गर्द पिवळ्या रंगाचं मखमली बाभळीचं इवलं फुलं सुद्धा किती सुरेख दिसतं!

सूर्योदयाला क्षितिजावर डोकावणारा याच रंगाचा सूर्य रोज नवीन दिवसाची नवीन सुरवात करून देतो.. जगण्याची प्रेरणा देतो. लक्ष्मीचा आणि श्रीकृष्णाचा आवडता रंग सुद्धा पिवळा त्यामुळे हा रंग मांगल्याची अनुभूती देतो.

लग्नाच्या वेळी आंब्याच्या पानांनी लावलेल्या हळदीच्या याच रंगानं चेहऱ्यावर विलक्षण तेज येतं तर लग्नाच्या वेळी मामाने घेतलेल्या याच रंगाच्या जरीकाठी साडीवर उभं राहता या रंगाशी अनोखा बंध जोडला जातो, कायमचा..

कुंकवाआधी कायम मानाची जागा घेणाऱ्या हळदीचा हा पिवळा रंग कुंकवासोबत स्त्रीच्या कपाळावर शोभून दिसतो. शुभंकरोती म्हणताना दिव्याच्या ज्योतीचा हाच रंग मनाला शांत, प्रसन्न करतो. नैवेद्याच्या ताटात सुद्धा बहुमान मिळतो याच रंगाला जसं लिंबू, बटाट्याची भाजी, वरण, पुरण अशा विविध पदार्थांमधून तो खुणावत राहतो. 

शिशिर ऋतुमधे तर या रंगाच्या अनेक छटांची पानगळ आपलं लक्ष वेधून घेते. तेव्हा बोरकरांच्या कवितेतील काही ओळी आठवतात,

पिलांस फुटूनी पंख तयांची 
घरटी झाली कुठे कुठे
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटे..

© कविता सहस्रबुद्धे

 निळा रंग


पिघले नीलम सा बेहता हुआ ये समांँ

नीली नीली सी खामोशियाँ  न कहीं है ज़मीन,न कहीं आसमान... 

समुद्र आणि आकाशाला सामावून घेणारा हा विलक्षण देखणा रंग !
हा रंग ज्ञानाचे प्रतिक मानला जातो त्याबरोबरच हा रंग प्रसन्नता, स्तब्धता, विश्वास, शांतता, स्थिरता या भावनाही निर्माण करतो.निसर्गाच्या अलौकीक शक्तीचा परिचय हा रंग, अव्याहतपणे आपल्याला देत असतो.मोरपिसातला हाच निळा रंग आपल्याला कृष्णाशी जोडतो.

कवी शायर लेखक यांना खुणावणारा, प्रेरित करणारा हा रंग.. 'निले निले अंबर पर चांँद जब आए', 'निला आसमाँ सो गया', 'निले गगन के तले धरती का प्यार पले'..सारख्या गाण्यांमधून आयुष्यात डोकावत राहतो !

ग्रेसांची एक कविता आहे 'निळाई' ..
असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी..

निळ्या रंगाची ग्रेसांनी दाखवलेली जादू तर फार विलक्षण आहे..

निळे सूर आणि निळी गीतशाळा
निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची
भिजेना परी ही निळी पालखी...

निळाई सारखा इतका सुंदर शब्द मग फिरून फिरून समोर येत राहिला अगदी वादळाच्या वाटेवरती सुद्धा.. 
 
थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले 
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत.…

हाच निळा रंग कधी गोऱ्यापान निरासग गोड चेहेऱ्याच्या डोळ्यांमधून चमकून जातो. 
मला आठवतंय माझ्या भाच्याच्या जन्मानंतर हॉस्पिटल मध्ये निळ्या रंगात सजलेली ती खोली, तो पाळणा पाहून त्या निळ्या रंगाशी जोडला गेलेला धागा मातृत्वाच्या जवळ घेऊन गेला.

वीर सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' कविता वाचताना,ऐकतांना वाटतं ती तळमळ, ती ओढ हा रंग जणू सामावून घेतो आपल्यात !

©कविता सहस्रबुद्धे

लाल रंग 


लहानपणापासून कितीतरी वेळा कौतुकानं आईने केलेलं आपलं औक्षण ! जेव्हा काहीही कळत नव्हतं तेव्हा सुद्धा औक्षण करणाऱ्या आईला पाहून झालेला आनंद व पुढे कळायला लागल्यावर निरांजनाच्या शांत प्रकाशात दिसलेला आईचा समाधानी चेहेरा, आजही तसाच आहे.. आपल्या कपाळावर सर्वात प्रथम तिने लावलेलं कुंकवाचं बोट .. लाल रंगाशी झालेली ती बहुतेक आपली पहिली ओळख, पहिला स्पर्श !

मग तो रंग वेगवेगळ्या रूपांत आसपास कायमच दिसत राहिला. कधी रंगबिरंगी  खेळण्यांमधून, कधी जत्रेत हातात भरलेल्या बांगड्यांमधून तर कधी दुकानांतून डोकावणाऱ्या कपड्यांमधून, कायम खुणावत राहिला ! त्रंबकेश्वरच्या घरी फुललेला जास्वंदाचा लाल जर्द रंग अजूनही स्मरणात आहे. याच रंगाची जादू विड्याच्या आणि मेंदीच्या रंगण्यात अनुभवली आहे !

प्रत्येक वर्षी नवरात्रीत आई सोबत देवळांत गेल्यावर देवीच्या कपाळावरच्या ठसठशीत कुंकवानं सजलेलं तिचं रूप पाहून या रंगाची ताकत हळूहळू गडद होत गेली. सनईच्या मंगल सुरांच्या सोबतीनं लग्नात मंगळसूत्राच्या वाटीत भरलेलं कुंकू पाहून तर या रंगाशी नातं जोडलं गेलं ! 

या रंगानं यश राजची गाणी मनावर कोरली, याच रंगानं सुर्यास्ताला क्षितिजावर नजर खिळवून ठेवली, याच रंगांन दारातील रांगोळी सजवली, याच रंगानं साडीचं वेड लावलं...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या रंगाच्या वेगवेगळ्या छटा स्पर्शून गेल्या. आईच्या आजारपणात ब्लड बँकेत काऊंटर वर उभं असताना याच रंगांन कृतज्ञता शिकवली ..

शौर्याचं, पराक्रमाचं प्रतिक असणाऱ्या या रंगाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व या निमित्तानं आज नव्यानं समोर आलं !

©कविता सहस्रबुद्धे


रंग​ - नवरात्र ​

रंग म्हटलं की रंगांच्या कितीतरी छटा नजरेसमोरून धावतात मग ते सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळचे आकाशातील रंग असोत  निसर्गातील किमया असो वा कॅनव्हासवरची जादू .. अगदी आपल्या कपड्यांपासून जेवणाच्या ताटात सुद्धा सामावलेली असते ही रंगांची दुनिया ! 

नवरात्री मध्ये तर प्रत्येक दिवस वेगवेगळ्या रंगामध्ये रंगून जातो. आजचा पहिला रंग, पांढरा !

श्रावणात सोमवारी शंकराच्या देवळांत जातांना परडीमध्ये आवर्जून गोळा केलेली फुलं पांढरी, बाप्पाला आवडतात म्हणून केलेले सुबक, देखणे मोदकही पांढरे ! चांदण्या रात्रीला गंधित करणारी रातराणी व गर्मीमध्ये सुखावणारा मोगरा तो ही शुभ्रच. 

आयुष्यात सदैव सोबत असणारे हे रंग काही वळणांवर मात्र त्यांची  ओळख नव्याने करून देतात.

"इश्क का रंग सफेद .. जिस रंग में सब रंग जावे कभी करे ना भेद, इश्क का रंग सफेद".. रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणं ऐकलं की वाटतं या गाण्यात दिसलेला, अनुभवलेला 'सफेद  रंग' खरंच 'इश्क का रंग' आहे !

"मै शाम को तुम्हे मिलना चाहता हूँ .. लेकीन मेरी चांँदनी बनकर आना, सफेद दुधीया रंग के कपडे पेहेनकर आना" ..
हा डायलॉग संपतो आणि दिसते गच्चीवर वाट बघणारी, शुभ्र कपड्यातली चांँदनी.. तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाल्यावर त्या लाल गडद पाकळ्यांवर उभी असलेली 'चांँदनी', आजही डोळे मिटले तरी तशीच समोर येते ! 

'जय तिजोरी में काफी माल है, लगता है इस गाव के लोग सोना बहोत पेहेनते है'.. या डायलॉग च्या पार्श्वभूमीवर  दिसणारी पांढऱ्या साडीतील स्त्री .. नंतरच्या प्रसंगात चोरी करणाऱ्या जय वीरुला तिजोरीच्या किल्ता देतांना, 'ये लो तिजोरी की चाबी। इसमे मेरे वो गेहेने है जो मेरे लिए बेकार है, मुझे अब कभी उनकी जरुरत नहीं पडेगी'.. असं म्हणणारी, डोक्यावरून पदर घेतलेली, पांढऱ्या साडीतील ठाकूरची बहू .. तिच्या पेहेरावातला पांढरा रंग फार वेगळा आहे, करूण आहे ..

15 ऑगस्ट, 26 जानेवारीला हाच रंग चैतन्य, उत्साह आणि अभिमानाच रूप घेतो. तिरंग्यातील हा रंग प्रेरणा देतो !

'हॉस्पिटलच्या खिडकीतून मला देवळाचा कळस रोज दिसायचा पण 'तो' मात्र मला इथे भेटायचा हॉस्पिटलमध्ये' .. असं म्हणणाऱ्या पेशंट करता या रंगांचं महत्व, दैवी आहे !

गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें 
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक 
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए 
दिल ढूँढता है 
फिर वही फ़ुरसत के रात दिन...

गुलजार .. ज्यांच्या लेखनात कितीतरी अनोखे, वेड लावणारे, जादुई रंग सामावले आहेत ते गुलजार साहेब स्वतः मात्र कायम पांढरे शुभ्र कपडे घालतात.. त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल वाचलं की वाटतं त्या शांत, समाधानी शुभ्र पेहेरावामागे त्यांनी आपला भूतकाळ सांभाळून ठेवला आहे .. 'जैसे लगता है गुलज़ार कभी अपने माज़ी के गाँव दीना की गलियों से बाहर आए ही नहीं'..

© कविता सहस्रबुद्धे

गृहिणी-मित्र ...एक हजार पाकक्रिया

दिवाळी जवळ आली कि ऑफिसमध्ये लंच टाइमला गप्पांचा विषय आपोआप पदार्थांकडे वळतो. उद्यापासून सुट्टी त्यामुळे कोण कोण काय काय पदार्थ करणार यावर खरपूस चर्चा रंगली होती. प्रत्येक दिवाळीत सणाचा माहोल जसजसा बनत जातो तशी आईची अजूनच आठवण येते. तिने बनवलेल्या फराळाच्या पदार्थांची चव आजही डोळे बंद करून आठवावीशी वाटते... प्रत्येक पदार्थ उत्तम चवीचा आणि त्याच देखण्या रूपाचा बनवायचं वरदान बहुतेक आपल्या प्रत्येकाच्याच आईला मिळालं होतं.आपणही तोच प्रयत्न अगदी मनापासून करतो, आपल्या मुलांकरता.

 YouTube, Cooking Apps, cooking shows, मधुराज रेसिपी च्या जमान्यात पाकशास्त्रातील पुस्तकं काही अंशी मागे पडली कि काय असं वाटत असलं तरी आईनी, सासूबाईंनी आपलं नवीन लग्न झालेलं असतांना दिलेली रुचिरा, अन्नपूर्णा सारखी पुस्तकं आपण आजही आवर्जून वापरतो. काही वर्षांपूर्वी 'गुलाबजाम' नावाची एक देखणी फूड फिल्म आली होती. त्यात एक वाक्य होतं, 'मी तुम्ही केलेल्या डब्यातले पदार्थ चाखले आणि मन आईपाशी गेलं'.. खरंच आपल्या मनातली ती ठराविक चव शोधत असतो आपण प्रत्येक पदार्थात !

आज योगायोगाने पाकशास्त्रावरील ११२ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं लक्ष्मीबाई धुरंधर लिखित ‘गृहिणी-मित्र .. एक हजार पाकक्रिया’ हे पुस्तक हाती लागलं, १९१० मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक. लक्ष्मीबाई धुरंधर या क्षेत्रातल्या अनुभवी, कर्तबगार व्यक्ती तर होत्याच शिवाय तपशीलवार,सूक्ष्म बारकाव्यासहित नेमकेपणाने आपला विषय मांडणाऱ्या पाककला विदुषी होत्या. मराठीबरोबरच इंग्रजी, गुजराती, उर्दू या भाषा त्यांना अवगत होत्या. या पुस्तकाच्या तेराव्या आवृत्ती नंतरच्या पुढील चार आवृत्त्या त्यांच्या कन्या मंजुळाबाई गोरक्षकर यांनी काही पाककृतींची भर घालून अद्ययावत केल्या. 

या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या एक हजार प्रति तर पुढच्या बारा आवृत्तीच्या दोन हजार प्रति त्या काळी काढल्या गेल्या इतकंच नाही तर या पुस्तकाचे हिंदी व उर्दू मध्ये भाषांतर सुद्धा झाले. तेराव्या आवृत्तीची किंमत तेव्हा पाच रुपये होती. त्या काळी 'राजाश्रय' ही नेहमीच वरदान ठरलेली गोष्ट असे. इंदूरच्या महाराणी इंदिराबाई होळकर यांना पुस्तक आवडल्याचे तसंच दुसरी आवृत्ती काढल्याबद्दल कौतुकाचे पत्र, तसेच महाराणी चंद्रावतीबाई होळकर यांनी पहिल्या आवृत्तीला शंभर रुपये बक्षीस जाहीर केल्याची नोंदही या पुस्तकात सापडते. दोन डझन प्रतींच्या मागणीबरोबरच सयाजीराव महाराजांकडून आलेला टिपरी, पायली या प्रमाणांऐवजी तोळे, मासे यांचे कोष्टक वापरण्याचा अभिप्राय बोलका आहे जो पुढच्या आवृत्तीमध्ये लक्ष्मीबाईंनी पाळला.१९९७ मध्ये विसावी आवृत्ती प्रकाशित झाली तीच शेवटची..

हे पुस्तक पाच विभागांत विभागलं गेलं आहे. पहिला भाग शाकाहारी पदार्थांचा, दुसऱ्या भागात आहेत माशांचे प्रकार, तिसऱ्यात मटण, अंडी वगैरेंचे प्रकार, चौथ्या भागात केक, पेस्ट्री, आइस्क्रीमच्या पाककृती, तर पाचव्या भागात आजारी माणसांसाठी पथ्य पाकक्रिया दिल्या आहेत. या पुस्तकात गुजराती, पारशी, मद्रासी, तामिळी, पारशी, चिनी, इराणी, इटालियन, जपानी पाककृती सुद्धा दिल्या आहेत. २०व्या शतकाच्या आरंभी सेलरी, अस्परॅगस, मश्रूमसारख्या भाज्यांच्या पाककृती देऊन लेखिकेने आधुनिकतेचा वारसा जपला आहे.

पुस्तकातील काही पाककृतींची नावे 'ज्याचे श्रेय त्याला द्यावे' या वृत्तीची आहेत. जसं अहिल्याबाई किर्लोस्करांचे हैदराबादी चकले, काशीताई किर्लोस्करांचे चिरोटे, रमाबाई भक्तांचे आंब्यांचे रायते, नाचणीचे चकले, कमलाबाई बालासुब्रह्मण्यम कडून अय्यर लोकांचे चकले अशी नावं पाककृतींना दिली आहेत. आदान-प्रदान हे पाककृती साहित्याचे वैशिष्टय़ इथे खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. 

पुस्तकातील केक व पुडिंग या पाककृतींची नावं विशेष आहेत. इंदिरा, गुलाब, गंगा, सुधा, कमला, लीला, लक्ष्मी, शेवंती, केतकी, मधु, वामन, दिग्विजया, वामन, ईश्वर, क्षिप्रसाधन ही काही केकची, तर मनोरमा, दुर्गा, स्नेहलता ही काही बिस्किटांची नावं आहेत. शेवंता, इंद्रायणी, चंपा, ब्रिजबिहारी ही पुडिंगची नावं, तर रासबिहारी काँग्रेस पुडिंग, ठाकरसी हलवा, काजूचा खरवस नावानेही पदार्थ आहेत. काश्मिरी नेहरू मटण, नेहरूपसंत हैदराबादी शिकार आणि विश्वामित्री खिचडी फक्त इथेच मिळेल. 

गरम मसाला, करीचा मसाला,करीचा ओला मसाला, पंचामृताचा मसाला, मद्रासी मसाला, सिंधी मसाला, जैनांचा मसाला, गुर्जरांचा मसाला, गुजराथी सांबारयाचा मसाला, इंग्रजी मसाला, दौरोपयोगी करी मसाला अशी मसाल्याची विविधता आहे. या पुस्तकात चिवडा ‘छबिना’ नावाने आला आहे, त्यातही विलासी आणि कुंजविहारी असे दोन प्रकार आहेत. नॅशनल मराठा आर्मीचा छबिना, बटाटय़ाचा तसंच साबुदाण्याचाही छबिना आपल्याला विस्तृत कृतीसह दिला आहे. 

पुस्तकातील शब्दांचे स्पष्टीकरण जुन्या काळात घेऊन जातं जसं कासला (पेला), शिंगडय़ा(करंज्या), कवड (अर्धा नारळ), सोय (खवलेला नारळ), टोप (पातेले), खोडवे (पंचपात्री), क्यारवेसीड (गोड जिरे),कापट्या (फोडी). अंडी ताजी ठेवण्याकरता सोडियम सिलिकेट किंवा वॉटर स्लस्स् वापरावा हे सुद्धा इथे सांगितले आहे

आधी उल्लेख केलेला 'गुलाबजाम' चित्रपट रिलीज झाला २०१८ मध्ये ज्यात फूड डिझायनींग करता वेगळी टीम होती. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आपण ते पहिल्यांदा पाहिलं होतं. पण  आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९१० मध्ये लिहिलेल्या या पुस्तकांत 'पदार्थश्रृंगार' नावाने उत्तम टिपण आहे. यात टेबलावर नेण्यासाठी पाककृतीचे सादरीकरण कसे करावे यावर आजही उपयुक्त ठरेल अशी माहिती आहे. 

'सार्वभौम रसना महाराणी होणे असल्यास हे पुस्तक संग्रही ठेवा' असं सांगणारं हे पुस्तक नुसतं चाळलं पण समाधान काही झालं नाही. काल गप्पांच्या ओघात काही संदर्भ निघाले म्हणून माझ्या सहकाऱ्याने आम्हाला आवर्जून दाखवण्याकरता आपल्या आजीचं जपून ठेवलेलं हे पुस्तक आज ऑफिस मध्ये आणलं. पुस्तकाचं सुरकुतलेपण पाहूनच त्याच्या वयाचा अंदाज आला आणि ते वाचतांना त्यातील पदार्थ नजाकतीनं करणारी त्या काळातील आपली आजी पण दिसली !

©कविता सहस्रबुद्धे

 गाण्यामागची गोष्ट 

१९६० च्या दशकात सफेद धोतर आणि शर्ट अशा पेहेरावातला एक उंच बंगाली माणूस मर्सिडीज चालवत मुंबईत फिरत असे. तो गाणी गात असे, गाण्यांना संगीत देई व चित्रपट निर्मिती सुद्धा करत असे.. ती व्यक्ती म्हणजेच हेमंत मुखोपाध्याय अर्थात हेमंतकुमार !

गुलजार साहेब त्यांची एक आठवण आवर्जून सांगतात. 'बिमल रॉय अचानक गेले तेव्हा आम्ही बिमलदांची मुलं अनाथ झालो अशा वेळी हेमंतदा पुढे आले. त्यांच्या हृदयात औदार्य, प्रेम काठोकाठ भरलं होतं. त्यांनी प्रत्येकाच्या कामाची व्यवस्था केली. मुकुल दत्त या बिमलदांच्या सेक्रेटरीला त्याच्यातील कवीचे गुण ओळखून बंगाली गाणी लिहिण्याचं तर मला स्वतःच्या चित्रपट निर्मिती संस्थेत हिंदी चित्रपटाची गाणी व पटकथा लिहिण्याचं काम त्यांनी दिलं'.

'दीप ज्वेले जाई' हा असित सेन यांचा बंगाली चित्रपट हिंदीत करण्याची इच्छा हेमंतदांनी असित सेनकडे व्यक्त केली व त्यावर काम सुरू केलं, तो चित्रपट म्हणजे 'खामोशी'. या चित्रपटाकरता गीत लेखनाचं काम होतं गुलजार साहेबांकडे. 'हमने देखी है इन आँखो की मेहेकती खुशबू'.. प्रियकर आपल्या प्रेयसीकडे पाहून हे गीत म्हणतो अशा situation वरती गुलजार साहेबांनी लिहिलेलं हे गीत.

हेमंतदांनी अतिशय सुरेख चाल लावली या गीताला व 'हे गीत लता गाईल'असं जाहीरपणे सांगून टाकलं. यावर गुलजारजींनी प्रयत्न केला समजावण्याचा की एका तरुणाच्या अभिव्यक्तीचं हे गीत एक तरुणी गाते आहे हे कसं वाटेल. पण हेमंतदा आपला निर्णय बदलायला काही तयार नव्हते. शेवटी, हे गाणं रेडिओवर एक तरुणी गाते आहे असं दाखवायचं ठरलं. गाणं रेकॉर्ड झालं, चित्रित झालं आणि गाजलं सुद्धा ! लताजींच्या आवाजातील हे गाणं ऐकतांना असं कधी वाटलंच नाही की हे मूळ गाणं स्त्रीच्या आवाजात रेकॉर्ड करण्यासाठी लिहिलंच नव्हतं. 

असं म्हणतात हेमंतदांच्या संगीताची जादू, त्यांची शैली, त्यांची विख्यात गायकी, कुठलंही अवडंबर नसलेली प्रतिमा, निरागस हळवं मन आणि उत्तम विचारसरणी हे एक फार दुर्मिळ आणि 'रॉयल कॉम्बिनेशन' होतं !

© कविता सहस्रबुद्धे

 गाण्यामागची गोष्ट


शबानाजींच्या जन्मानंतर कैफ़ी आज़मी यांच्या पत्नी शौकत आज़मी पृथ्वी थिएटरमध्ये नोकरी करत होत्या. पृथ्वीराज कपूर यांनी तालमीच्या वेळी छोट्या शबानाच्या देखरेखीसाठी एका आयाची व्यवस्था केली होती. एकदा शौकतजी पृथ्वी थिएटर सोबत टूरवर जाणार होत्या. त्यांनी कैफ़ी साहेबांना लागणाऱ्या पैशाच्या बंदोबस्ताची विनंती केली.संध्याकाळी स्टेशन वर ट्रेन निघायच्या वेळी कैफ़ी साहेबांनी त्यांच्या हातावर तीस रुपये ठेवले जी त्या काळात मोठी रक्कम होती. शौकतजी आश्चर्यचकित झाल्या कि एवढे पैसे त्यांनी कुठून आणले. टूरवरून परत आल्यानंतर त्यांना कळले की, कैफ़ीजींनी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शौकतजींच्या पगाराची आधीच उचल घेतली होती. कैफ़ीजींनी पैसे कोठून आणले हे सांगताच शौकतजींच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटलं व पुढच्याच क्षणी दोघांचे डोळे निमिषार्धासाठी पाणावले. त्या वेळी ते दोघेही आर्थिक अडचणी हसत खेळत झेलत होते. आपल्या पत्नीचेच पैसे उचल घेऊन तिलाच हातखर्चासाठी द्यावे लागले, यातील अगतिकता कैफ़ी साहेबांना बोचत होती. 

खरं काय हे सांगितल्यावर पत्नीच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हलकं हास्य व काळजातलं दुःख जे तिच्या डोळ्यांच्या कडा भिजवून गेलं हे ते कधीच विसरू शकले नाहीत. ती बोच, ती सल त्यांच्या मनांत खोलवर रुतून बसली. दुसऱ्या दिवशी कैफ़ी आज़मींनी आपल्या प्रिय पत्नीच्या भावना शब्दबद्ध करत एक नज़्म लिहिली, जी नंतर त्यांनी आपली मुलगी शबाना काम करत असलेल्या 'अर्थ' चित्रपटांत वापरली.... 'तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो...'

© कविता सहस्रबुद्धे

 गाण्यामागची गोष्ट 


नैसर्गिक व संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील ! आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या स्मिता यांची चित्रपट कारकीर्द केवळ दहा वर्षांची असली तरी अविस्मरणीय राहिली. एका दशकात जवळपास ८० चित्रपटात त्यांनी काम केलं. मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती,कन्नड,मल्याळम आणि तेलगू अशा एकूण आठ भाषांतील चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे आणि सूक्ष्म  बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं व आपल्या अप्रतिम अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. 'जैत रे जैत' व 'उंबरठा' या दोन चित्रपटांतील त्यांची भूमिका आजही विशेष लक्षात राहणारी ! 

'जैत रे जैत' हि गो. नी. दांडेकर यांची अनोखी कलाकृती,कादंबरी.. ठाकर लोकांच्या जीवनातली गोष्ट सांगणारी. या गोष्टीतील नायक नाग्या भगत व त्याची प्रेयसी चिंधी यांची उत्कट प्रेमकथा. निसर्ग व माणसाचं नातं उलगडणारी, मनास भुरळ घालणारी, 'जैत रे जैत' म्हणजे झालेला विजय, तो क्षण येण्यासाठी घेतलेले कष्ट अधोरेखित करणारी गोष्ट ! या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. दिदींच्या आग्रहाखातर ना.धो. महानोरांनी तब्बल 16 गाणी या चित्रपटासाठी लिहिली त्यापैकी 'मी रात टाकली' हे एकमेव गाणं दीदींनी गायलं.

आशाताईंच्या आवाजातील..'नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात'.. या गाण्याची नुसती आठवण जरी झाली तरी डोळ्यांसमोर ढगांनी गच्च भरलेलं सावळं आभाळ उभं राहतं. सर्व मंगेशकर भावंडांचा एखाद्या चित्रपटाच्या संगीतात एकत्रित सहभाग असणारा हा चित्रपट.  
'नभ उतरु आलं' या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी कोरसमधील एक गायिका अनुपस्थित होती. त्यावेळी लतादिदी यांच्या भगिनी मीना खडीकर या कोरसमध्ये गायला उभ्या राहिल्या.

हृदयनाथजींनी या चित्रपटाची, या गाण्याची एक आठवण एका कार्यक्रमात सांगितली होती. डॉक्टर जब्बार पटेल यांनी 'जैत रे जैत' साठी होकार दिल्यावर बऱ्याच बैठका, चर्चा झाल्या व हा चित्रपट सांगीतिक असावा असं ठरलं. त्याक्षणी हृदयनाथजींना आपल्या आजोळची आठवण झाली, खानदेशची. तिथली लोकगीतं , गाणी लहानपणी ऐकली होती त्यामुळे साहजिकच पुढचा रस्ता माहित होता, गीतकार म्हणून ना.धो. महानोर यांचं नाव मनातं आलं. एका ठिकाणी गाण्याची सिच्युएशन जब्बार साहेबांनी सांगितली पण मनासारखी चाल काही सुचत नव्हती. अखेरीस चाल सुचली आणि महानोरांनी दिलेल्या मीटर मध्ये गीत लिहिलं, तब्बल अठ्ठावीस अक्षरांचं धृवपद ! 
हृदयनाथजी म्हणतात महानोरांची गाणी चालीसकटच जन्म घेतात. चिरतारुण्याचं आशिष घेऊन जन्मलेली आहेत हि गाणी !

© कविता सहस्रबुद्धे

 डॉन


​'जुनं ते सोनं' या म्हणीला सार्थ ठरवत १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला 'डॉन' चित्रपट The Chase Begins Again म्हणत २००६ मध्ये तर The King Is Back म्हणत २०११ मध्ये sequel पॅटर्न मध्ये रिलीज झाला. ते दोन्हीही चित्रपट थिएटर मध्ये बघितले आणि 'ओरिजिनल डॉन' थिएटर मध्ये पाहता न आल्याचं दुःख प्रकर्षानं झालं. असं म्हणतात 'अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है '.. बिलकुल खरं असावं हे कारण PVR मध्ये मागच्या चार दिवस सुरु असलेल्या फिल्म फेस्टिवल मुळे हा योग जुळून आला. तिथे चित्रपट पाहायला आलेल्या हौशी प्रेक्षकांना पाहून वाटलं, पिढीतलं अंतर पुसलं या माणसानं ! त्याच्या प्रत्येक एंट्रीला शिट्या, त्याच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि प्रत्येक गाण्यावर वय विसरून नाचणारे, ठेका धरणारे दर्दी रसिक प्रेक्षक पाहून त्याच्यावर प्रेम करणारी 'वेडी माणसं' दिसली त्या दिवशी. 

सिंबायोसिस मध्ये काम करतांना मागच्या सतरा वर्षांत अनेक मोठ मोठ्या लोकांना भेटण्याचा, जवळून पाहण्याचा, ऐकण्याचा योग जुळून आला. वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं मोठेपण जपलेल्या अनेक नामवंत व्यक्तिमत्वांमध्ये जसं म्हणतात ना 'ते आले आणि त्यांनी जिंकलं' असा माहोल मी बघितला एकतर आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी आले होते तेव्हा आणि दुसरं नाव म्हणजे साक्षात अमिताभ बच्चन ! 

२०१० व २०१४ मध्ये त्यांना प्रत्यक्ष जवळून बघण्याचा, ऐकण्याचा योग आला तर २०२० मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी online संवाद साधला. आमच्या विद्यापीठात 'मानद प्रोफेसर' असणाऱ्या त्यांना प्रत्यक्ष ऐकणं हा एक विलक्षण सोहळा होता, आमच्यासाठी !

बाबुजी आणि त्यांच्या कविता याबद्दल विचारलं असता ते म्हणाले होते, "कोणत्याही कवितेत जेव्हा आपण स्वतःला बघू शकतो तेव्हाच ती कविता महान होते". 'है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है' या स्वर्गीय हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्ती मागील भावना उलगडतांना ते म्हणाले, "जो उजडा हुआ है, बिखरा हुआ है उसको फिर से वापस लाना कब मना है, आजूबाजूला अंधकार असतांना आपण आपला रस्ता शोधायला हवा. हि कविता लिहितांना त्यांच्या मनात नक्की काय होतं हे माहित नाही पण त्यांच आत्मचरित्र वाचल्यावर या कवितेच्या ओळी लिहितांना त्यांच्या मनांत काय असेल हा अंदाज मी बांधला. माझ्या वडिलांच्या पहिल्या बायकोचे लग्नानंतर एका वर्षातच अतिशय वेदनादायी आजारानंतर निधन झाले. त्यांना टीबी झाला होता. वडील तेव्हा शिकवणी घ्यायचे. ४ / ५ मैल चालत जाऊन त्या शिकवणीतून महिना कधी २५ तर कधी जास्तीत जास्त १०० रुपये त्यांना मिळायचे. या दुःखद घटनेनंतर त्यांनी खूप दुःखी कविता लिहिल्या. पुढील तीन चार वर्ष त्यांनी प्रचंड औदासिन्य वातावरणांत घालवली. पुढे एका जवळच्या मित्राच्या घरी ते आईला पहिल्यांदा भेटले, तिच्याशी त्यांची तिथे ओळख झाली, जिथे त्यांनी तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. मला वाटतं त्या वेळी त्यांच्या त्या मानसिक स्थितीमध्ये आईचं असं भेटणं त्यांच्यासाठी एक हळुवार घटना होती, जणू आजूबाजूला पसरलेल्या अंधःकारात त्यांच्यासाठी तोच एक दिवा होता, प्रेरणा होती"... हे ऐकून ती कविता परत वाचली !

१९७५ मधला अँग्री यंग मॅन ते ब्लॅक, पा, पिंक, चिनी कम, पिकू पर्यंत झालेलं ते सहज परिवर्तन आणि या यशामागील गुपित जाणून घेतांना ते म्हणाले, "माध्यमं सतत बदलत राहिली अखंडपणे.. तो माझ्यातील बदल नव्हता. अँग्री यंग मॅन मी नव्हतो तर ती एक व्यक्तिरेखा होती, दिग्दर्शकाने साकारलेली. लेखकाने गोष्ट लिहिली, संवाद लिहिले, त्याने त्याच्या गोष्टीतील जागा सुचवली, त्याच्या गोष्टीतील माणसं कशी आहेत हे सांगितलं. आम्ही दिग्दर्शकाचं फक्त ऐकलं, चेहऱ्यावर कोणते भाव हवेत हे पण त्यानेच सांगितलं त्यामुळे हे सर्व श्रेय त्यांच आहे. वयाप्रमाणे येणाऱ्या भूमिका बदलत गेल्या इतकंच. आजही KBC चा भाग बघतांना मी टिपत असतो, माझं काय चुकलंय, काय सुधारणा करायला हवी. तरंच माझं सर्वोत्कृष्ट मी देऊ शकतो, जो प्रयत्न मी करतो"... ऐकून थक्क व्हायला झालं !

आपल्या भूमिकांपैकी त्यांनी दोन व्यक्तीरेखांचा आवर्जून उल्लेख केला, Black चित्रपटातील शिक्षक. एका दिव्यांग मुलीची गोष्ट पडद्यावर साकारताना तिचा शिक्षक तिला प्रेरित करतो. त्या शिक्षकानं तिच्यात जागा केलेला आत्मविश्वास तिचं आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतो. या चित्रपटाची गोष्ट सांगताना ते म्हणाले "शिक्षकाचं ते रूप साकारणं हा एक हृदयस्पर्शी अनुभव होता. दुसरा अनुभव पिंक चित्रपटातील वकील साकारतानाचा. JUST ONE WORD, TWO ALPHABATES.. ‘NO’.. BUT SO POWERFUL हे अनुभवणं आणि पोहचवणं अजिबात सोपं नव्हतं. मी खूपदा मोडून पडलो, व्यथित झालो.. शेवटच्या सीन मध्ये एक लेडी पोलीस ऑफिसर माझ्याशी हस्तांदोलन करते हा माझ्यासाठी सर्वात भावुक क्षण होता. असे अनेक अनुभव मला समृद्ध बनवत गेले"... 

आपल्या चाहत्यांकरता त्यांच्या हृदयात एक खास जागा आहे, 'My extended family' असं त्यांना संबोधताना कुली चित्रपटाच्या अपघातानंतर चाहत्यांचं मिळालेलं प्रेम हे त्यांच्याकरता अमूल्य आहे. दर रविवारी त्यांची एक झलक पाहायला त्यांच्या घरासमोर एकत्र जमणारा चाहतावर्ग हेच त्यांचं वैभव आहे. 

तुमच्या आयुष्यातील कोणता क्षण तुम्हाला परत जगावासा वाटेल असं विचारता 'हेच आयुष्य परत जगायला आवडेल' असं म्हणतांना भावुक झालेला तो चेहेरा आणि आवाज अजूनही स्मरणात आहे !

डॉक्टर भास्कर बॅनर्जी, इन्स्पेक्टर विजय खन्ना, शेखर, सुबीरकुमार, अमित, जय, राज मल्होत्रा, विकी कपूर, इकबाल , विजय दीनानाथ चौहान, प्रोफेसर सुकुमार सिन्हा,विजय वर्मा, सिकंदर , अँथोनी, बादशहा खान, देबराज सहाय, बुद्धदेव गुप्ता, ऑरो, शेहेनशाह ... अशा कितीतरी भूमिकेतून तो आपल्याला भेटत राहिला आणि आपण त्याच्यावर प्रेम करत राहिलो !

"नीला आसमाँ सो गया" असो  किंवा "मै और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं ".. त्याच्या आवाजात डोळे बंद करून कितीही वेळा ऐकलं तरी मन कधीच भरलं नाही. त्या आवाजात सामावलेली गेहेराई, आर्तता प्रत्येक वेळी नव्याने जाणवत राहिली.

"हादसा बनके कोई ख्वाब बिखर जाए तो क्या हो. वक्त जझबात को तब्दील नहीं कर सकता. दूर हो जाने से एहसास नही मरता, ये मोहोब्बत हें दिलोंका रिश्ता .. ऐसा रिश्ता जो सरहदों में कभी तक्सीम नहीं हो सकता.. तू किसी और की रातों का हसीं चाँद सही, मेरे हर रंग में शामिल तू है .. तुझसे रोशन है मेरे ख्वाब मेरी उम्मीदे.. तू किसी भी राह से गुजरे मेरी मंझिल तू हें ".... त्याच्या आवाजातील ही कविता कायम खुणावत राहिली !

छू कर मेरे मन को किया तुने क्या इशारा, रिमझिम गिरे सावन, दो लफ्जों की है दिल कि कहानी या है मोहोब्बत या है जवानी , दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे हि तड़पाओगे, कसमें वादे निभायेंगे हम, मित ना मिला रे मन का, तेरे मेरे मिलन कि ये रैना, मैं प्यासा तुम सावन, आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन, कभी कभी मेरे दिल में खयाल आता हें आणि मै और मेरी तनहाई सारखी रोमँटिक गाणी फक्त त्याच्यासाठीच लिहिली गेली..

गोविंदा बरोबर 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये तर कधी अभिषेक बरोबर 'कजरारे कजरारे' करताना त्याने आपल्याला सुद्धा ठेका धरायला लावला. डॉन २ पाहतांना त्याची सर याला नाही म्हणत प्रत्येक फ्रेम मध्ये तो अजूनच आठवत गेला. पिंक, पिकू , वजीर,  अशा प्रत्येक नवीन भूमिकेत एक वेगळी छाप पाडून गेला.

"ये तुम्हारे बाप का घर नहीं पोलीस स्टेशन हें, सिधी तरहा खडे रहो', म्हणणारा जंजीर मधील इन्स्पेक्टर विजय खन्ना , "जाओ पेहेले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे बाप को चोर कहां था", म्हणणारा विजय वर्मा , "मुछे हो तो नत्थुलाल जैसी वरना ना हो ", म्हणणारा विकी कपूर. " जिस तरह गोबी का फुल फुल होकार भी फुल नहीं होता वैसे गेंदे का फुल फुल होकर भी फुल नहीं होतां", म्हणणारा प्रोफेसर सुकुमार .. प्रत्येक भूमिकेत बहरत गेला.

"पीटर तुम लोग मुझे वहांँ ढुंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था".. दिवार मधला हा डायलॉग जितका लक्षांत राहिला तेवढाच तो म्हणतांना खुर्चीवर पाय पसरून बसलेला अन् तोंडात बिडी असलेला निळ्या शर्ट मधला विजय वर्मा सुद्धा .." मैं जानता हूँ के तू गैर हैं मगर यूंँ हि ", म्हणणारा कभी कभी मध्ये त्या पांढऱ्या कोट मधे जितका आवडला तेवढाच "तेरी रब ने बना दि जोडी तेरी रब ने ", म्हणतं भांगडा करतांना. कधी तो  हैदराबादी जाफ्रानी पुलाव करणारा बुद्धदेव म्हणून आवडला तर कधी "माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस" म्हणणारा  .. याराना मध्ये "तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना", म्हणतं त्याने आपल्याही डोळ्यांत पाणी आणलं. मुकद्दर का सिकंदर, सुहाग, सिलसिला, त्रिशूल , शराबी, दिवार , शोले याची किती पारायणं केली ते कधी मोजलच नाही. प्रत्येकाने भरभरून प्रेम केलं त्याच्यावर ..

आजही त्याचा उत्साह, स्वतःला कामात झोकून देण्याची वृत्ती, नवनवीन प्रयोग करण्याची तयारी, तो हसरा चेहेरा, कानांत साठवून ठेवावा असा आवाज ऐकून वाटतं त्याच्याकरता Age is just a number ! म्हणून तर अजूनही सहस्त्रचंद्रदर्शनाच्या वयाकडे तो झुकलाय असं अजिबात वाटत नाही!

'Walking into the 80th' म्हणत gracefully वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करणाऱ्या 
आपल्या सर्वांच्या लाडक्या सुपरस्टारला, अमितजींना अनेकानेक शुभेच्छा !

©कविता सहस्रबुद्धे

कुछ कहानियाँ कुछ कवितायें आपके अकेलेपन में साथ होती है 

उस वक्त़ जब आप भीड़ से परे अपने साथ होते है ...

किसीके दूर जाने से पता चलता है पास होने का सही अर्थ,

तब तब वो कविता कहानियाँ उस पुरे खालीपन को भर देती है…. 

मेरे लिए वो कविता, कहानी, वो नज़्म और गझ़ल कुछ खास है 

क्यो की उसमें छिपी मासुमियत किसी के होने का सबूत है...

लोग केहेते है गझल में दिल की बात छिपी होती है, 

मेरी छोटी सी ये नज़्म जिंदगी की खुबसुरती बयाँ करती है !!

-Kavita

 १९४२ A love story ... या चित्रपटातील सगळीच गाणी खूप गाजली. नुसती गाजलीच नाही तर पंचमदांना त्यांच्या संगीतासाठी व जावेद अख्तर यांना गीतलेखनासाठी फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळालं. एवढंच नाही तर कविता कृष्णमूर्ती यांना ' प्यार हुआ चुपके से' व कुमार सानू यांना 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', या गाण्याकरता बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. 

दुर्दैव हे की, या चित्रपतटातली सगळी गाणी गाजली मात्र हे बघायला आरडी आपल्यात नव्हते.  

विधु विनोद चोप्रा यांनी या सिनेमाची तयारी सुरू केली तेव्हा गीतलेखक जावेद अख्तर यांच्याकडे गाण्यांची जबाबदारी दिली. चित्रपटाची कथा जरी प्रेमकथा असली तरीही तिला स्वातंत्र्यसंग्रामाची पार्श्वभूमी होती. स्क्रिप्टमध्ये गाण्यांच्या जागाही तयार केल्या गेल्या. जावेद साहेबांनी पटकथा ऐकली तेंव्हा त्यांना त्यात एका रोमॅंटिक, हळूवार गाण्याची जागा दिसली. त्यांनी विधु विनोद चोप्रा यांना सांगितलंही की एक गाणं यात चपखल बसू शकेल पण त्यांनी ते काही मनावर घेतलं नाही. जितकी आहेत तितकी गाणी पुरेशी आहेत असं त्याचं म्हणणं होतं. 

गाण्याच्या मिटींगसाठी जावेद अख्तर आणि विधु विनोद चोप्रा आरडींकडे गेले असता जावेद अख्तरनी सहज बोलता बोलता आरडींच्या कानावर ही गोष्ट घातली. विधू विनोद म्हणाले की ऐकवा गाणं. आता गंमत अशी की, गाण्याच्या बाबतीत जावेद साहेब आग्रही असले तरीही गाणं तयार नव्हतंच. गाणं ऐकवा म्हटल्यावर जावेद साहेबांकडे लिखित बोल नव्हतेच.

त्यांनी सजच वर्णन केल्यासारखी एक ओळ समोर केली,'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'.. ही ओळ ऐकून आरडी लगेचंच उत्सुक झाले. यावर उत्तम गाणं बनू शकेल असं त्यांना वाटलं. विधु विनोद चोप्रा यांनाही आता वाटू लागलं की गाणं घालणं योग्य होईल. या गाण्यामुळे सिनेमाला एक छानशी गती, र्‍हिदम येतोय. त्यांनी जावेद साहेबांना म्हणलं द्या गाणं.

त्यांनी तिथल्या तिथे सुनावलं,”लेना हि नहीं था तो मैं गाना लिखू क्यू”? आरडी मधे पडत म्हणाले की, ठीक आहे. नसेल लिहिलं तर आता लिहा. जावेद अख्तर म्हणाले आधी तुम्ही धून बनवा मी त्यावर शब्द रचतो.यावर आरडींनी कुरघोडी करत सांगितलं की ठीक आहे पण अंतर्‍यामधे या सुंदर लडकीसाठी सगळ्या उपमा आल्या पाहिजेत. जावेद साहेब तयार झाले मात्र आधी धून यावर अडून राहिले.आरडी म्हणाले की अरे धून बनाओ क्या? समझो बन चुकी आणि हार्मोनियम पुढ्यात ओढून त्यांनी त्यावर सुरावटी छेडायला सुरवातही केली. हार मानतील ते जावेदसाहेब कसले? शिवाय त्या काळात जावेद अख्तर हे अक्षरश: अर्ध्या तासात गीत लिहिण्यासाठी ओळखले जात असत. बसल्या बैठकीत गाणी लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.

या गाण्याच्या अनुभवाबाबत नंतर एकेठिकाणी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, "आरडी यांच्या मेंदूत विचार नाही तर सतत संगीत वाजत असायचं. अक्षरश: अर्ध्या अर्ध्या मिनिटात ते एखादी भन्नाट धून बनवून टाकायचे. आपल्याला अंतरा सूचेपर्यंत त्यांचा मुखडा तयार असायचा. हे माहित असूनही मी त्यांना हे आव्हान का दिलं असेल? हा प्रश्न मला आजही पडलेला आहे".. तर बॉल पुन्हा जावेद अख्तर यांच्याकडे टोलवला गेला. साक्षात सरस्वती जिथे वास्तव्याला तिथे शब्दांची काय कमतरता? जावेदसाहेबांनी हे आव्हान स्विकारलं आणि तिथल्या तिथे धडाधड उपमा सुचवल्या.मात्र या उपमा शोधतानाही त्या सोज्वळ असल्या पाहिजेत असा जावेद अख्तर यांचा आग्रह होता. दारू, नशा असे शब्द त्यांना अजिबात नको होते. कशा बशा दोन अंतर्‍या इतक्या उपमा शोधत त्यांनी ते गाणं अर्धं मुर्धं पूर्ण केलं मात्र तिसर्‍या अंतर्‍यापर्यंत ते थकून गेले.त्यांनी या दोघांकडे थोडी सवलत मागितली. शुध्द, सात्विक, सोज्वळ गाण्याच्या मिटरमधे बसणार्‍या उपमा शोधण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले. मात्र यानंतर जे गाणं तयार झालं ते हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झालं.एक दोन नाही तर तब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. या गाण्यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला. अर्थात हा पुरस्कार या गाण्याचा वाजवी हक्कच होता हे शंभर टक्के !

Tuesday, September 6, 2022

 गाण्यामागची गोष्ट 

'मुघल-ए-आझम' कृष्णधवल चित्रपट असूनही डोळे दिपवणारा चित्रपट असं म्हटलं जातं कारण त्या काळी या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी दीड कोटी रुपये लागले व निर्मितीसाठी लागलेला वेळ होता चक्क सोळा वर्ष. दिग्दर्शक के असिफ यांची दूरदृष्टी, मेहेनत, चिकाटी व चित्रपटावरील त्यांचं वेडं प्रेम यामुळेच खरं तर त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं. 

आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे डोळे दिपून जावेत या स्वप्नासाठी के. असिफनी शीशमहलचा सेट उभारायचं ठरवलं. सर्वोत्तम कलाकृती घडवण्याचा ध्यास घेतलेल्या त्याच्या या स्वप्नासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमध्ये शेकडो कारागीर दोन वर्ष अहोरात्र राबले. कलादिग्दर्शक एम.के. सईद यांनी मुंबईतल्या नावाजलेल्या आर्किटेक्ट व इंटिरिअर डिझायनरची यासाठी मदत घेतली. इटालिअन टाईल्सचं फ्लोअरींग, इराणी गालीचे, संस्थानिकांकडून आणलेली झुंबरं हंड्या, काळानुरूप नक्षीदार खिडक्या व भिंतींच्या कमानी, संगमरवरी भासणार्‍या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती यांनी ती स्टुडिओ भरून गेला. काचेचं नक्षीकाम करणारे तज्ज्ञ आगा सिराझी यांना शीशमहल सजवण्याचं काम देण्यात आलं. विशिष्ट रंगाच्या काचा आणि आरसे बेल्जियमवरुन मागवण्यात आले. अशा तर्‍हेने जवळपास पंधरा लाख रुपये खर्च करून उभा  राहिला शीशमहलचा सेट..  ३५ फूट उंच, ८० फूट रुंद आणि १५० फूट लांब !

या सेटवर अनारकलीचं सप्तरंगांतलं नृत्य चित्रीत करायचं ठरलं होतं. कृष्णधवल छायाचित्रणातील कसबी सिनेमॅटोग्राफर आर.डी. माथूर यांनी काम सुरू केलं. ट्रायलसाठी जेव्हा मोठमोठे दिवे प्रकाशित केले गेले तेव्हा असंख्य आरशांमुळे परावर्तीत झालेल्या प्रकाशामुळे एक्सपोझ झालेली फिल्म जळून पांढरीफटक पडली. तमाम कसबी तंत्रज्ञांनी इतक्या प्रखर प्रकाशात कॅमेर्‍याच्या लेन्सेस काम करूच शकणार नाहीत, असं छातीठोकपणे सांगितलं. 

तेव्हा प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले शापूरजी ( त्या काळातील एक मोठे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व या चित्रपटाचे फायनान्सर )तडक त्याकाळच्या ज्येष्ठ दिग्दर्शक सोहराब मोदींकडे गेले. मोदींनी प्रत्यक्ष सेट पाहिल्यावर प्रेक्षकांचे डोळे दिपवण्याच्या नादात असीफ स्वत:सकट सगळ्यांसाठी खड्डा खणतो आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. यामुळे शापूरजींनी झालं तेवढं बास झालं आता इथून पुढे सोहराब मोदी दिग्दर्शनाचं काम पाहतील,असं के आसिफला सुनावले. त्यावर त्यांचा बांध तुटला आणि ते म्हणाले, ‘तुमचे पैसेच खर्च झालेत, पण माझ्यासकट शेकडो लोकांनी या चित्रपटासाठी रक्ताचं पाणी केलंय. या सेटवर अकबर, जोधाबाई, सलीमसमोर अनारकली नाचणार आहे. माझ्या स्वप्नपूर्तीच्या या परमोच्चक्षणी मी कुणाचीही लुडबुड खपवून घेणार नाही..’ असीफचा हा आवेश पाहता शापूरजींनी थोडं नमतं घेतलं. पण या दृश्यानंतरच काम मोदी पाहतील असे त्यांनी स्पष्ट केले. इतका वेळ हे सगळं ऐकत उभी असलेली मधुबाला आपल्या शांत पण दृढनिश्चयी स्वरात म्हणाली की, 'माझा करार असिफसोबत झाला आहे. त्यामुळे असिफने दिग्दर्शन केलं नाही तर मी या चित्रपटातच काम करणार नाही'. पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या चित्रपटातून मधुबाला बाहेर पडली तर आपण कुठे जाऊन पोहचू हे ओळखता येण्याइतपत चाणाक्ष व व्यावसायिक असलेले शापूरजी पालनजी हे सोहराब मोदींसोबत एकही शब्द न बोलता सेटवरून निघून गेले. पाणावलेल्या डोळ्यांनी मधुबालाकडं पाहात के असीफने जणू तो हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नसल्याचं तिला सांगितल असावं. 

शीशमहलच्या शेकडो आरशांवरून प्रकाश किरण परावर्तीत होऊन फिल्म कोरीच राहू लागली. शेवटी आर.डी. माथूरनं डायरेक्ट लाईट ऐवजी सर्व दिव्यांवर उलटे रिफ्लेक्टर्स बसवले व इनडायरेक्ट लाईटमध्ये शूटिंग करून पाहिलं. ज्यामुळे आरशांत हजारो प्रतिमा स्पष्ट दिसल्या आणि ही कल्पना यशस्वी झाली . आजकाल जे स्टिल व लाईव्ह फोटोग्राफीचं तंत्र वापरतात, त्याचा उगम इथूनच झाला.

'प्यार किया तो डरना क्या', अशा भव्य गाण्याचं स्वप्न बघणारा दिग्दर्शक के. असीफ, या एका गाण्यासाठी त्याने बनवलेला शीशमहल, दिग्दर्शकासाठी चित्रपट सोडण्याची तयारी दाखवणारी मधुबाला, आलेल्या अडचणींवर मात करत, अत्यंत कल्पकतेने शीशमहालातील शूटिंग शक्य करून दाखवलेला आर.डी. माथूरसारखा कॅमेरामन आणि या सगळ्याच दडपण मनावर असणारे या चित्रपटाचे गीतकार शकील बदायुनी .. त्यांनी आपली सारी प्रतिभा पणाला लावून या शीशमहलमधील गाण्यासाठी पंचवीस मुखडे तयार केले. पण नौशादजींच्या पसंतीस ते उतरेनात. बरंच विचारमंथन झालं, चर्चा झाली. मध्यरात्रीच्या सुमारास नौशाद जींना ओळी सुचल्या. गीत सुरु होण्यापूर्वीची दोन ओळीतील आर्त तत्वज्ञान ज्या धाडसाने दरबारांत अनारकली अकबर बादशहाला ऐकवते, त्याच तोलामोलाचे बोल शकीलजींनी  लिहिले, नौशादजींनी संगीताचं कोंदण चढवलं आणि लताजींनी ते अमर केलं (या गाण्यातील आवाज घुमण्यामागे echo रेकॉर्डिंग तेव्हा प्रगत नसल्याने स्टुडिओ च्या बाथरूम मध्ये रेकॉर्ड केलं गेलं होतं) ‘इन्सान किसीसे दुनियामें इकबार मुहोब्बत करता है इस दर्दको लेकर जीता है , इस दर्द को लेकर मरता है…जब प्यार किया तो डरना क्या' ...  

 

 गाण्यामागची गोष्ट 

नवकेतन बॅनरच्या 'काला बाजार' या चित्रपटासाठी देव आनंद , विजय आनंद, वहिदाजी, एस डी बर्मन, शैलेंद्र अशी तगडी टीम एकत्र आली होती. याच सुमारास शैलेंद्रजी इतर काही प्रोजेक्ट वरती सुद्धा काम करत असल्याने गाणं लिहायचे काम वेळेत पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे साहजिकच निर्माता देव आनंद व विजय आनंद एस. डी. बर्मन यांच्या मागे गाण्याच्या चाली करता तर शैलेंद्र यांच्याकडे गाण्याचे बोल लवकर हवेत म्हणून घाई करायचे. एके दिवशी या सततच्या घाईला कंटाळून, त्रस्त होऊन एस डी बर्मन साहेबांनी पंचमना दिवसभर शैलेंद्रजीं सोबत राहायला सांगितलं.  शिवाय जोवर शैलेंद्र जी गाणं लिहून देत नाहीत तोवर घरी येऊ नकोस असं सुद्धा सांगितलं. 

मग काय संध्याकाळ होताच दोघे शैलेंद्रजींच्या घरी गेले. थोडया वेळाने कारमधून फिरायला गेले. वाटेत शैलेंद्र यांना शंकर जयकिशन साहेबांकडे काम होतं ते सुद्धा केलं, मग दोघे नॅशनल पार्क मध्ये गेले तरी शैलेंद्रजींना काहीही सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी जुहू बीच वर जायचं ठरवलं. रात्र झाली, अकरा वाजले. त्या वेळी पंचम आपल्या वडिलांसोबत काम करत होते, वय वर्ष वीस. ते शांत पणे बसले होते कारण वडिलांचं ऐकणं भाग होतं.जुहू बीचवरची दूरवर पसरलेली ती शांतता,समुद्राचा तो आवाज,आकाशातील चांदणं ... 
सिगारेट पेटवून शैलेंद्रजींनी ती काडेपेटी पंचमना दिली आणि गाण्याची ट्यून वाजवायला सांगितली. पंचमदांनी त्या काडेपेटी वर ठेका धरत धून ऐकवली. सिगारेटचा हवेत विरणारा धूर व आकाशातील चंद्र पाहून शैलेंद्रजींना शब्द सुचले व लगेचच सिगारेटच्या पाकिटावर त्यांनी ओळी लिहिल्या ... 'खोया खोया चाँद खुला आसमान , आँखों में सारी रात जाएगी'..  

 गाण्यामागची गोष्ट 


आजही प्रेमात पाडणारा चित्रपट म्हणजे गाईड. व्यावसायिक असूनही कलात्मक ढंगाचा.. त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे तब्बल सात फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगीतकार एस.डी. बर्मन यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी साधं नामांकन सुद्धा मिळालं नव्हतं ज्याचं दुःख दिग्दर्शक विजय आनंद यांना कायमच राहिलं. खरं तर कोणत्याही पुरस्काराच्या पलीकडचं संगीत होतं ते, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ! 2012 मध्ये, टाइम मासिकाने 'सर्वोत्कृष्ट बॉलिवूड क्लासिक्स' च्या यादीत नंबर चार वर या चित्रपटाला स्थान दिलं होते. 

त्या काळी मेहबूब खान, बिमल रॉय, राजकपूर सारख्या काही दिग्दर्शकांनी गाण्यांना ग्लॅमर दिलं परंतु गाण्याच्या चित्रीकरणाला एका वेगळ्या उंचीवर खऱ्या अर्थानं नेलं ते 'गोल्डी' म्हणजेच दिग्दर्शक 'विजय आनंद' यांनी. त्यांच्या ज्वेलथीफ, तेरे घर के सामने, तिसरी मंझिल आणि गाईड चित्रपटांतील प्रत्येक गाणं म्हणजे absolutely एक व्हिजुअल ट्रीट आहे ! 

गाईड चित्रपटाचं संगीताचं काम सुरु होण्यापूर्वीच सचिनदांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व पुढचे काही दिवस ते हॉस्पिटल मधेच होते. तेव्हा देवसाहेब आणि गोल्डी यांनी 'कितीही थांबावं लागलं तरी आम्ही थांबू पण गाईड चे संगीतकार तुम्हीच असाल', असं सचिनदांना सांगितलं. गाईड च्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा आणि शैलेंद्र यांच्या गीतलेखनाचा खूप मोठा वाटा आहे. 

चित्रपटांतील प्रत्येक प्रसंगात एक भाव असतो. कथा, त्यातील प्रसंग, कलाकारांचे संवाद तसंच त्यांच्या अभिनयातून पुढे साकारणाऱ्या गोष्टीमधून हा भाव अजूनच गहिरा होत जातो. जेव्हा हाच भाव संवाद पेलू शकत नाहीत तेव्हा तो भाव गाण्यांतून साकारतो. गाण्यांतून गोष्ट पुढे नेण्याचं कसब गोल्डी कडे होतं. त्यांनी साकारलेली बरीच गाणी 'Director's Song' म्हणून ओळखली जातात. नायक नायिकेचा संवाद सुरु असतांनाच शॉट कट न होता त्या शॉटचं एक्सटेंशन वाटावं असं गाणं सुरु होण्याचं एक झळाळतं उदाहरण म्हणजे,' तेरे मेरे सपने अब एक रंग है'..

उदयपूर जवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सरोवराजवळ हे गाणं चित्रित केलं गेलं. सूर्यास्ताच्या वेळी असलेला प्रकाश केवळ दहा ते पंधरा मिनिटं टिकत असल्याने तेवढ्याच वेळेत  हे गाणं हवं तसं चित्रित करणं हि एक परीक्षा होती. शेवटी गोल्डी व या चित्रपटाचे कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी हवा तो परिणाम साधता यावा म्हणून एका झाडाच्या आडून ते चित्रीत केलं, फक्त चार शॉट्स मध्ये !  

या गाण्याचं लोकेशन, सूर्यास्ताची वेळ, मागील तळ्यातील संध्याकाळचा हलका प्रकाश, आकाशातील रंग, कातरवेळचा मंद अंधार, लयदार फिरणारा कॅमेरा, शैलेंद्र यांचे शब्द, सचिनदांचं संगीत आणि पडद्यावर देवसाहेब आणि वहिदाजी .. सारंच जादुई !!

©कविता सहस्रबुद्धे

 

 गाण्यामागची गोष्ट 

१९७८ साली रेखा आणि विनोद मेहरा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘घर’ हा चित्रपट एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा होता.रेखाच्या अभिनयासोबतच हा चित्रपट लक्षात राहिला तो या चित्रपटांतील गाण्यांमुळे. ‘आजकल पॉंव जमीं पर नही पडते मेरे ’, ‘आपकी ऑंखों में कुछ मेहेके हुए से ख्वाब है’ ‘तेरे बिना जिया जाए ना’ आणि ‘फिर वही रात है’ .. अतिशय गोड शब्द आणि कमालीच्या हळव्या चाली. त्या दोघांमधलं नातं जिवंत करणारे शब्द, त्या दोघांचं जग, ती ओढ, त्यांचं सहजीवन सारंच बखूबी चितारलं आहे या गाण्यांत. प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी वेगळी, त्यातील माहोल वेगळा, त्यातील सौन्दर्य, आवेग वेगळा आणि त्याचा मनाला होणारा स्पर्श सुद्धा वेगळा.गुलजार साहेबांकरता काम करणारे पंचम खरंच वेगळे होते हे ठळकपणे अधोरेखित करणारी हि गाणी गुंतवून ठेवतात आपल्याला ! 

'आपकी आँखों में कुछ मेहेके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है’.. हे अतिशय रोमँटिक गीत. यातील एक ओळ आहे 'आप कि बदमाशियों के, ये नये अंदाज़ है '.. जेव्हा पंचमदांनी हि ओळ पहिल्यांदा ऐकली तेव्हा 'बदमाशीया' हा शब्द त्यांना खटकला आणि दीदी या शब्दाला हरकत घेतील अशी शंका वाटली. ते गुलजार साहेबांना म्हणाले, 'हा शब्द असभ्य वाटतोय , दीदींना संकोच वाटेल तो शब्द उच्चारताना'.. तेव्हा गुलजारजींनी खात्री दिली 'तू काळजी करू नकोस, तसं काही झालं तर मी सांभाळून घेईन आणि प्रसंगी मी तो शब्द बदलीन सुद्धा'.. 

गाण्याची तालीम झाली. गाणं रेकॉर्ड झालं. तेव्हा गुलज़ारजींनी लता बाईंना विचारलं 'गाणं कसं वाटलं' ? त्यावर त्यांनी मनापासून गाणं आवडलं असं सांगितलं. हे ऐकून गुलजारजींनी बदमाशिया शब्दाविषयी पंचमदांना वाटलेल्या भीतीबद्दल सांगितलं. तेव्हा मनापासून हसत त्या म्हणाल्या, 'एवढी वर्ष मी गात आहे पण हा नवा शब्द आता पर्यंत मला कधी गायला मिळाला नव्हता' .. 'आपकी बदमाशियों के ये नये अंदाज़ हैं' , म्हणतांना लताबाईंचं ते खट्याळ हसणं, ते टायमिंग इतकं जबरदस्त आहे कि ते शब्दांत सांगताच येणार नाही, ते अनुभवायलाच हवं. 

  गाण्यामागची गोष्ट 


पंचमदा असं म्हणायचे कि 'गाणी काही आपोआप घडत नाहीत. त्यासाठी खूप झटावं लागतं. एखादं लहान मूल कसं आपण वाढवतो तशी त्या गाण्याची निगा राखावी लागते. मूळ चाल तयार झाली कि ती शंभरदा गुणगुणली, हळूहळू मग त्या गाण्यात प्राण फुंकले कि मग ते गाणं उभं राहतं, चालू लागतं मग धावतं' ! म्हणून तर कित्येक गीतांना पुरेसा वेळ देऊन, संवेदनशीलता आणि मात्यापित्याचं प्रेमळ वात्सल्य मनांत भरून त्यांनी गीते हाताळली. गुलज़ार जी म्हणतात 'लहान मुलं बागडावीत तशी माझी गीतं पंचमकडे बागडली'. या दोघांनी एकेका गाण्यावर प्रचंड मेहनत घेतली, निर्मितीचा प्रत्येक क्षण अनुभवला त्यामुळे कायम त्यातून निर्माण झालेली सर्वोत्तम कलाकृतीच आपल्यापुढे आली !

खुशबू चित्रपटातील एक गीत आहे, 'दो नैनो में आसू भरे है निंदिया कैसे समाये '.. लताजींच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड झालं तेव्हा खूप जास्त वाद्यमेळ वापरला गेला. गाणं तर छान झालं होतं पण ते अंगाईगीत वाटेना. त्यामुळे गुलज़ार जी थोडे अस्वस्थ होते. या गाण्यातील वाद्यांचा इतका जास्त उपयोग व उच्च स्वरातील ध्वनी पातळी बरोबर नाही हि शंका त्यांनी पंचमदांना बोलून दाखवली. ते गाणं परत रेकॉर्ड करू यांत का, हेही सुचवलं पण हे सर्व ऐकून घेऊन पंचमदांनी त्यावर कृती मात्र काहीच केली नाही. त्यामुळे गुलज़ार साहेब अजूनच अस्वस्थ झाले. 

त्याच सुमारास दुसऱ्या एका चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लताजी आणि गुलज़ार साहेब भेटले. गुलज़ारजींनी आपल्या मनातील शंका दीदींना बोलावून दाखवली व परत एकदा गाणं रेकॉर्ड करूया अशी विनंती केली. दीदी ताबडतोब तयार झाल्या. मग काय एक व्हायब्रोफोन पार्श्व संगीतासाठी घेऊन 'दो नैनो में आसू भरे है निंदिया कैसे समाये ' हे गाणं परत रेकॉर्ड केलं गेलं. जसं हवं होतं अगदी तसं गाणं finally गुलज़ारजींना मिळालं व तेच गाणं चित्रपटांत घेतलं गेलं. आधी रेकॉर्ड केलेलं गाणं सिडीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. दोन्ही गाणी ऐकल्यावर आपल्यालाही चित्रपटातीलच गाणं जास्त भावतं !

©कविता सहस्रबुद्धे

Monday, September 5, 2022

 

G-pay वरच्या गप्पा 


'आई अग थोडी गडबड झाली, या महिन्यात पैसे जरा जास्त खर्च झाले'.. फोनवरचं पहिलं वाक्य ! मी आपलं ' no problem बेटा, it's ok' म्हणेपर्यंत पैसे जास्त का खर्च झाले याचा हिशोब समोरून चालत आला. 'अग काय झालं सांगू का ग्रोसरी जरा जास्त आणली या वेळी (अंडी, बटर, चीज, sauce, कॉफी, फळं, फार फार तर भांड्याचा liquid soap ही ग्रोसरी ) आणि ICICI बँकेनी 800 Rs कापले yearly charges माझ्या Demat account चे मग गडबड झाली सगळी'.. 'अरे ठीक आहे, होतात कधीतरी पैसे खर्च' असं मी म्हणेपर्यंत,' पण तू आत्ता पैसे नको ट्रान्सफर करुस पण एक तारखेला म्हणजे एक तारखेला नक्की कर, चल बाय मी जातोय कॉलेजला, जेवण झालंय माझं'.. असं म्हणत त्याने फोन ठेवला सुद्धा !

चार दिवसांपूर्वी ऑफिसच्या लंच टाइम मधला हा आमचा संवाद ... वाटतं घरापासून लांब राहून मुलं शिकतात हळूहळू! पण पुढच्याच क्षणी आईचं मन काही ऐकत नाही आणि लगेच Gpay वरून थोडे पैसे transfer होतात आणि ऑफिसचं पुढचं काम सुरू होतं !

संध्याकाळी घरी गेल्यावर notification दिसलं.. 'धन्यवाद अम्मीजान' ते वाचेपर्यंत दुसरं notification ' मुझे लगा ही था आप ऐसें ही कुछ करेंगी'.. ' क्यू आप ने मेरी बात नही सूनी ' .. हे वाचून मी फोनच लावला. 'काय रे , अम्मीजान वगैरे'.. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच 'आई, कशाला पैसे ट्रान्सफर केले ? मी सांगितलं होतं ना नको करूस'.. मी म्हटलं 'अरे ठीक आहे, असू दे'.. तरी पुन्हा तेच. मला समजेना असं का म्हणतोय की पैसे का ट्रान्सफर केले; तर वाईट याचं वाटत होतं कि आता 1 तारखेला मी कमी पैसे ट्रान्सफर करणार.. असं दोन तुकड्यातला पॉकेट मनी पचनी पडत नव्हता हे लक्षात आलं...  ओह्ह असं आहे तर. मग म्हटलं चला विषयच बदलू.  

मी म्हटलं 'अरे मगाचचे मेसेज तर Gpay वर आले होते. तू तिथे का मेसेज पाठवतोय' ?..  'का ? काय झालं, चालतं तिथे मेसेज पाठवला तरी'.. 'अरे, बँकेतले लोकं वाचतील ना आपले मेसेज '.. 'अग आई ते कसे वाचतील' ? .. 'कसे म्हणजे, इथे जे काही लिहितो ते समजतं त्यांना'.... 'आई sssss , असं नसतं ग sss , त्यांना नाही समजत. त्यांना काय तेवढाच वेळ आहे का आपले मेसेज वाचत बसायला ?आणि ते का वाचतील आपले मेसेज' ... 'नशीब तिथे नाही लिहिलंस आई पैसे संपले'.... 'आई, असं असतं ना तर मग आपले मेसेज वाचणाऱ्या बँकेतल्या बाईनेच ट्रान्सफर केले असते तुझा अकाउंट मधून माझ्या अकाउंट मध्ये पैसे. तसं नाही ना झालं म्हणजे नाही वाचत ते आपले मेसेज'... 'तरी मला वाटतंय रे ते वाचतात आपले मेसेज'... 

त्याला वाटत असेल, 'अशी कशी आहे आई आपली ? काय काय imagine करत बसते'.... पण बरं आहे, असा समज असणं चांगलंच आहे. कधी कधी थोडं बुद्धू असल्याचं नाटक केलं ना तर भलती मजा येते हे मात्र नक्की. 

©कविता सहस्रबुद्धे

 

ऑफिस to घर via चांदणी चौक 

आज स्वतः पुलंनी जरी येऊन विचारलं कि तुम्हाला कोण व्हायचं आहे; मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर तर 'आम्हाला पुणेकरच व्हायचं आहे' असंच म्हणतील पुणेकर. अहो याच नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा पुण्याला सोडायचं नाहीए आम्हाला.. आता पुणेकर म्हटलं कि 'जाज्वल्य अभिमान असणं' रक्तांत आलंच. मग काय दिल्लीच्या 'चांँदनी चौक'(उच्चारात फरक आहे ) एवढं ग्लॅमर आणि इतिहास नसला म्हणून काय झालं इथला 'चांदणी चौक' सुद्धा आमच्यासाठी तेवढाच महत्वाचा. पुण्याच्या पश्चिमेकडील कोथरूड या उपनगराने पूर्वी सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर म्हणून ख्याती काय मिळवली त्याच वेगाने अजूनही त्याचा विस्तार सुरूच आहे. याच उपनगराच्या सीमेवर असणारा हा 'चांदणी चौक' सध्या फारच चर्चेत आहे. मग तो तिथल्या वाहतुकीच्या गोंधळामुळे असो किंवा WA वर फिरणाऱ्या या चांदणी चौकावरील विनोदामुळे, जसं आजवर चांगलं काम केल्यामुळे प्रसन्न झालेला बाप्पा कोथरूड / वारजे मध्ये घर देतो आणि दुसरीकडे चुकीच्या कामांची शिक्षा म्हणून हिंजवडीत नोकरी देतो जेणेकरून या चांदणी चौकातूनच रोज ये जा करायला लागावी. खरं तर आत्ता आत्ता पर्यंत चांदणी चौकातून ये जा करणं म्हणजे शिक्षा असं कधी वाटलंच नाही. उलट एकीकडे डोंगराच्या पायथ्याशी दिसणारं वेदभवन गणपती मंदिर, बाजूचा NDA कडे जाणारा शांत निसर्गरम्य हिरवा रस्ता, मुळशीकडे जातांना बंगलोर आणि मुंबईला जोडणाऱ्या महामार्गाचं होणारं दर्शन तर उजवीकडे दिसणारा शहराचा विस्तीर्ण परिसर. जवळच्या गार्डन कोर्ट हॉटेल मधून रात्रीच्या वेळी चमचमणारं आपलं शहर बघितलं आहे, कित्येक वेळा.. याच चांदणी चौकातून !

पण सध्या मात्र इथली परिस्थिती एकदम बिकट आहे. त्याचं ट्रेलर जssरा आधीच सुरु होतं, अलीकडच्या पाषाण सुस रोडच्या नव्यानं बांधण्यात येत असणाऱ्या पुलाच्या जवळ. नव्यानं बांधला जाणारा हा पूल आणि पुढे चांदणी चौकातला पडण्याच्या प्रतिक्षेत असणारा पूल व या दोन पुलांमध्ये ऑफिस मधून घरी येतांना रोज न चुकता अडकणारे आमच्या सारखे असंख्य प्रवासी असं चित्र आजकाल न चुकता रोजच रंगतं.. बरं त्यावर उपाय काय ? ते पण समजत नाही. 

तरी मी प्रयत्न केला माझ्या परीनं. वारजे बावधन क्षेत्रीय कार्यालय, PMC ऑफीस, कमिशनर ऑफिस, वाहतुक नियंत्रण शाखा सर्वकडे फोन झाला, विनंती झाली, वर्तमानपत्रातुन बोलून झालं, पण काही उपयोग झाला नाही. पालकमंत्र्यांना भेटेपर्यंत अहो त्यांची वर्णी थेट मंत्रिमंडळात लागली. इकडे प्रश्न तर दिवसेंदिवस गंभीर बनत होता आणि तो नक्की कोण सोडवणार हे कोडं काही सुटत नव्हतं. या ट्रॅफिक मुळे रोजच उशीर होत होता. ऑफिस मधून निघाल्यावर घरी पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो पण  एके दिवशी तर या अर्ध्या तासाच्या अंतराला चक्क तीन तास लागले; 18 किलोमीटर साठी चक्क तीन तास.. मग ठरवलं शेवटचा उपाय म्हणून २४ तास कार्यरत असणाऱ्या BJP ऑफिस मध्ये जाऊन माजी महापौरांना निवेदन द्यायचं. मग काय 'माझ्याबरोबर चल जरा' म्हणून नवऱ्याच्या मागे दोन तीन दिवस भुणभुण केली. पण गावाच्या सीमेवर ट्रॅफिकशी रोज लढणाऱ्या आमच्या सारख्यांची हालत 'तुम क्या जानो रमेस बाबू' असं झालं. आज उद्या करता करता जाणं बारगळत राहिलं.  

जणू त्या परमेश्वरालाच सगळी काळजी म्हणून तर काय कमाल योग जुळून आला... त्या रात्री दस्तुरखुद्द मुख्यमंत्रांचा ताफा पुण्याच्या दिशेने येतो काय, त्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकतो काय आणि नंतर सगळी सूत्र फटाफट हलतात काय सगळं स्वप्नवत... दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्याने पेपर पाहिला आणि हुश्श केलं. त्याला माझ्याबरोबर कोठेही जावं लागणार नसल्याचा झालेला आनंद तसूभर जास्त होता. त्या दिवशी ऑफिसच्या बस मध्ये एकदम उत्साही वातावरण होतं, 'चला, finally आपला प्रश्न मिटणार आहे', या आनंदात सगळे हुरळून गेले होते. पूल पाडणार त्या दिवशी ऑफिसला सुट्टी मिळणार का ?  पूल पाडला तर रस्ता मोठा कसा होणार ? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यातून तोंडावर येत होते. रात्री काही सेकंदात पूल पाडणार त्यामुळे बहुतेक सुट्टी  काही मिळणार नाही असा निष्कर्ष पण काढला गेला... बरं, पूल पाडून लेन कशा वाढणार ? यावर बस चांदणी चौकात आल्यावर खिडकीतून बाहेर डोकावत काही जणांनी पाहणी केली. म्हणजे पुलाच्या खालचा रस्ता मोठा केला तर आपोआप पूलच पडेल म्हणून आधी पूल पाडून मग रस्ता मोठा करणार वगैरे वगैरे चर्चा रंगू लागल्या. 

चांदणी चौकातील त्या 'पुलाखालून' ऑफिसकरता रोज दोन वेळा जाण येणं होतं पण आज आवर्जून चांदणी चौकातील त्या 'पुलावरून' चक्कर मारून आलो तेही भल्या पहाटे, अहो म्हणजे गर्दी नसते तेव्हा म्हणून. काही वर्षांआधी इथून दिसणारं चित्र आज पुरतं बदललं आहे हे तर नक्की आणि त्या बदललेल्या चित्रांत खूप काही हरवलंय.. सध्या तरी इथला मोकळा रस्ता, आणि हरवलेली शांतता प्रत्येकालाच जाणवते आहे. येत्या काही दिवसांत पूल पाडल्यावर बदललेलं सुखद चित्र आता प्रत्येकालाच खुणावतं आहे सोबत कालच गडकरी साहेबांनी दाखवलेली स्वप्नही आहेत त्यामुळे 'चांदणी चौका' सोबत आपल्यालाही मोकळा श्वास घेता येणार कि नाही याचं उत्तर लवकरच मिळणार आहे !

©कविता सहस्रबुद्धे

Friday, August 19, 2022

 जिंदगी गुलजा़र है !


छोटा सा प्लॅनेट समझा था ,पैदा हुआ है 
मेरे सोलर सिस्टम में !
मेरा नवासा - मेरा समय !
दो ही साल का है 
और यूंँ महसूस होता है 
सूरज वो है और हम सब -
उसके गिर्द घुमा करते है 
मोह में कैसी ग्रॅविटी जैसी 
ताक़त होती है !

गुलजार साहेबांनी आपला नातू 'समय' वरती लिहिलेल्या या ओळी वाचल्यावर वाटतं काय कमाल लिहिलं आहे ! एकीकडे 'मेघना' या कवितेत आपली मुलगी प्रसववेदना सहन करत असतांना एक पिता म्हणून व्यक्त केलेली हळवी मनःस्थिती तर दुसरीकडे आपल्या छोट्या नातवावर इतकी गोड कविता लिहिणारे इतके प्रेमळ 'नानू' !  Green Poems या त्यांच्या पुस्तकांतील कवितांमधून निसर्गातील सुंदरता, निसर्गाचे माणसाशी असलेले उत्कट नाते वाचायला मिळते. तर 'धूप आने दो', पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या मीनाकुमारी, साहिर आणि जादू, मेरे अपने सिप्पी साहेब, सगे सारे, मी आणि अब्बू या लेखांतून गुलज़ार साहेबांचं एक वेगळं रूप नजाकतीने उलगडत जातं. 

कोवळ्या वयांत अनुभवलेली फाळणी कित्येक वर्षे त्यांनी आपल्या स्वप्नांमध्ये अनुभवली आहे. अनेक माणसांचे चेहेरे स्वप्नांत दिसायचे त्यांना, एकमेकात मिसळलेले , धूसर असे चेहेरे. कधी हात पाय कापलेले, स्वतःचे ते लुळेपांगळे रूप, चादर लपेटून डोक्यावर पगडी बांधलेला, समोरची नाली ओलांडून येणारा धीर देणारा 'तो' माणूस, ज्याला पाहून त्यांना वडीलांचे आश्वासक स्पर्श आठवायचे. ती घुसमट, ती भीती स्वप्नात पुन्हा पुन्हा ते अनुभवायचे. त्या असहायतेतून बाहेर पडण्यासाठी मग ते लिहू लागले. मनाला झालेल्या त्या जखमा, ते दुःख पुढे कितीतरी कवितांमधून, गाण्यांमधून डोकावत राहिलं. पण स्वप्नांवर असलेला त्यांचा विश्वास कमी न होता अजूनच दृढ होत गेला. स्वप्नं दिलासा देतात, हृदयावरचं ओझं हलकं करतात व स्वप्नांना अर्थ असतो हा त्यांचा विश्वास त्यांनी लिहिलेल्या अनेक गीतांमधून आपण अनुभवला आहे. स्वप्न एकाच वेळी वास्तव असतं आणि त्याच वेळी त्याच्यात फॅंटसीची कल्पना, रम्यता देखील असते. 'एक ही ख्वाब कई बार देखा है मैने' .. 'एक बात कहूँ, गर मानो तुम सपनो में न आना, जानो तुम' .. 'फिर वही रात है , रात है ख्वाब की' ...

स्वप्न हे कवितेसारखं नाजूक असतं, जसं हे स्वप्न..
'देखो आहिस्ता चलो
और भी आहिस्ता जरा,
सोच समझकर जरा पांँव रखना, 
मैने तनहाई में कुछ ख्वाब सजा रखें है'…..

त्यांच्या गीतांमधून रात्र, चंद्र या प्रतिमा कायम डोकावत राहतात. 'जाने क्या सोचकर नहीं गुजरा, एक पल रात भर नहीं गुजरा'.. 'रात चुपचाप दबे पाँव चली जाती है, रात खामोश है, रोती नहीं, हँसती भी नहीं'.. योगायोगाने त्यांच्या गीत लेखनाची सुरवात पण एका अशाच गाण्याने झाली ज्यात गाण्याची situation रात्रच होती.. बंदिनी चित्रपटातील 'मेरा गोरा रंग लई ले, मोहे शाम रंग दै दे'.. रात्रीशी त्यांचं असलेलं नातं इतकं गहिरं आहे की ते म्हणतात, 'अनेक रात्रीतून उलगडत जाणारी एक रात्र माझ्या मनांत घर करून आहे'...

सुरवातीला मुंबईत एका रंगाच्या दुकानांत ते सेल्समनची नोकरी करत पण त्यात ना समाधान मिळत होतं ना पुस्तक वाचायला, कवितेत रमून जायला वेळ. मग काय ती नोकरी सोडून ते विचारे गॅरेज मध्ये नोकरीस लागले. पगार कमी होता पण त्यात आनंद होता, लिहायला वाचायला भरपूर वेळ मिळायचा. शिवाय सिनेक्षेत्रातील अनेक मंडळी त्या गॅरेज मध्ये यायची ज्यामुळे बासू दा, देबूसेन, शैलेंद्र, बिमल रॉय यांच्याशी ओळख झाली. आयुष्याला नवी दिशा मिळाली ती तिथेच !

पुढे पंचम सोबत जुळलेली त्यांची केमीस्ट्री इतकी जबरदस्त होती की या जोडीने अनेक कमाल गाणी अजरामर केली. गुलज़ारजींच्या मनांत आजही पंचमच्या आठवणी तितक्याच ठळकपणे सोबत आहेत.म्हणून तर ते म्हणतात, 'शिशिर ऋतूतली संध्याकाळ एक गूढ, पवित्र असा सुगंध घेऊन येते. त्या सुगंधासारख्या पंचमच्या आठवणी माझ्या सभोवताली कायम रेंगाळत राहतात'.. गुलज़ार साहेब सांगतात, 'एक संगीतकार जेव्हा म्हणतो की त्याच्या चालीला न्याय देण्यासाठी गायकाचा चेहेरा आठवण्याऐवजी त्याला गीतकाराचाच चेहेरा आठवतो तर त्यापेक्षा त्या गीतकाराला आणखी मोठा सन्मान कोणता मिळणार'? म्हणून तर पंचम कडून मिळालेला हा सन्मान त्यांना  जीवनातला एक सर्वोच्य सन्मान आहे, असं वाटतं!

लहानपणी आई गेली, तिचा चेहराही आठवत नाही, जवळ तिचा साधा फोटोसुद्धा नाही. तरीही 'दो नैना और एक कहानी , थोडा सा बादल थोडा सा पानी' आणि 'सुरमई अखियों में नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे' सारखं गीत ते लिहितात. या भावना मांडताना इतक्या बखुबी भाषा वळवण्याचं त्यांचं कसब थक्क करणारं आहे.

संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार साहेबांच्या गाण्याचं खास वैशिष्ट्य ! आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची खुबी ! आपल्या कल्पनांना शब्दरूप देऊन त्यांनी अजूनच मोहक बनवलं.  'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्शून जातो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले', सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे कि जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', यातील मनाची अवस्था टिपायला फक्त आणि फक्त गुलजारचं हवेत.

आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली, वाटतात. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या गाण्यांमध्ये पाहतो. कधी त्यांच्या गाण्यांनी आपल्याला प्रेमात पाडलं तर कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता, कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो,जगणं शिकलो.. म्हणून तर 'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं ते समजलंच नाही!

Happy Birthday Gulzar ji !

© कविता सहस्रबुद्धे
18/08/22

Monday, July 4, 2022

 

एक पाऊस पुरतो,
आठवणीत हरवण्यासाठी
खरं तर, 
पावसाचा आवाजही पुरेसा असतो
सगळंss सोडून मागे, परत जाण्यासाठी !
भिजलेलं अंगण, भिजलेला प्राजक्त 
पागोळ्या वरून निथळणारं पाणी, 
आजही ओळखीचं वाटतं 
वळचणीला उभं राहता 
आईचं तुळशी वृंदावन दिसतं !
समाधानाचं तेज मिरवीत 
बाजूचं खोड भिजत असतं 
रिमझिम पावसात समाधीस्त  
स्वतःशीच बोलत असतं..
कानाकोपरा भिजून चिंब, 
मळभ अजूनच गडद होतं 
पाऊस फक्त निमित्त, 
तेवढंच आईला भेटणं होतं !


Monday, May 23, 2022

 

असंख्य प्रश्नांनी फेर धरून नाचावं 
उत्तर कशाचंच मिळत नाही 
नकळत मग कागदावरती 
मनातली चित्र सहज उतरतात 
रंगी बेरंगी काही गडद निळी 
खोलवर रुतलेले काही क्षण 
खपली निघून ताजे होतात 
नात्यांचे वेगवेगळे रंग 
मग अक्षरांचा आधार घेत 
लयीमध्ये सामावून जातात
खोल गाभाऱ्यातील तरंग 
अलवार उमटत जातांना,
हृदयाची स्पंदन ठळक करत 
शब्दांना स्वतःचा अर्थ देतात ..
जगण्यासाठी शब्द कि 
शब्दांसाठी जगणं
नव्याने समोर प्रश्न येतो 
अन कवितेचा जुना प्रवास 
पुढच्या पानावर सुरु होतो ... 


Friday, May 20, 2022

 

कधी कधी काही दृश्य 
एकदम चित्रातली वाटतात 
असंच ​दिसलं एक.. 
​काल सकाळी​ सकाळी ​
गणेश मंदिराच्या समोर 
डौलदार बैलगाडी ​उभी होती 
गुलमोहराचा देखणा सडा 
चित्रांत रंग भरत होता 
बैलगाडीत भरलेल्या
मातीचा चुटुक रंग, 
त्यावर उठून दिसत होता 
सदरा धोतर फेटा​,​ शुभ्र पांढरा 
कपाळी माऊलीचा टिळा होता 
गळ्यात माळ घातलेला तो 
एक ​क्षण विसावला होता  
पाहून वाटलं त्याच्याकडे, 
चेहरा समाधानानं फुललाय  
सुरकुत्यांमध्ये त्याच्या 
एक खरेपणा दडलाय 
का कुणास ठाऊक​ ​पण वाटलं​,
माऊली​चं ​​ओठी ​नाव
काळजात वारीची आस ​असेल ​
सावळ्या विठूला भेटायला 
​मनात त्याच्या घाई असेल..  
चतुर्थी म्हणून हात जोडून 
समोर मंदिरात​ तो पाहत होता 
वारीतला एक वारकरी 
गणेशाच्या दारांत होता.. 
गाडीवरून मी पुढे जाता  
​​नजर ​​मात्र मागे वळली 
अन ​​श्रद्धेवरची श्रद्धा 
अजूनच दृढ झाली !

आजीचं गाव

​​बकुळीचे देखणे सडे आणि
बाजूचं दगडी प्रशस्त मंदिर 
कानावर येणारे घंटेचे ते मधुर स्वर 
जणू इतकी पवित्र, शांत 
दुसरी जागाच नाही !
ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी 
गतवैभवाची कहाणी सांगणारं 
ते टुमदार दुमजली कौलारू घर 
जुनी खोडं गेली तसं रिकामं होत गेलं,
साऱ्या खुणा मागे ठेवत परकं झालं. 
कधी तिथेच ओळख झाली होती 
आजीच्या मऊसूत गोधडीशी 
तिच्या नऊवारी पातळाची उब
सुरकुतल्या हातांनी
तिनेच पांघरली होती
कधी आमच्यावर ! 
मुलांनी भरलेलं गोकुळ 
चुलीवरचा तो उन उन भात 
मधेच ऐकू येणारं गाईचं हंबरण 
अबोली, कण्हेर, चाफ्याने सजलेलं
आठवणीतलं ते देवघर 
ओसरी, पडवी, उखळ, जातं 
फक्त आजीच्या घरी होतं 
जात्यावरचं सातूचं पीठ
फक्त तिनेच भरवलं होतं...
शेणाने सारवलेले अंगण,
ठिपक्यांची रांगोळी, काचेची झुंबरं  
परसातलं शेवग्याच झाड, दगडी विहीर
आता फक्त गोष्टीतच उरलीये..​​
चैत्र महिना आला कि आजही
आठवण येते चैत्रागौरीची, 
त्रिपुरी पौर्णिमेला उजळलेल्या 
देवळातल्या दिपमाळेची 
पालखीचं ते देखणं रूप 
अजूनही समोर येत कधी कधी 
मग वाटतं,
किती साधं आणि सुरेख होतं हे सगळं 
काळाच्या प्रवाहांत पुसट होत गेलं..
देवळातील तो गाभारा 
आजही देत असतो आशीर्वाद, 
डोळे मिटून त्याच्या समोर 
नतमस्तक झाल्यावर ....

© कविता सहस्रबुद्धे


असं म्हणतात,
मुलीसाठी तिचा बाबा हिरो असतो, 
माझाही होता ..
'ए बाबा' नाही पण 'अहो बाबा', 
फरक इतकाच होता !
चारचाकी गाडी
सुखदुःखाच्या चौकटीत
तेव्हा आसपासही नव्हती
सायकलवरून त्याच्या
चक्कर मारण्यातली मौज 
सर्वात भारी होती !
हट्ट तेव्हाही असायचा,
खमंग फुटाण्याचा,
बागेतल्या ओल्या भेळेचा..
संध्याकाळी पायरीवर बसून
त्याची वाट बघणं,
रोजचा सोहळा असायचा
नेव्ही ऑफिसर शिस्तीचा 
आईवर कविता करायचा
भावंडांसाठी,घरासाठी
हळवा होऊन जायचा
अलीकडे आजोबा म्हणून
तसूभर जास्त देखणा दिसायचा
दुधावरच्या साईला जीवापाड जपायचा !
सुरकुतला हात हातांत घेतला त्याचा
की काळजात चर्रर्र व्हायचं
तरुणपणीचं रूप त्याचं
मग उगा आठवत राहायचं...
लहानपणी बरं नसलं की
उशाशी बसून असायचा
मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या 
मऊ मायेनं बदलायचा.
'दूर देशी गेला बाबा' 
गुणगुणताना हल्ली
मुठीमधून हरवलेलं बोट,
हळूच डोळ्याकडे जातं
निरोप न घेता त्याचं जाणं
रात्रभर आठवत राहतं
मग मीच प्रयत्न करते,
तेव्हा दिसतो तो आजूबाजूला..
अगदी माझ्याच घरांत
'आजोबा हवेत' म्हणून
रडणाऱ्या भाचरांत,
दुरून ऐकू येणाऱ्या रामरक्षेत
स्वामींच्या पोथीत, तर कधी
गाभाऱ्यातील पवित्र शांततेत.
तिन्हीसांजा देव्हाऱ्यात,
कधी क्षितिजावर
मावळतीच्या दरबारात,
कधी देवळातून ऐकू येणाऱ्या 
माऊलीच्या अभंगात;
तर कधी वसंतरावांच्या
'दाटून कंठ येतो' गाण्यात..
आजकाल असाच भेटत असतो 
तो मला, शांत सावलीसारखा...

©कविता सहस्रबुद्धे 

 पेट पुराण


काय भारी नाव आहे वेबसिरीजचं. या नावाची वेबसिरीज आत्ता आली पण त्याआधी बहुतेक घरांत टीनएज मध्ये मुलं गेली कि सुरु होतं हे 'पेट पुराण'. 'आई आपण एक कुत्रा पाळू यात का, छोटासा'?'अजिबात नाही, तो काय छोटाच राहणार आहे का कायम ? आणि कोण सांभाळेल त्याला?'... काही वर्षांपूर्वी असा सुरु होणारा आमच्या घरातला संवाद. खरं तर संवाद म्हणून सुरु होऊन भुणभुण म्हणता येईल असा पुढे चालू राहायचा. 'एकतर कुत्रा घरात राहील नाहीतर मी', असं शेवटचं शस्त्र मी काढलं कि भुणभुण करण्याला फुलस्टॉप लागायचा, पुढे नो comments, पण काही वेळा करता. मग बाबा आणि मुलगा आंँखो हि आंँखो में इशारा करत पुन्हा परत ते discussion सुरु करायचे. कुत्रा कसा खेळकर असतो, प्रामाणिक असतो, जीव लावतो, प्रेम करतो वगैरे वगैरे .. मी त्यावर म्हणायचे, 'आपण आहोत ना तिघे जीव लावायला, प्रेम करायला एकमेकांना आता अजून तो डॉगी कशाला मध्ये'.. पण नाही, अधून मधून टीनएज मधले हट्टाचे वारे बरेचदा वाहायचेच. 

'पेट पुराण' इतकं रंगायचं कि शेजारच्या काकुंना, शाळेच्या  गेटवरच्या काकांना, सोसायटीच्या वॉचमन काकांना सर्वांना विचारून झालं होतं कि 'मी शाळेत जाईन तेव्हा तुम्ही सांभाळाल का आमच्या पिल्लाला' ? इतकंच काय तर वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मावशीकडे कुत्र्याचं पिल्लू  सुद्धा मागून झालं. शाळेचे व्हॅनकाका कुत्र्याचं पिल्लू शाळेत न्यायचं असेल तर त्याचे वेगळे पैसे घेतील का अशी चौकशी पण झाली व्हॅन काकांकडे. आणि जेव्हा या सर्वांनी मला विचारलं 'तुम्ही कुत्रा घेताय का' ? तेव्हा समजलं सारं. पण या पुराणातला कुत्रा घरी काही आला नाही.  

खरं तर मला कुत्रा आवडत नाही असं अजिबातच नाही पण त्याचं सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे, तेवढा वेळ पाहिजे आणि त्याच्याकडे घरांत लक्ष द्यायला कोणीतरी हवं सारखं. ऑफिसला गेल्यावर कोण बघणार त्याच्याकडे म्हणून मला वाटायचं नको. तो जीव नीट सांभाळण्याची कसरत जमायला हवी. मग काय, 'मी मोठा झालो कि आणीन पिल्लू', यावर मांडवली झाली. हुश्श .. पटलं तर एकदाचं ! मग काय शाळा संपली , जुनियर कॉलेज संपलं आणि पुढचं शिक्षण सुरु झालं बंगलोर ला ! मला वाटलं संपलं आता पेट पुराण.

पण नाही कहानी में ट्विस्ट अभी बाकी था ! ही पेट पुराण वेब सिरीज काय आली त्याच तिकिटावर तोच शो परत सुरु झाला. फरक इतकाच होता कि मुलाची जागा आता बाबानी घेतली. गोल्डन रिट्रिव्हर आणू यांत का आपण ? असा समोरून सलग दोन दिवस येणारा प्रश्न ऐकून शेवटी मी विचारलं, " are you serious ?"  उत्तर चक्क 'हो' आलं आणि काय सांग, मी निःशब्द झाले ! 

पेट पुराण मध्ये 'व्यंकू' नावाचं इतकं गोड पिल्लू आहे कि कोणालाही आवडेल ते पण म्हणून काही लगेच तसंच आणायचं ? मग लक्षांत आलं यार 'आ बैल मुझे मार' हा वेडेपणा मीच तर केला होता.  Ruby , Dogs way home , Benji, पेट पुराण असे movies बघत असते मी आणि व्यंकू आणायचा हट्ट करतो हा. काल बंगलोर ला फोन केला तर तोही तेच विचारतोय ,''आई हो म्हण ना बाबाला, आणू यात ना व्यंकू.'' म्हणजे तिथं पर्यंत बातमी पोचली होती तर. मग मी म्हटलं, 'अरे बाबाला हो तर कधीच म्हटलं मी , होतील चोवीस वर्ष आता. आणि हो,व्यंकू ना आणू यात कि, सोबत बकु पण आणू'.. 

आता बकु कोण ? असं विचारू नका .. त्यासाठी पाहा , सोनी लिव्ह वर 'पेट पुराण'!

वेबसिरीज बघून झाली असली तरी घरांतलं 'पेट पुराण' सुरू आहे अजून 😄 


© कविता सहस्रबुद्धे