गाण्यामागची गोष्ट
नैसर्गिक व संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील ! आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या स्मिता यांची चित्रपट कारकीर्द केवळ दहा वर्षांची असली तरी अविस्मरणीय राहिली. एका दशकात जवळपास ८० चित्रपटात त्यांनी काम केलं. मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती,कन्नड,मल्याळम आणि तेलगू अशा एकूण आठ भाषांतील चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं व आपल्या अप्रतिम अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. 'जैत रे जैत' व 'उंबरठा' या दोन चित्रपटांतील त्यांची भूमिका आजही विशेष लक्षात राहणारी !
'जैत रे जैत' हि गो. नी. दांडेकर यांची अनोखी कलाकृती,कादंबरी.. ठाकर लोकांच्या जीवनातली गोष्ट सांगणारी. या गोष्टीतील नायक नाग्या भगत व त्याची प्रेयसी चिंधी यांची उत्कट प्रेमकथा. निसर्ग व माणसाचं नातं उलगडणारी, मनास भुरळ घालणारी, 'जैत रे जैत' म्हणजे झालेला विजय, तो क्षण येण्यासाठी घेतलेले कष्ट अधोरेखित करणारी गोष्ट ! या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. दिदींच्या आग्रहाखातर ना.धो. महानोरांनी तब्बल 16 गाणी या चित्रपटासाठी लिहिली त्यापैकी 'मी रात टाकली' हे एकमेव गाणं दीदींनी गायलं.
आशाताईंच्या आवाजातील..'नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात'.. या गाण्याची नुसती आठवण जरी झाली तरी डोळ्यांसमोर ढगांनी गच्च भरलेलं सावळं आभाळ उभं राहतं. सर्व मंगेशकर भावंडांचा एखाद्या चित्रपटाच्या संगीतात एकत्रित सहभाग असणारा हा चित्रपट.
'नभ उतरु आलं' या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी कोरसमधील एक गायिका अनुपस्थित होती. त्यावेळी लतादिदी यांच्या भगिनी मीना खडीकर या कोरसमध्ये गायला उभ्या राहिल्या.
हृदयनाथजींनी या चित्रपटाची, या गाण्याची एक आठवण एका कार्यक्रमात सांगितली होती. डॉक्टर जब्बार पटेल यांनी 'जैत रे जैत' साठी होकार दिल्यावर बऱ्याच बैठका, चर्चा झाल्या व हा चित्रपट सांगीतिक असावा असं ठरलं. त्याक्षणी हृदयनाथजींना आपल्या आजोळची आठवण झाली, खानदेशची. तिथली लोकगीतं , गाणी लहानपणी ऐकली होती त्यामुळे साहजिकच पुढचा रस्ता माहित होता, गीतकार म्हणून ना.धो. महानोर यांचं नाव मनातं आलं. एका ठिकाणी गाण्याची सिच्युएशन जब्बार साहेबांनी सांगितली पण मनासारखी चाल काही सुचत नव्हती. अखेरीस चाल सुचली आणि महानोरांनी दिलेल्या मीटर मध्ये गीत लिहिलं, तब्बल अठ्ठावीस अक्षरांचं धृवपद !
हृदयनाथजी म्हणतात महानोरांची गाणी चालीसकटच जन्म घेतात. चिरतारुण्याचं आशिष घेऊन जन्मलेली आहेत हि गाणी !
© कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment