डॉन
'जुनं ते सोनं' या म्हणीला सार्थ ठरवत १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला 'डॉन' चित्रपट The Chase Begins Again म्हणत २००६ मध्ये तर The King Is Back म्हणत २०११ मध्ये sequel पॅटर्न मध्ये रिलीज झाला. ते दोन्हीही चित्रपट थिएटर मध्ये बघितले आणि 'ओरिजिनल डॉन' थिएटर मध्ये पाहता न आल्याचं दुःख प्रकर्षानं झालं. असं म्हणतात 'अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है '.. बिलकुल खरं असावं हे कारण PVR मध्ये मागच्या चार दिवस सुरु असलेल्या फिल्म फेस्टिवल मुळे हा योग जुळून आला. तिथे चित्रपट पाहायला आलेल्या हौशी प्रेक्षकांना पाहून वाटलं, पिढीतलं अंतर पुसलं या माणसानं ! त्याच्या प्रत्येक एंट्रीला शिट्या, त्याच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि प्रत्येक गाण्यावर वय विसरून नाचणारे, ठेका धरणारे दर्दी रसिक प्रेक्षक पाहून त्याच्यावर प्रेम करणारी 'वेडी माणसं' दिसली त्या दिवशी.
सिंबायोसिस मध्ये काम करतांना मागच्या सतरा वर्षांत अनेक मोठ मोठ्या लोकांना भेटण्याचा, जवळून पाहण्याचा, ऐकण्याचा योग जुळून आला. वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं मोठेपण जपलेल्या अनेक नामवंत व्यक्तिमत्वांमध्ये जसं म्हणतात ना 'ते आले आणि त्यांनी जिंकलं' असा माहोल मी बघितला एकतर आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी आले होते तेव्हा आणि दुसरं नाव म्हणजे साक्षात अमिताभ बच्चन !
२०१० व २०१४ मध्ये त्यांना प्रत्यक्ष जवळून बघण्याचा, ऐकण्याचा योग आला तर २०२० मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी online संवाद साधला. आमच्या विद्यापीठात 'मानद प्रोफेसर' असणाऱ्या त्यांना प्रत्यक्ष ऐकणं हा एक विलक्षण सोहळा होता, आमच्यासाठी !
बाबुजी आणि त्यांच्या कविता याबद्दल विचारलं असता ते म्हणाले होते, "कोणत्याही कवितेत जेव्हा आपण स्वतःला बघू शकतो तेव्हाच ती कविता महान होते". 'है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है' या स्वर्गीय हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्ती मागील भावना उलगडतांना ते म्हणाले, "जो उजडा हुआ है, बिखरा हुआ है उसको फिर से वापस लाना कब मना है, आजूबाजूला अंधकार असतांना आपण आपला रस्ता शोधायला हवा. हि कविता लिहितांना त्यांच्या मनात नक्की काय होतं हे माहित नाही पण त्यांच आत्मचरित्र वाचल्यावर या कवितेच्या ओळी लिहितांना त्यांच्या मनांत काय असेल हा अंदाज मी बांधला. माझ्या वडिलांच्या पहिल्या बायकोचे लग्नानंतर एका वर्षातच अतिशय वेदनादायी आजारानंतर निधन झाले. त्यांना टीबी झाला होता. वडील तेव्हा शिकवणी घ्यायचे. ४ / ५ मैल चालत जाऊन त्या शिकवणीतून महिना कधी २५ तर कधी जास्तीत जास्त १०० रुपये त्यांना मिळायचे. या दुःखद घटनेनंतर त्यांनी खूप दुःखी कविता लिहिल्या. पुढील तीन चार वर्ष त्यांनी प्रचंड औदासिन्य वातावरणांत घालवली. पुढे एका जवळच्या मित्राच्या घरी ते आईला पहिल्यांदा भेटले, तिच्याशी त्यांची तिथे ओळख झाली, जिथे त्यांनी तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. मला वाटतं त्या वेळी त्यांच्या त्या मानसिक स्थितीमध्ये आईचं असं भेटणं त्यांच्यासाठी एक हळुवार घटना होती, जणू आजूबाजूला पसरलेल्या अंधःकारात त्यांच्यासाठी तोच एक दिवा होता, प्रेरणा होती"... हे ऐकून ती कविता परत वाचली !
१९७५ मधला अँग्री यंग मॅन ते ब्लॅक, पा, पिंक, चिनी कम, पिकू पर्यंत झालेलं ते सहज परिवर्तन आणि या यशामागील गुपित जाणून घेतांना ते म्हणाले, "माध्यमं सतत बदलत राहिली अखंडपणे.. तो माझ्यातील बदल नव्हता. अँग्री यंग मॅन मी नव्हतो तर ती एक व्यक्तिरेखा होती, दिग्दर्शकाने साकारलेली. लेखकाने गोष्ट लिहिली, संवाद लिहिले, त्याने त्याच्या गोष्टीतील जागा सुचवली, त्याच्या गोष्टीतील माणसं कशी आहेत हे सांगितलं. आम्ही दिग्दर्शकाचं फक्त ऐकलं, चेहऱ्यावर कोणते भाव हवेत हे पण त्यानेच सांगितलं त्यामुळे हे सर्व श्रेय त्यांच आहे. वयाप्रमाणे येणाऱ्या भूमिका बदलत गेल्या इतकंच. आजही KBC चा भाग बघतांना मी टिपत असतो, माझं काय चुकलंय, काय सुधारणा करायला हवी. तरंच माझं सर्वोत्कृष्ट मी देऊ शकतो, जो प्रयत्न मी करतो"... ऐकून थक्क व्हायला झालं !
आपल्या भूमिकांपैकी त्यांनी दोन व्यक्तीरेखांचा आवर्जून उल्लेख केला, Black चित्रपटातील शिक्षक. एका दिव्यांग मुलीची गोष्ट पडद्यावर साकारताना तिचा शिक्षक तिला प्रेरित करतो. त्या शिक्षकानं तिच्यात जागा केलेला आत्मविश्वास तिचं आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतो. या चित्रपटाची गोष्ट सांगताना ते म्हणाले "शिक्षकाचं ते रूप साकारणं हा एक हृदयस्पर्शी अनुभव होता. दुसरा अनुभव पिंक चित्रपटातील वकील साकारतानाचा. JUST ONE WORD, TWO ALPHABATES.. ‘NO’.. BUT SO POWERFUL हे अनुभवणं आणि पोहचवणं अजिबात सोपं नव्हतं. मी खूपदा मोडून पडलो, व्यथित झालो.. शेवटच्या सीन मध्ये एक लेडी पोलीस ऑफिसर माझ्याशी हस्तांदोलन करते हा माझ्यासाठी सर्वात भावुक क्षण होता. असे अनेक अनुभव मला समृद्ध बनवत गेले"...
आपल्या चाहत्यांकरता त्यांच्या हृदयात एक खास जागा आहे, 'My extended family' असं त्यांना संबोधताना कुली चित्रपटाच्या अपघातानंतर चाहत्यांचं मिळालेलं प्रेम हे त्यांच्याकरता अमूल्य आहे. दर रविवारी त्यांची एक झलक पाहायला त्यांच्या घरासमोर एकत्र जमणारा चाहतावर्ग हेच त्यांचं वैभव आहे.
तुमच्या आयुष्यातील कोणता क्षण तुम्हाला परत जगावासा वाटेल असं विचारता 'हेच आयुष्य परत जगायला आवडेल' असं म्हणतांना भावुक झालेला तो चेहेरा आणि आवाज अजूनही स्मरणात आहे !
डॉक्टर भास्कर बॅनर्जी, इन्स्पेक्टर विजय खन्ना, शेखर, सुबीरकुमार, अमित, जय, राज मल्होत्रा, विकी कपूर, इकबाल , विजय दीनानाथ चौहान, प्रोफेसर सुकुमार सिन्हा,विजय वर्मा, सिकंदर , अँथोनी, बादशहा खान, देबराज सहाय, बुद्धदेव गुप्ता, ऑरो, शेहेनशाह ... अशा कितीतरी भूमिकेतून तो आपल्याला भेटत राहिला आणि आपण त्याच्यावर प्रेम करत राहिलो !
"नीला आसमाँ सो गया" असो किंवा "मै और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं ".. त्याच्या आवाजात डोळे बंद करून कितीही वेळा ऐकलं तरी मन कधीच भरलं नाही. त्या आवाजात सामावलेली गेहेराई, आर्तता प्रत्येक वेळी नव्याने जाणवत राहिली.
"हादसा बनके कोई ख्वाब बिखर जाए तो क्या हो. वक्त जझबात को तब्दील नहीं कर सकता. दूर हो जाने से एहसास नही मरता, ये मोहोब्बत हें दिलोंका रिश्ता .. ऐसा रिश्ता जो सरहदों में कभी तक्सीम नहीं हो सकता.. तू किसी और की रातों का हसीं चाँद सही, मेरे हर रंग में शामिल तू है .. तुझसे रोशन है मेरे ख्वाब मेरी उम्मीदे.. तू किसी भी राह से गुजरे मेरी मंझिल तू हें ".... त्याच्या आवाजातील ही कविता कायम खुणावत राहिली !
छू कर मेरे मन को किया तुने क्या इशारा, रिमझिम गिरे सावन, दो लफ्जों की है दिल कि कहानी या है मोहोब्बत या है जवानी , दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे हि तड़पाओगे, कसमें वादे निभायेंगे हम, मित ना मिला रे मन का, तेरे मेरे मिलन कि ये रैना, मैं प्यासा तुम सावन, आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन, कभी कभी मेरे दिल में खयाल आता हें आणि मै और मेरी तनहाई सारखी रोमँटिक गाणी फक्त त्याच्यासाठीच लिहिली गेली..
गोविंदा बरोबर 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये तर कधी अभिषेक बरोबर 'कजरारे कजरारे' करताना त्याने आपल्याला सुद्धा ठेका धरायला लावला. डॉन २ पाहतांना त्याची सर याला नाही म्हणत प्रत्येक फ्रेम मध्ये तो अजूनच आठवत गेला. पिंक, पिकू , वजीर, अशा प्रत्येक नवीन भूमिकेत एक वेगळी छाप पाडून गेला.
"ये तुम्हारे बाप का घर नहीं पोलीस स्टेशन हें, सिधी तरहा खडे रहो', म्हणणारा जंजीर मधील इन्स्पेक्टर विजय खन्ना , "जाओ पेहेले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे बाप को चोर कहां था", म्हणणारा विजय वर्मा , "मुछे हो तो नत्थुलाल जैसी वरना ना हो ", म्हणणारा विकी कपूर. " जिस तरह गोबी का फुल फुल होकार भी फुल नहीं होता वैसे गेंदे का फुल फुल होकर भी फुल नहीं होतां", म्हणणारा प्रोफेसर सुकुमार .. प्रत्येक भूमिकेत बहरत गेला.
"पीटर तुम लोग मुझे वहांँ ढुंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था".. दिवार मधला हा डायलॉग जितका लक्षांत राहिला तेवढाच तो म्हणतांना खुर्चीवर पाय पसरून बसलेला अन् तोंडात बिडी असलेला निळ्या शर्ट मधला विजय वर्मा सुद्धा .." मैं जानता हूँ के तू गैर हैं मगर यूंँ हि ", म्हणणारा कभी कभी मध्ये त्या पांढऱ्या कोट मधे जितका आवडला तेवढाच "तेरी रब ने बना दि जोडी तेरी रब ने ", म्हणतं भांगडा करतांना. कधी तो हैदराबादी जाफ्रानी पुलाव करणारा बुद्धदेव म्हणून आवडला तर कधी "माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस" म्हणणारा .. याराना मध्ये "तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना", म्हणतं त्याने आपल्याही डोळ्यांत पाणी आणलं. मुकद्दर का सिकंदर, सुहाग, सिलसिला, त्रिशूल , शराबी, दिवार , शोले याची किती पारायणं केली ते कधी मोजलच नाही. प्रत्येकाने भरभरून प्रेम केलं त्याच्यावर ..
आजही त्याचा उत्साह, स्वतःला कामात झोकून देण्याची वृत्ती, नवनवीन प्रयोग करण्याची तयारी, तो हसरा चेहेरा, कानांत साठवून ठेवावा असा आवाज ऐकून वाटतं त्याच्याकरता Age is just a number ! म्हणून तर अजूनही सहस्त्रचंद्रदर्शनाच्या वयाकडे तो झुकलाय असं अजिबात वाटत नाही!
'Walking into the 80th' म्हणत gracefully वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करणाऱ्या
आपल्या सर्वांच्या लाडक्या सुपरस्टारला, अमितजींना अनेकानेक शुभेच्छा !
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment