ऑफिस to घर via चांदणी चौक
आज स्वतः पुलंनी जरी येऊन विचारलं कि तुम्हाला कोण व्हायचं आहे; मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर तर 'आम्हाला पुणेकरच व्हायचं आहे' असंच म्हणतील पुणेकर. अहो याच नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा पुण्याला सोडायचं नाहीए आम्हाला.. आता पुणेकर म्हटलं कि 'जाज्वल्य अभिमान असणं' रक्तांत आलंच. मग काय दिल्लीच्या 'चांँदनी चौक'(उच्चारात फरक आहे ) एवढं ग्लॅमर आणि इतिहास नसला म्हणून काय झालं इथला 'चांदणी चौक' सुद्धा आमच्यासाठी तेवढाच महत्वाचा. पुण्याच्या पश्चिमेकडील कोथरूड या उपनगराने पूर्वी सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर म्हणून ख्याती काय मिळवली त्याच वेगाने अजूनही त्याचा विस्तार सुरूच आहे. याच उपनगराच्या सीमेवर असणारा हा 'चांदणी चौक' सध्या फारच चर्चेत आहे. मग तो तिथल्या वाहतुकीच्या गोंधळामुळे असो किंवा WA वर फिरणाऱ्या या चांदणी चौकावरील विनोदामुळे, जसं आजवर चांगलं काम केल्यामुळे प्रसन्न झालेला बाप्पा कोथरूड / वारजे मध्ये घर देतो आणि दुसरीकडे चुकीच्या कामांची शिक्षा म्हणून हिंजवडीत नोकरी देतो जेणेकरून या चांदणी चौकातूनच रोज ये जा करायला लागावी. खरं तर आत्ता आत्ता पर्यंत चांदणी चौकातून ये जा करणं म्हणजे शिक्षा असं कधी वाटलंच नाही. उलट एकीकडे डोंगराच्या पायथ्याशी दिसणारं वेदभवन गणपती मंदिर, बाजूचा NDA कडे जाणारा शांत निसर्गरम्य हिरवा रस्ता, मुळशीकडे जातांना बंगलोर आणि मुंबईला जोडणाऱ्या महामार्गाचं होणारं दर्शन तर उजवीकडे दिसणारा शहराचा विस्तीर्ण परिसर. जवळच्या गार्डन कोर्ट हॉटेल मधून रात्रीच्या वेळी चमचमणारं आपलं शहर बघितलं आहे, कित्येक वेळा.. याच चांदणी चौकातून !
पण सध्या मात्र इथली परिस्थिती एकदम बिकट आहे. त्याचं ट्रेलर जssरा आधीच सुरु होतं, अलीकडच्या पाषाण सुस रोडच्या नव्यानं बांधण्यात येत असणाऱ्या पुलाच्या जवळ. नव्यानं बांधला जाणारा हा पूल आणि पुढे चांदणी चौकातला पडण्याच्या प्रतिक्षेत असणारा पूल व या दोन पुलांमध्ये ऑफिस मधून घरी येतांना रोज न चुकता अडकणारे आमच्या सारखे असंख्य प्रवासी असं चित्र आजकाल न चुकता रोजच रंगतं.. बरं त्यावर उपाय काय ? ते पण समजत नाही.
तरी मी प्रयत्न केला माझ्या परीनं. वारजे बावधन क्षेत्रीय कार्यालय, PMC ऑफीस, कमिशनर ऑफिस, वाहतुक नियंत्रण शाखा सर्वकडे फोन झाला, विनंती झाली, वर्तमानपत्रातुन बोलून झालं, पण काही उपयोग झाला नाही. पालकमंत्र्यांना भेटेपर्यंत अहो त्यांची वर्णी थेट मंत्रिमंडळात लागली. इकडे प्रश्न तर दिवसेंदिवस गंभीर बनत होता आणि तो नक्की कोण सोडवणार हे कोडं काही सुटत नव्हतं. या ट्रॅफिक मुळे रोजच उशीर होत होता. ऑफिस मधून निघाल्यावर घरी पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो पण एके दिवशी तर या अर्ध्या तासाच्या अंतराला चक्क तीन तास लागले; 18 किलोमीटर साठी चक्क तीन तास.. मग ठरवलं शेवटचा उपाय म्हणून २४ तास कार्यरत असणाऱ्या BJP ऑफिस मध्ये जाऊन माजी महापौरांना निवेदन द्यायचं. मग काय 'माझ्याबरोबर चल जरा' म्हणून नवऱ्याच्या मागे दोन तीन दिवस भुणभुण केली. पण गावाच्या सीमेवर ट्रॅफिकशी रोज लढणाऱ्या आमच्या सारख्यांची हालत 'तुम क्या जानो रमेस बाबू' असं झालं. आज उद्या करता करता जाणं बारगळत राहिलं.
जणू त्या परमेश्वरालाच सगळी काळजी म्हणून तर काय कमाल योग जुळून आला... त्या रात्री दस्तुरखुद्द मुख्यमंत्रांचा ताफा पुण्याच्या दिशेने येतो काय, त्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकतो काय आणि नंतर सगळी सूत्र फटाफट हलतात काय सगळं स्वप्नवत... दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्याने पेपर पाहिला आणि हुश्श केलं. त्याला माझ्याबरोबर कोठेही जावं लागणार नसल्याचा झालेला आनंद तसूभर जास्त होता. त्या दिवशी ऑफिसच्या बस मध्ये एकदम उत्साही वातावरण होतं, 'चला, finally आपला प्रश्न मिटणार आहे', या आनंदात सगळे हुरळून गेले होते. पूल पाडणार त्या दिवशी ऑफिसला सुट्टी मिळणार का ? पूल पाडला तर रस्ता मोठा कसा होणार ? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यातून तोंडावर येत होते. रात्री काही सेकंदात पूल पाडणार त्यामुळे बहुतेक सुट्टी काही मिळणार नाही असा निष्कर्ष पण काढला गेला... बरं, पूल पाडून लेन कशा वाढणार ? यावर बस चांदणी चौकात आल्यावर खिडकीतून बाहेर डोकावत काही जणांनी पाहणी केली. म्हणजे पुलाच्या खालचा रस्ता मोठा केला तर आपोआप पूलच पडेल म्हणून आधी पूल पाडून मग रस्ता मोठा करणार वगैरे वगैरे चर्चा रंगू लागल्या.
चांदणी चौकातील त्या 'पुलाखालून' ऑफिसकरता रोज दोन वेळा जाण येणं होतं पण आज आवर्जून चांदणी चौकातील त्या 'पुलावरून' चक्कर मारून आलो तेही भल्या पहाटे, अहो म्हणजे गर्दी नसते तेव्हा म्हणून. काही वर्षांआधी इथून दिसणारं चित्र आज पुरतं बदललं आहे हे तर नक्की आणि त्या बदललेल्या चित्रांत खूप काही हरवलंय.. सध्या तरी इथला मोकळा रस्ता, आणि हरवलेली शांतता प्रत्येकालाच जाणवते आहे. येत्या काही दिवसांत पूल पाडल्यावर बदललेलं सुखद चित्र आता प्रत्येकालाच खुणावतं आहे सोबत कालच गडकरी साहेबांनी दाखवलेली स्वप्नही आहेत त्यामुळे 'चांदणी चौका' सोबत आपल्यालाही मोकळा श्वास घेता येणार कि नाही याचं उत्तर लवकरच मिळणार आहे !
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment