असं म्हणतात,
मुलीसाठी तिचा बाबा हिरो असतो,
माझाही होता ..
'ए बाबा' नाही पण 'अहो बाबा',
फरक इतकाच होता !
चारचाकी गाडी
सुखदुःखाच्या चौकटीत
तेव्हा आसपासही नव्हती
सायकलवरून त्याच्या
चक्कर मारण्यातली मौज
सर्वात भारी होती !
हट्ट तेव्हाही असायचा,
खमंग फुटाण्याचा,
बागेतल्या ओल्या भेळेचा..
संध्याकाळी पायरीवर बसून
त्याची वाट बघणं,
रोजचा सोहळा असायचा
नेव्ही ऑफिसर शिस्तीचा
आईवर कविता करायचा
भावंडांसाठी,घरासाठी
हळवा होऊन जायचा
अलीकडे आजोबा म्हणून
तसूभर जास्त देखणा दिसायचा
दुधावरच्या साईला जीवापाड जपायचा !
सुरकुतला हात हातांत घेतला त्याचा
की काळजात चर्रर्र व्हायचं
तरुणपणीचं रूप त्याचं
मग उगा आठवत राहायचं...
लहानपणी बरं नसलं की
उशाशी बसून असायचा
मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या
मऊ मायेनं बदलायचा.
'दूर देशी गेला बाबा'
गुणगुणताना हल्ली
मुठीमधून हरवलेलं बोट,
हळूच डोळ्याकडे जातं
निरोप न घेता त्याचं जाणं
रात्रभर आठवत राहतं
मग मीच प्रयत्न करते,
तेव्हा दिसतो तो आजूबाजूला..
अगदी माझ्याच घरांत
'आजोबा हवेत' म्हणून
रडणाऱ्या भाचरांत,
दुरून ऐकू येणाऱ्या रामरक्षेत
स्वामींच्या पोथीत, तर कधी
गाभाऱ्यातील पवित्र शांततेत.
तिन्हीसांजा देव्हाऱ्यात,
कधी क्षितिजावर
मावळतीच्या दरबारात,
कधी देवळातून ऐकू येणाऱ्या
माऊलीच्या अभंगात;
तर कधी वसंतरावांच्या
'दाटून कंठ येतो' गाण्यात..
आजकाल असाच भेटत असतो
तो मला, शांत सावलीसारखा...
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment