गाण्यामागची गोष्ट
नवकेतन बॅनरच्या 'काला बाजार' या चित्रपटासाठी देव आनंद , विजय आनंद, वहिदाजी, एस डी बर्मन, शैलेंद्र अशी तगडी टीम एकत्र आली होती. याच सुमारास शैलेंद्रजी इतर काही प्रोजेक्ट वरती सुद्धा काम करत असल्याने गाणं लिहायचे काम वेळेत पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे साहजिकच निर्माता देव आनंद व विजय आनंद एस. डी. बर्मन यांच्या मागे गाण्याच्या चाली करता तर शैलेंद्र यांच्याकडे गाण्याचे बोल लवकर हवेत म्हणून घाई करायचे. एके दिवशी या सततच्या घाईला कंटाळून, त्रस्त होऊन एस डी बर्मन साहेबांनी पंचमना दिवसभर शैलेंद्रजीं सोबत राहायला सांगितलं. शिवाय जोवर शैलेंद्र जी गाणं लिहून देत नाहीत तोवर घरी येऊ नकोस असं सुद्धा सांगितलं.
मग काय संध्याकाळ होताच दोघे शैलेंद्रजींच्या घरी गेले. थोडया वेळाने कारमधून फिरायला गेले. वाटेत शैलेंद्र यांना शंकर जयकिशन साहेबांकडे काम होतं ते सुद्धा केलं, मग दोघे नॅशनल पार्क मध्ये गेले तरी शैलेंद्रजींना काहीही सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी जुहू बीच वर जायचं ठरवलं. रात्र झाली, अकरा वाजले. त्या वेळी पंचम आपल्या वडिलांसोबत काम करत होते, वय वर्ष वीस. ते शांत पणे बसले होते कारण वडिलांचं ऐकणं भाग होतं.जुहू बीचवरची दूरवर पसरलेली ती शांतता,समुद्राचा तो आवाज,आकाशातील चांदणं ...
सिगारेट पेटवून शैलेंद्रजींनी ती काडेपेटी पंचमना दिली आणि गाण्याची ट्यून वाजवायला सांगितली. पंचमदांनी त्या काडेपेटी वर ठेका धरत धून ऐकवली. सिगारेटचा हवेत विरणारा धूर व आकाशातील चंद्र पाहून शैलेंद्रजींना शब्द सुचले व लगेचच सिगारेटच्या पाकिटावर त्यांनी ओळी लिहिल्या ... 'खोया खोया चाँद खुला आसमान , आँखों में सारी रात जाएगी'..
No comments:
Post a Comment