मोरपंखी रंग .. मोराच्या पिसाऱ्यात असणाऱ्या सगळ्या रंगांचं प्रतिक ! त्या विधात्याने मोराच्या पिसाऱ्यावर मुक्त हस्ताने रंगांची उधळण केली व त्यातूनच निळा आणि हिरव्या रंंगाच्या विविध छटा निर्माण झाल्या. हिरव्या रंगाची संपन्नता व निळ्या रंगाची स्थैर्यता मोरपिशी रंगात आढळते, हा रंग राधा कृष्णाचे अस्थित्व म्हणून ओळखला जातो. निळ्या रंगातला विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास, सचोटी तर हिरव्या रंगातली सृजनता, आरोग्यसंपन्नता, नावीन्य या रंगात सामावले असल्याने हा एक परिपूर्ण रंग आहे !
हा रंग अनेक कवींना भुरळ घालतो. मनाच्या अवस्था शब्द चित्रित करतांना हा रंग त्या अचूक टिपतो.
मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे
अंतरावर पसरलेले, टिपूरसे.. सुखाचे चांदणे !
कधी कधी आठवणींना आपण मोरपिशी आठवण म्हणतो.. मोरपिसाचा स्पर्श अनुभवला तरंच आठवणींना मोरपिसी आठवण म्हणण्यातला भाव समजू शकतो. मोरपंखी रंगाच्या साडीचं सौंदर्य प्रत्येक स्त्रीला खुणावत असतं.
माझ्यासाठी हा राधा कृष्णाच्या प्रेमाचा रंग आहे, हे प्रेम ज्याला समजलं त्याला या रंगांनं वेड लावलं ..
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment