पिवळा रंग
विविध रंगांमध्ये मिसळून गेलेले आपलं आयुष्य.. प्रत्येक रंग एक वेगळं नातं घेऊन समोर येतो हे हळूहळू उमगत जातं. पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा, मनाला आनंदी आणि उत्साही ठेवणारा सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो.
सणावारी दारावर शोभून दिसणारं झेंडूच तोरण याच रंगाचं, गावाकडे परसदारातलं श्रीमंती मिरवणारं सोनचाफ्याच्या झाडाचं फुल सुद्धा याच रंगाचं तर प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा मधेच डोकावणारी सुर्यफुलं आणि डोंगरावरची रानफुलं सुद्धा याच रंगाची ! गर्द पिवळ्या रंगाचं मखमली बाभळीचं इवलं फुलं सुद्धा किती सुरेख दिसतं!
सूर्योदयाला क्षितिजावर डोकावणारा याच रंगाचा सूर्य रोज नवीन दिवसाची नवीन सुरवात करून देतो.. जगण्याची प्रेरणा देतो. लक्ष्मीचा आणि श्रीकृष्णाचा आवडता रंग सुद्धा पिवळा त्यामुळे हा रंग मांगल्याची अनुभूती देतो.
लग्नाच्या वेळी आंब्याच्या पानांनी लावलेल्या हळदीच्या याच रंगानं चेहऱ्यावर विलक्षण तेज येतं तर लग्नाच्या वेळी मामाने घेतलेल्या याच रंगाच्या जरीकाठी साडीवर उभं राहता या रंगाशी अनोखा बंध जोडला जातो, कायमचा..
कुंकवाआधी कायम मानाची जागा घेणाऱ्या हळदीचा हा पिवळा रंग कुंकवासोबत स्त्रीच्या कपाळावर शोभून दिसतो. शुभंकरोती म्हणताना दिव्याच्या ज्योतीचा हाच रंग मनाला शांत, प्रसन्न करतो. नैवेद्याच्या ताटात सुद्धा बहुमान मिळतो याच रंगाला जसं लिंबू, बटाट्याची भाजी, वरण, पुरण अशा विविध पदार्थांमधून तो खुणावत राहतो.
शिशिर ऋतुमधे तर या रंगाच्या अनेक छटांची पानगळ आपलं लक्ष वेधून घेते. तेव्हा बोरकरांच्या कवितेतील काही ओळी आठवतात,
पिलांस फुटूनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटे..
© कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment