लाल रंग
लहानपणापासून कितीतरी वेळा कौतुकानं आईने केलेलं आपलं औक्षण ! जेव्हा काहीही कळत नव्हतं तेव्हा सुद्धा औक्षण करणाऱ्या आईला पाहून झालेला आनंद व पुढे कळायला लागल्यावर निरांजनाच्या शांत प्रकाशात दिसलेला आईचा समाधानी चेहेरा, आजही तसाच आहे.. आपल्या कपाळावर सर्वात प्रथम तिने लावलेलं कुंकवाचं बोट .. लाल रंगाशी झालेली ती बहुतेक आपली पहिली ओळख, पहिला स्पर्श !
मग तो रंग वेगवेगळ्या रूपांत आसपास कायमच दिसत राहिला. कधी रंगबिरंगी खेळण्यांमधून, कधी जत्रेत हातात भरलेल्या बांगड्यांमधून तर कधी दुकानांतून डोकावणाऱ्या कपड्यांमधून, कायम खुणावत राहिला ! त्रंबकेश्वरच्या घरी फुललेला जास्वंदाचा लाल जर्द रंग अजूनही स्मरणात आहे. याच रंगाची जादू विड्याच्या आणि मेंदीच्या रंगण्यात अनुभवली आहे !
प्रत्येक वर्षी नवरात्रीत आई सोबत देवळांत गेल्यावर देवीच्या कपाळावरच्या ठसठशीत कुंकवानं सजलेलं तिचं रूप पाहून या रंगाची ताकत हळूहळू गडद होत गेली. सनईच्या मंगल सुरांच्या सोबतीनं लग्नात मंगळसूत्राच्या वाटीत भरलेलं कुंकू पाहून तर या रंगाशी नातं जोडलं गेलं !
या रंगानं यश राजची गाणी मनावर कोरली, याच रंगानं सुर्यास्ताला क्षितिजावर नजर खिळवून ठेवली, याच रंगांन दारातील रांगोळी सजवली, याच रंगानं साडीचं वेड लावलं...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या रंगाच्या वेगवेगळ्या छटा स्पर्शून गेल्या. आईच्या आजारपणात ब्लड बँकेत काऊंटर वर उभं असताना याच रंगांन कृतज्ञता शिकवली ..
शौर्याचं, पराक्रमाचं प्रतिक असणाऱ्या या रंगाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व या निमित्तानं आज नव्यानं समोर आलं !
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment