G-pay वरच्या गप्पा
'आई अग थोडी गडबड झाली, या महिन्यात पैसे जरा जास्त खर्च झाले'.. फोनवरचं पहिलं वाक्य ! मी आपलं ' no problem बेटा, it's ok' म्हणेपर्यंत पैसे जास्त का खर्च झाले याचा हिशोब समोरून चालत आला. 'अग काय झालं सांगू का ग्रोसरी जरा जास्त आणली या वेळी (अंडी, बटर, चीज, sauce, कॉफी, फळं, फार फार तर भांड्याचा liquid soap ही ग्रोसरी ) आणि ICICI बँकेनी 800 Rs कापले yearly charges माझ्या Demat account चे मग गडबड झाली सगळी'.. 'अरे ठीक आहे, होतात कधीतरी पैसे खर्च' असं मी म्हणेपर्यंत,' पण तू आत्ता पैसे नको ट्रान्सफर करुस पण एक तारखेला म्हणजे एक तारखेला नक्की कर, चल बाय मी जातोय कॉलेजला, जेवण झालंय माझं'.. असं म्हणत त्याने फोन ठेवला सुद्धा !
चार दिवसांपूर्वी ऑफिसच्या लंच टाइम मधला हा आमचा संवाद ... वाटतं घरापासून लांब राहून मुलं शिकतात हळूहळू! पण पुढच्याच क्षणी आईचं मन काही ऐकत नाही आणि लगेच Gpay वरून थोडे पैसे transfer होतात आणि ऑफिसचं पुढचं काम सुरू होतं !
संध्याकाळी घरी गेल्यावर notification दिसलं.. 'धन्यवाद अम्मीजान' ते वाचेपर्यंत दुसरं notification ' मुझे लगा ही था आप ऐसें ही कुछ करेंगी'.. ' क्यू आप ने मेरी बात नही सूनी ' .. हे वाचून मी फोनच लावला. 'काय रे , अम्मीजान वगैरे'.. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच 'आई, कशाला पैसे ट्रान्सफर केले ? मी सांगितलं होतं ना नको करूस'.. मी म्हटलं 'अरे ठीक आहे, असू दे'.. तरी पुन्हा तेच. मला समजेना असं का म्हणतोय की पैसे का ट्रान्सफर केले; तर वाईट याचं वाटत होतं कि आता 1 तारखेला मी कमी पैसे ट्रान्सफर करणार.. असं दोन तुकड्यातला पॉकेट मनी पचनी पडत नव्हता हे लक्षात आलं... ओह्ह असं आहे तर. मग म्हटलं चला विषयच बदलू.
मी म्हटलं 'अरे मगाचचे मेसेज तर Gpay वर आले होते. तू तिथे का मेसेज पाठवतोय' ?.. 'का ? काय झालं, चालतं तिथे मेसेज पाठवला तरी'.. 'अरे, बँकेतले लोकं वाचतील ना आपले मेसेज '.. 'अग आई ते कसे वाचतील' ? .. 'कसे म्हणजे, इथे जे काही लिहितो ते समजतं त्यांना'.... 'आई sssss , असं नसतं ग sss , त्यांना नाही समजत. त्यांना काय तेवढाच वेळ आहे का आपले मेसेज वाचत बसायला ?आणि ते का वाचतील आपले मेसेज' ... 'नशीब तिथे नाही लिहिलंस आई पैसे संपले'.... 'आई, असं असतं ना तर मग आपले मेसेज वाचणाऱ्या बँकेतल्या बाईनेच ट्रान्सफर केले असते तुझा अकाउंट मधून माझ्या अकाउंट मध्ये पैसे. तसं नाही ना झालं म्हणजे नाही वाचत ते आपले मेसेज'... 'तरी मला वाटतंय रे ते वाचतात आपले मेसेज'...
त्याला वाटत असेल, 'अशी कशी आहे आई आपली ? काय काय imagine करत बसते'.... पण बरं आहे, असा समज असणं चांगलंच आहे. कधी कधी थोडं बुद्धू असल्याचं नाटक केलं ना तर भलती मजा येते हे मात्र नक्की.
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment