कधी कधी काही दृश्य
एकदम चित्रातली वाटतात
असंच दिसलं एक..
काल सकाळी सकाळी
गणेश मंदिराच्या समोर
डौलदार बैलगाडी उभी होती
गुलमोहराचा देखणा सडा
चित्रांत रंग भरत होता
बैलगाडीत भरलेल्या
मातीचा चुटुक रंग,
त्यावर उठून दिसत होता
सदरा धोतर फेटा, शुभ्र पांढरा
कपाळी माऊलीचा टिळा होता
गळ्यात माळ घातलेला तो
एक क्षण विसावला होता
पाहून वाटलं त्याच्याकडे,
चेहरा समाधानानं फुललाय
सुरकुत्यांमध्ये त्याच्या
एक खरेपणा दडलाय
का कुणास ठाऊक पण वाटलं,
माऊलीचं ओठी नाव
काळजात वारीची आस असेल
सावळ्या विठूला भेटायला
मनात त्याच्या घाई असेल..
चतुर्थी म्हणून हात जोडून
समोर मंदिरात तो पाहत होता
वारीतला एक वारकरी
गणेशाच्या दारांत होता..
गाडीवरून मी पुढे जाता
नजर मात्र मागे वळली
अन श्रद्धेवरची श्रद्धा
अजूनच दृढ झाली !
No comments:
Post a Comment