Monday, October 31, 2022

गृहिणी-मित्र ...एक हजार पाकक्रिया

दिवाळी जवळ आली कि ऑफिसमध्ये लंच टाइमला गप्पांचा विषय आपोआप पदार्थांकडे वळतो. उद्यापासून सुट्टी त्यामुळे कोण कोण काय काय पदार्थ करणार यावर खरपूस चर्चा रंगली होती. प्रत्येक दिवाळीत सणाचा माहोल जसजसा बनत जातो तशी आईची अजूनच आठवण येते. तिने बनवलेल्या फराळाच्या पदार्थांची चव आजही डोळे बंद करून आठवावीशी वाटते... प्रत्येक पदार्थ उत्तम चवीचा आणि त्याच देखण्या रूपाचा बनवायचं वरदान बहुतेक आपल्या प्रत्येकाच्याच आईला मिळालं होतं.आपणही तोच प्रयत्न अगदी मनापासून करतो, आपल्या मुलांकरता.

 YouTube, Cooking Apps, cooking shows, मधुराज रेसिपी च्या जमान्यात पाकशास्त्रातील पुस्तकं काही अंशी मागे पडली कि काय असं वाटत असलं तरी आईनी, सासूबाईंनी आपलं नवीन लग्न झालेलं असतांना दिलेली रुचिरा, अन्नपूर्णा सारखी पुस्तकं आपण आजही आवर्जून वापरतो. काही वर्षांपूर्वी 'गुलाबजाम' नावाची एक देखणी फूड फिल्म आली होती. त्यात एक वाक्य होतं, 'मी तुम्ही केलेल्या डब्यातले पदार्थ चाखले आणि मन आईपाशी गेलं'.. खरंच आपल्या मनातली ती ठराविक चव शोधत असतो आपण प्रत्येक पदार्थात !

आज योगायोगाने पाकशास्त्रावरील ११२ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं लक्ष्मीबाई धुरंधर लिखित ‘गृहिणी-मित्र .. एक हजार पाकक्रिया’ हे पुस्तक हाती लागलं, १९१० मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक. लक्ष्मीबाई धुरंधर या क्षेत्रातल्या अनुभवी, कर्तबगार व्यक्ती तर होत्याच शिवाय तपशीलवार,सूक्ष्म बारकाव्यासहित नेमकेपणाने आपला विषय मांडणाऱ्या पाककला विदुषी होत्या. मराठीबरोबरच इंग्रजी, गुजराती, उर्दू या भाषा त्यांना अवगत होत्या. या पुस्तकाच्या तेराव्या आवृत्ती नंतरच्या पुढील चार आवृत्त्या त्यांच्या कन्या मंजुळाबाई गोरक्षकर यांनी काही पाककृतींची भर घालून अद्ययावत केल्या. 

या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या एक हजार प्रति तर पुढच्या बारा आवृत्तीच्या दोन हजार प्रति त्या काळी काढल्या गेल्या इतकंच नाही तर या पुस्तकाचे हिंदी व उर्दू मध्ये भाषांतर सुद्धा झाले. तेराव्या आवृत्तीची किंमत तेव्हा पाच रुपये होती. त्या काळी 'राजाश्रय' ही नेहमीच वरदान ठरलेली गोष्ट असे. इंदूरच्या महाराणी इंदिराबाई होळकर यांना पुस्तक आवडल्याचे तसंच दुसरी आवृत्ती काढल्याबद्दल कौतुकाचे पत्र, तसेच महाराणी चंद्रावतीबाई होळकर यांनी पहिल्या आवृत्तीला शंभर रुपये बक्षीस जाहीर केल्याची नोंदही या पुस्तकात सापडते. दोन डझन प्रतींच्या मागणीबरोबरच सयाजीराव महाराजांकडून आलेला टिपरी, पायली या प्रमाणांऐवजी तोळे, मासे यांचे कोष्टक वापरण्याचा अभिप्राय बोलका आहे जो पुढच्या आवृत्तीमध्ये लक्ष्मीबाईंनी पाळला.१९९७ मध्ये विसावी आवृत्ती प्रकाशित झाली तीच शेवटची..

हे पुस्तक पाच विभागांत विभागलं गेलं आहे. पहिला भाग शाकाहारी पदार्थांचा, दुसऱ्या भागात आहेत माशांचे प्रकार, तिसऱ्यात मटण, अंडी वगैरेंचे प्रकार, चौथ्या भागात केक, पेस्ट्री, आइस्क्रीमच्या पाककृती, तर पाचव्या भागात आजारी माणसांसाठी पथ्य पाकक्रिया दिल्या आहेत. या पुस्तकात गुजराती, पारशी, मद्रासी, तामिळी, पारशी, चिनी, इराणी, इटालियन, जपानी पाककृती सुद्धा दिल्या आहेत. २०व्या शतकाच्या आरंभी सेलरी, अस्परॅगस, मश्रूमसारख्या भाज्यांच्या पाककृती देऊन लेखिकेने आधुनिकतेचा वारसा जपला आहे.

पुस्तकातील काही पाककृतींची नावे 'ज्याचे श्रेय त्याला द्यावे' या वृत्तीची आहेत. जसं अहिल्याबाई किर्लोस्करांचे हैदराबादी चकले, काशीताई किर्लोस्करांचे चिरोटे, रमाबाई भक्तांचे आंब्यांचे रायते, नाचणीचे चकले, कमलाबाई बालासुब्रह्मण्यम कडून अय्यर लोकांचे चकले अशी नावं पाककृतींना दिली आहेत. आदान-प्रदान हे पाककृती साहित्याचे वैशिष्टय़ इथे खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. 

पुस्तकातील केक व पुडिंग या पाककृतींची नावं विशेष आहेत. इंदिरा, गुलाब, गंगा, सुधा, कमला, लीला, लक्ष्मी, शेवंती, केतकी, मधु, वामन, दिग्विजया, वामन, ईश्वर, क्षिप्रसाधन ही काही केकची, तर मनोरमा, दुर्गा, स्नेहलता ही काही बिस्किटांची नावं आहेत. शेवंता, इंद्रायणी, चंपा, ब्रिजबिहारी ही पुडिंगची नावं, तर रासबिहारी काँग्रेस पुडिंग, ठाकरसी हलवा, काजूचा खरवस नावानेही पदार्थ आहेत. काश्मिरी नेहरू मटण, नेहरूपसंत हैदराबादी शिकार आणि विश्वामित्री खिचडी फक्त इथेच मिळेल. 

गरम मसाला, करीचा मसाला,करीचा ओला मसाला, पंचामृताचा मसाला, मद्रासी मसाला, सिंधी मसाला, जैनांचा मसाला, गुर्जरांचा मसाला, गुजराथी सांबारयाचा मसाला, इंग्रजी मसाला, दौरोपयोगी करी मसाला अशी मसाल्याची विविधता आहे. या पुस्तकात चिवडा ‘छबिना’ नावाने आला आहे, त्यातही विलासी आणि कुंजविहारी असे दोन प्रकार आहेत. नॅशनल मराठा आर्मीचा छबिना, बटाटय़ाचा तसंच साबुदाण्याचाही छबिना आपल्याला विस्तृत कृतीसह दिला आहे. 

पुस्तकातील शब्दांचे स्पष्टीकरण जुन्या काळात घेऊन जातं जसं कासला (पेला), शिंगडय़ा(करंज्या), कवड (अर्धा नारळ), सोय (खवलेला नारळ), टोप (पातेले), खोडवे (पंचपात्री), क्यारवेसीड (गोड जिरे),कापट्या (फोडी). अंडी ताजी ठेवण्याकरता सोडियम सिलिकेट किंवा वॉटर स्लस्स् वापरावा हे सुद्धा इथे सांगितले आहे

आधी उल्लेख केलेला 'गुलाबजाम' चित्रपट रिलीज झाला २०१८ मध्ये ज्यात फूड डिझायनींग करता वेगळी टीम होती. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आपण ते पहिल्यांदा पाहिलं होतं. पण  आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९१० मध्ये लिहिलेल्या या पुस्तकांत 'पदार्थश्रृंगार' नावाने उत्तम टिपण आहे. यात टेबलावर नेण्यासाठी पाककृतीचे सादरीकरण कसे करावे यावर आजही उपयुक्त ठरेल अशी माहिती आहे. 

'सार्वभौम रसना महाराणी होणे असल्यास हे पुस्तक संग्रही ठेवा' असं सांगणारं हे पुस्तक नुसतं चाळलं पण समाधान काही झालं नाही. काल गप्पांच्या ओघात काही संदर्भ निघाले म्हणून माझ्या सहकाऱ्याने आम्हाला आवर्जून दाखवण्याकरता आपल्या आजीचं जपून ठेवलेलं हे पुस्तक आज ऑफिस मध्ये आणलं. पुस्तकाचं सुरकुतलेपण पाहूनच त्याच्या वयाचा अंदाज आला आणि ते वाचतांना त्यातील पदार्थ नजाकतीनं करणारी त्या काळातील आपली आजी पण दिसली !

©कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment