पेट पुराण
काय भारी नाव आहे वेबसिरीजचं. या नावाची वेबसिरीज आत्ता आली पण त्याआधी बहुतेक घरांत टीनएज मध्ये मुलं गेली कि सुरु होतं हे 'पेट पुराण'. 'आई आपण एक कुत्रा पाळू यात का, छोटासा'?'अजिबात नाही, तो काय छोटाच राहणार आहे का कायम ? आणि कोण सांभाळेल त्याला?'... काही वर्षांपूर्वी असा सुरु होणारा आमच्या घरातला संवाद. खरं तर संवाद म्हणून सुरु होऊन भुणभुण म्हणता येईल असा पुढे चालू राहायचा. 'एकतर कुत्रा घरात राहील नाहीतर मी', असं शेवटचं शस्त्र मी काढलं कि भुणभुण करण्याला फुलस्टॉप लागायचा, पुढे नो comments, पण काही वेळा करता. मग बाबा आणि मुलगा आंँखो हि आंँखो में इशारा करत पुन्हा परत ते discussion सुरु करायचे. कुत्रा कसा खेळकर असतो, प्रामाणिक असतो, जीव लावतो, प्रेम करतो वगैरे वगैरे .. मी त्यावर म्हणायचे, 'आपण आहोत ना तिघे जीव लावायला, प्रेम करायला एकमेकांना आता अजून तो डॉगी कशाला मध्ये'.. पण नाही, अधून मधून टीनएज मधले हट्टाचे वारे बरेचदा वाहायचेच.
'पेट पुराण' इतकं रंगायचं कि शेजारच्या काकुंना, शाळेच्या गेटवरच्या काकांना, सोसायटीच्या वॉचमन काकांना सर्वांना विचारून झालं होतं कि 'मी शाळेत जाईन तेव्हा तुम्ही सांभाळाल का आमच्या पिल्लाला' ? इतकंच काय तर वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मावशीकडे कुत्र्याचं पिल्लू सुद्धा मागून झालं. शाळेचे व्हॅनकाका कुत्र्याचं पिल्लू शाळेत न्यायचं असेल तर त्याचे वेगळे पैसे घेतील का अशी चौकशी पण झाली व्हॅन काकांकडे. आणि जेव्हा या सर्वांनी मला विचारलं 'तुम्ही कुत्रा घेताय का' ? तेव्हा समजलं सारं. पण या पुराणातला कुत्रा घरी काही आला नाही.
खरं तर मला कुत्रा आवडत नाही असं अजिबातच नाही पण त्याचं सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे, तेवढा वेळ पाहिजे आणि त्याच्याकडे घरांत लक्ष द्यायला कोणीतरी हवं सारखं. ऑफिसला गेल्यावर कोण बघणार त्याच्याकडे म्हणून मला वाटायचं नको. तो जीव नीट सांभाळण्याची कसरत जमायला हवी. मग काय, 'मी मोठा झालो कि आणीन पिल्लू', यावर मांडवली झाली. हुश्श .. पटलं तर एकदाचं ! मग काय शाळा संपली , जुनियर कॉलेज संपलं आणि पुढचं शिक्षण सुरु झालं बंगलोर ला ! मला वाटलं संपलं आता पेट पुराण.
पण नाही कहानी में ट्विस्ट अभी बाकी था ! ही पेट पुराण वेब सिरीज काय आली त्याच तिकिटावर तोच शो परत सुरु झाला. फरक इतकाच होता कि मुलाची जागा आता बाबानी घेतली. गोल्डन रिट्रिव्हर आणू यांत का आपण ? असा समोरून सलग दोन दिवस येणारा प्रश्न ऐकून शेवटी मी विचारलं, " are you serious ?" उत्तर चक्क 'हो' आलं आणि काय सांग, मी निःशब्द झाले !
पेट पुराण मध्ये 'व्यंकू' नावाचं इतकं गोड पिल्लू आहे कि कोणालाही आवडेल ते पण म्हणून काही लगेच तसंच आणायचं ? मग लक्षांत आलं यार 'आ बैल मुझे मार' हा वेडेपणा मीच तर केला होता. Ruby , Dogs way home , Benji, पेट पुराण असे movies बघत असते मी आणि व्यंकू आणायचा हट्ट करतो हा. काल बंगलोर ला फोन केला तर तोही तेच विचारतोय ,''आई हो म्हण ना बाबाला, आणू यात ना व्यंकू.'' म्हणजे तिथं पर्यंत बातमी पोचली होती तर. मग मी म्हटलं, 'अरे बाबाला हो तर कधीच म्हटलं मी , होतील चोवीस वर्ष आता. आणि हो,व्यंकू ना आणू यात कि, सोबत बकु पण आणू'..
आता बकु कोण ? असं विचारू नका .. त्यासाठी पाहा , सोनी लिव्ह वर 'पेट पुराण'!
वेबसिरीज बघून झाली असली तरी घरांतलं 'पेट पुराण' सुरू आहे अजून

© कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment