कॅनव्हास वर रेखाटलेलं जग माझं सुंदर होतं
रुजलेली संस्कृती, बावनकशी सोनं होतं
माणसाला 'माणूस' हीच खरी ओळख होती
जातीपातीच्या विकृतीला इथे मुळी जागाच नव्हती
'भारतरत्न' अशीच त्यांची जूनी इथे ओळख होती
मनाच्या इवल्या कोंदणामध्ये जाणीव ती शाबूत होती
टक्क्यांचं राजकारण ते पार वेशीच्या बाहेर होतं
माणूस म्हणून प्रत्येकाला आत अढळ स्थान होतं
कलाकाराला जात नसते असं 'नाना'च म्हणायचे
'सैनिकाला आठव रे' कधी दरडावून बजावायचे
मिठी मारतांना टोपी, जानवं आड कधी आल नाही
केशरी हिरव्या रंगांची वाटणी कधी जमली नाही
शिदोरीमध्ये काय आहे हे पक्क ध्यानी होतं
शिवबा जिजाऊ करता, मन आतून ऋणी होतं
घरामध्ये सुरकुतलेले सैनिकाचे खंबीर हात होते
देशप्रेम दाखवायला 'ठरलेले' काही वार नव्हते
आता मात्र कॅनव्हासवरचं चित्र पार बदललंय
अनोळखी वाटावं इतकं सारं काही हरवलंय
रंगांची जादू आतां मनावरती पसरत नाही
कोणत्याच शब्दांमध्ये व्यथा काही मावत नाही...
कोणत्याच शब्दांमध्ये व्यथा काही मावत नाही...
No comments:
Post a Comment