पुस्तक प्रकाशन कार्यक्रमांत सुचलेलं काही ..
पुस्तक काढणं हा इतका इमोशनल कारभार असतो हे नुकतंच अनुभवलंय, आम्ही सर्वांनी. हा कविता संग्रह प्रकाशित होत असतांना एक वेगळा आनंद आणि समाधान तर नक्कीच आहे पण त्याच बरोबर इथंवर कसे पोहचलो तो संपूर्ण प्रवास आज या निमित्ताने आठवतोय.
खरं तर माझ्या नावातच 'कविता' आहे. माझ्या जन्मानंतर बाबांनी माझ्यावर एक छान 'कविता' केली आणि कौतुकाने माझं नाव ठेवलं, 'कविता'. पहिलं अपत्य म्हणून त्यांना झालेला आनंद फक्त डोळ्यांमधूनच नाही तर त्यांच्या शब्दांमधून सुद्धा अगदी ओसंडून वाहिला. आज बाबा नसले तरी त्यांच्यासाठी माझ्या जन्माचा क्षण किती मौल्यवान होता ते आजही 'ती' कविता वाचतांना प्रत्येक शब्दांतून जाणवत राहतं. माझ्याशी जोडलेला तो धागा आईशी जोडणाऱ्या नाळे इतकाच अलवार होता आणि कायमच राहील ! कवितेशी झालेली माझी ती पहिली ओळख...
पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बाबांकडून मिळालेला लेखनाचा हा वारसा किती अमूल्य आहे याची जाणीव होत गेली. आपल्या भावनांना शब्दांत मांडून, व्यक्त होण्यातील आनंद आणि त्यातून मिळणारं समाधान किती विलक्षण असतं ते प्रत्यक्ष अनुभवता आलं. अगदी लहान असतांना, आई बाबांनी केलेल्या संस्कारांमधून, अंगाई गीत, बडबड गीतांमधून त्यांनी नवनवीन शब्दांच्या मोहक दुनियेत नेलं. बाराखडीतील प्रत्येक अक्षर आणि त्या अक्षरापासून सुरु होणारे वेगवेगळे शब्द बोबड्या बोलात आईबरोबर म्हणताना मातृभाषेशी खऱ्या अर्थाने ओळख झाली. चांदोमामा, भोलानाथ या शब्दांमध्ये लपलेला गोडवा त्यांनीच तर दाखवला.
पुढे भाषेची गोडी लावून, मायेनं बोट पकडून भाषा आणि आमच्यातील दरी मिटवून, साहित्याच्या जादुई दुनियेची सफर घडवली आपल्या शाळेतील शिक्षिका सौ. देव बाई सौ. कानडे बाई यांनी. मराठी फक्त एक विषय म्हणून त्यांनी कधीच शिकवला नाही तर या भाषेची श्रीमंती जवळून दाखवली. एकीकडे भाषा समृद्ध होत असतांना दुसरीकडे एक चांगला माणूस म्हणून घडवलं रजनीताई, मंगलताई, लता कुलकर्णी बाई, देसाई सर,रजपूत सरांसारख्या शिक्षकांनी ! म्हणून तर अभिनव विद्यालय शाळेशी जोडणारा तो धागा आजही जपला आहे,आम्ही ! शाळेनं आमचं निरागस बालपण पाहिलं, किशोरावस्था पाहिली, आम्हाला घडतांना पाहिलं !
याच शाळेने दिलखुलास मैत्री करायला शिकवलं, आयुष्यभर सोबत राहील असा मित्र परिवार दिला. बाहेरच्या जगात मैत्रीचं नातं जोडायला शिकवलं. पुढे आयुष्यात मैत्री मधला निरपेक्ष भाव मनाच्या इतक्या जवळचा झाला की प्रत्येक नवीन कविता केवळ मैत्रीतच उलगडली आणि तिथे मिळालेली कौतुकाची थाप कायमच पुढे जाण्यास प्रेरित करत राहिली. आई बाबांनंतर कायम पाठीशी असणारे हात होते, माझ्या कुटुंबाचे. त्यांच्याकडून मिळणारं प्रोत्साहन परिपूर्णतेचं समाधान देणारं होतं.
वेगवेगळ्या मनस्थितीत जिने साथ दिली ती कविता. कधी सुचलं म्हणून तर कधी लिहिण्याचं निमित्त मिळालं म्हणून लिहिलेली कविता. अनेक नाती निभावतांना मनाशी जपलेलं एक अलवार नातं म्हणजे कविता. ती कायमच माझ्या सोबत होती, माझ्यापुरती होती. आता ती सर्वांची आहे....
No comments:
Post a Comment