मराठी भाषेतर अनेक शब्द माहिती जरी असले तरी रोजच्या आयुष्यात काही शब्द आपण फारसे वापरत नाही. पण मग कधीतरी 'कूल मॉम' बनून गप्पा मारताना काही शब्दांचे संदर्भ आपसूकच बोलण्यात येतात.काल संध्याकाळी मी आणि कांतेय स्कुटी मध्ये पेट्रोल भरण्याच्या कारणाने बाहेर पडलो होतोच मग जवळपास एक चक्कर मारायला गेलो. आजवर आम्ही दोघांनी कारपेक्षा जास्त मजा याच स्कुटी वरती केली आहे. तो लहान असतांना मी स्कुटी चालवतांना तो समोर उभा राहायचा. तेव्हा साहजिकच माझ्या गाडीचा स्पीड अगदी जेमतेम असायचा. कांतेय बोबड्या आवाजात म्हणायचा सुद्धा, 'आई शायकलनी आपल्याला ओव्हलटेक केलं, जोलात चालव स्कुटी '.. म्हणजे कधी कधी सायकल वाला सुद्धा आमच्या पुढे जायचा पण आम्ही मात्र आरामात मस्त रमत गमत जायचो.
गाडीवर पुढं उभं करतांना मी एका ओढणीने त्याला माझ्या पोटाशी बांधून उभं करायचे. त्यामागे खरं तर दोन कारणं होती. एकतर मला खूप सुरक्षित वाटायचं त्यामुळे, आणि दुसरं कारण होतं माझा पुतण्या. माझा पुतण्या अगदी लहान जेमतेम अडीच तीन वर्षाचा असताना गाडीवर समोर उभं करून कुठे जात असलो आणि जाताना वाटेत सिग्नलला गाडी थांबली कि खाली उतरून जायचा. 'गाडी थांबली कि उतरायचं' एवढं सोपं होतं त्याचं लॉजिक त्यामुळे आपले दोन्ही हात गाडीच्या हॅण्डल वरती असले तरी त्याखालून तो सहज उतरु शकायचा. ते पाहून मी कांतेयला ओढणीने माझ्याशी बांधून उभं करायचे जेणेकरून तो असं काही करणार नाही. ऑफिसला जातांना सकाळी त्याचा बाबा त्याला आजीकडे सोडायचा आणि संध्याकाळी ऑफिस मधून येतांना मी त्याला आजीकडून घेऊन यायचे. त्यामुळे रोज संध्याकाळी आमची स्कुटीवर चक्कर हि ठरलेली.
कोथरूड पासून घरापर्यंत तेव्हा वाटेत जेमतेम चार सिग्नल लागायचे. मग सिग्नल का असतात, त्याचे वेगवेगळे रंगीत दिवे आपल्याला नक्की काय सांगतात हे मी त्याला शिकवायचे. मग काय प्रत्येक सिग्नल आला कि Green says go, Orange says slow and Red says stop याची उजळणी व्हायची. सिग्नलला थांबलं कि मग किती जण सिग्नल तोडून गेले हे आम्ही मोजायचो. रस्त्याच्या बाजूला कोणती झाडं आहेत, कोणत्या रंगांची फुलं त्यावर येतात हे बघता बघता गुलमोहर, बहावा सारख्या झाडांची फुलं त्याला आवडू लागली. मग कधी बाजूने जाणाऱ्या वेगवेगळ्या रंगीत गाड्या कोणत्या आहेत हे ओळखताना गाड्या आणि त्यांचे ब्रॅण्ड्स याची हळूहळू त्याला ओळख झाली. वाटेत फळं भाज्या विकत घेतांना पुस्तकातील त्यांची चित्र आणि दुकानांत ठेवलेली खरी खुरी फळं भाज्या पाहून त्याला वेगळी मजा यायची. एकूण काय तर रोज वेगवेगळे विषय असायचे आम्हाला स्कुटीवर बोलायला. आजही तीच परंपरा चालू आहे पण सध्या विषय मात्र फार फार वेगळे असतात बरं का , पण ती रंगत मात्र आजही कायम आहे. आता केव्हातरी Starbucks ची कॉफी ती रंगत अजून वाढवते इतकंच !
काल अशीच चक्कर मारून आम्ही दोघ घरी येत होतो. घराजवळ कोपऱ्यावर आलो आणि आठवलं सासूबाईंना एका ठराविक रंगाचं दोऱ्याचं रीळ हवंय ते. मग काय गाडी थांबवून ते आणायला मी कांतेयला दुकानांत पाठवलं आणि मी मात्र स्कुटीवर बसून त्याची वाट बघत होते. इतक्यात एक गाडी समोरून आली आणि अगदी बाजूला येऊन थांबली. कोणी अशी जवळ येऊन गाडी थांबवली म्हणून आत पाहिलं तर तेजस आणि त्याची मैत्रीण. नुकतंच लग्न ठरलंय दोघांचं आणि याच महिन्यात साखरपुडा आहे. 'अब मुझे रात दिन तुम्हारा ही खयाल है, क्या कहूँ प्यार में दिवानो जैसा हाल है'.. अशा रोमँटिक जगांत वावरणाऱ्या त्या CUTE जोडीला पाहून मी म्हटलं 'अरे वाह, आज जोडीनं आणि असा अचानक का थांबलास', तर म्हणाला,' अग आईने सांगितलं मला, कविता ताई म्हणत होती तेजस नी अजून ओळख नाही करून दिली म्हणून थांबलो तुला पाहून'....... " हाहाहा ... अरे आता घरी ये घेऊन हिला, रस्त्याच्या मधोमध करून दिलेली हि ओळख काही खरी नाही '..असं मी म्हणताच दोघंही 'हो,नक्की येतो, असं म्हणून गेले सुद्धा .. फार फार गोड दिवस असतात नाही हे !
इतक्यात दोऱ्याचं रीळ घेऊन कांतेय दुकानातून आला. मला म्हणाला "कोण होतं ? " मी म्हटलं, "अरे तेजस दादा आणि त्याची गर्ल फ्रेंड"..."OK आणि आई, गर्ल फ्रेंड काय म्हणतेस ? दादाचा आता साखरपुडा होणार आहे ना मग Fiancee म्हण".. 'hahaha .. Fiancee...OK .. Fiancee म्हणते "... मला तर एकदम मजा आली कांतेयचे हे वाक्य ऐकून. मग काय घरी आल्यावर पार्किंग मध्ये गाडी पार्क करून लगेच काकूंच्या घराची बेल वाजवली. काकूंनी दार उघडताच 'काकू, तुमची सून भेटली होती आता रस्त्यात, finally पाहिलं बरका मी तिला', हे तोंडावर आलेले शब्द गिळून टाकले मी आणि म्हटलं ,"काकू, तेजस आणि त्याची Fiancee भेटले आत्ता वाटेत , खूप गोड आहे हं ती"....हे ऐकून त्या Fiancee शब्दांतील जादू काकूंच्या चेहऱ्यावर सुद्धा एक छानसं smile देऊन गेली !!!!
No comments:
Post a Comment